Tuesday, August 25, 2026

अकरा मितींचा प्रवास संपला...पण

 अकरा मितींचा प्रवास संपला… पण एक प्रश्न अजून बाकी आहे!

विश्वातील ११ मितींच्या रहस्यमय गुंत्यातून आपण गेलो. मात्र ही सफर वाचताना अनेकांच्या मनात पहिल्यांदाच एक अगदी मूलभूत प्रश्न निर्माण झाला — ही ‘मिती’ म्हणजे नक्की काय?

चला, ते आधी अगदी सोपं करून समजून घेऊया.

“मिती” किंवा “आयाम (Dimension)” म्हणजे एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे स्थान अथवा स्वरूप सांगण्यासाठी आवश्यक असलेली स्वतंत्र दिशा किंवा मोजमाप.

रेषेवर एखादा बिंदू कुठे आहे हे सांगण्यासाठी एकच मोजमाप पुरतं — ही एक मिती. कागदासारख्या सपाट पृष्ठावर त्याचं स्थान सांगण्यासाठी दोन मोजमाप लागतात — हे 2D. आपल्या जगात एखादी वस्तू कुठे आहे हे सांगण्यासाठी लांबी, रुंदी आणि उंची अशा तीन मिती लागतात — हे आपलं परिचित 3D जग.

पण एखादी घटना सांगताना फक्त “कुठे?” एवढं पुरेसं नसतं. “केव्हा?” हेही सांगावं लागतं.

म्हणून भौतिकशास्त्रात तीन अवकाशीय मिती आणि वेळ यांना एकत्र करून चार-मितीय Space-Time ची संकल्पना येते.

आपला रोजचा अनुभव मुख्यतः याच विश्वाचा आहे.

पण मग 10 आणि 11 मिती आल्या कुठून?

String Theory आणि M-Theory सारख्या काही सैद्धांतिक चौकटींच्या गणिती सुसंगतीसाठी अतिरिक्त मितींची आवश्यकता भासते. त्या मिती आपल्याला प्रत्यक्ष जाणवत नाहीत; त्यांचा थेट प्रयोगात्मक पुरावाही आज उपलब्ध नाही.

म्हणूनच या मितींची गोष्ट इतकी रहस्यमय आहे!


पण ही मालिका लिहिताना माझ्या मनात आणखी एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला.

आपण पहिल्या भागात पाहिलं होतं — आपल्या डोळ्यांच्या Retina वर पडणाऱ्या प्रतिमा 2D असतात. दोन्ही डोळ्यांतून मिळणारी माहिती, वस्तूंचा आकार, अंतर, हालचाल अशा अनेक संकेतांवर मेंदू प्रक्रिया करतो आणि आपल्याला खोली असलेल्या 3D जगाचा अनुभव मिळतो.

म्हणजे आपण अनुभवत असलेलं ‘दृश्य’ हे केवळ डोळ्यांचं काम नाही. त्याच्या निर्मितीत मेंदूची फार मोठी भूमिका आहे.

आणि इथे माझ्या मनात एक भन्नाट ‘जर-तर’ आलं…

आपल्या मेंदूला 2D माहितीमधून 3D जगाचा अनुभव निर्माण करता येतो, तर काही माणसांच्या मेंदूत आपल्या नेहमीच्या अनुभवापलीकडच्या मितींचा भास किंवा अनुभव निर्माण करण्याची काही वेगळी क्षमता असू शकेल का?

आणि मग मला आपल्या प्राचीन कथांमधील काकभुशुंडीची कथा आठवली.

काकभुशुंडीने श्रीरामांच्या जीवनातील घटना अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे घडताना पाहिल्याचं वर्णन आढळतं.

आपल्या या मालिकेत आपण अनेक शक्य वास्तवांची कल्पना पाहिली होती.

मग मनात प्रश्न आला — अशा प्राचीन कथांकडे आपण केवळ कथा म्हणून पाहावं, की मानवी चेतनेच्या विलक्षण अनुभवांचं एखादं रूप म्हणून?

इथे मात्र विज्ञान आणि कल्पना यांच्यातील सीमा स्पष्ट ठेवायला हवी.

काकभुशुंडीचा अनुभव उच्च मितींचा अनुभव होता, असं म्हणण्यासाठी आपल्याकडे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मेंदूला अतिरिक्त अवकाशीय मिती प्रत्यक्ष जाणवू शकतात, हेही विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही.

त्यामुळे ही माझी केवळ एक उत्सुकता आहे — वैज्ञानिक निष्कर्ष नाही.

पण कदाचित या संपूर्ण प्रवासाची खरी मजा इथेच आहे.

विज्ञान आपल्याला केवळ उत्तरं देत नाही. ते आपल्या ठाम समजुतींना प्रश्न विचारायला शिकवतं.

एकेकाळी आपल्याला विश्वाबद्दल माहीत असलेलं फार थोडं होतं. आज आपण Space-Time, Quantum Physics, String Theory आणि 11 dimensions पर्यंत विचार करू शकतो.

उद्या आपल्याला आणखी काय कळेल, कोण जाणे!

अकरा मितींच्या या प्रवासानंतर माझ्या मनात मात्र एक प्रश्न राहिला आहे —

आपल्या इंद्रियांना जेवढं विश्व अनुभवता येतं, तेवढंच विश्व खरोखर अस्तित्वात आहे, असं आपण खात्रीने म्हणू शकतो का?

©संतोष कारखानीस

#विज्ञान #विश्व #मिती #StringTheory #मानवीचेतना

No comments:

Post a Comment