Sunday, September 6, 2020

माणूसजन्म : डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

(सदरहू लेखात खालील पारिभाषिक संज्ञा वापरल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत.
· नरवानर Humans and Nonhuman Primates
· नर Human male
· नारी Human female
· वानर Nonhuman Primates
· माकड Monkeys
· कपी Apes)

पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्; असं करत करत, चौऱ्यांशी लक्ष योनीतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो म्हणतात. पण जन्ममृत्यूचं हे चक्र नसून ही साखळी आहे; जननी आणि जठर काळाच्या ओघात जैसे थे राहिलेलं नाही; बदलत, बदलत गेलंय असं उत्क्रांतीशास्त्र सांगतं. मानवी शरीर, त्याची अचंबित करणारी रचना आणि आश्चर्यमुग्ध करणारे कार्य म्हणजे ह्या साखळीचा कित्येक पिढ्यांचा वारसा आहे. मनुष्यमात्रांच्या पृथ्वीवरील आगमनापूर्वी, काही लक्ष नव्हे, तर काही कोटी जीव इथे नांदून गेले आहेत. मागे, मागे, मागे जात राहिलो तर आपला वंश पहिल्यावाहिल्या सजीवापाशी पोहोचेल. पण इतकं मागे जाण्याऐवजी, इह संसारे आगमनाचा मानवी जन्मसोहळा इतका दुस्तर का?, माणसाच्या माद्या का आणि कशा वितात?; हे समजण्यासाठी थोडेसेच मागे गेलो तरी चालेल.

वरच्या वाक्यातले ‘माणसाच्या माद्या’ आणि ‘वितात’ हे शब्दप्रयोग तुम्हाला धक्कादायक किंवा असभ्य वाटतील पण वस्तुनिष्ठपणे विचार केला तर दोन्ही अगदी बरोबर आणि रास्त आहेत.

मनुष्य हा प्राणीच आहे आणि आपले खाणे, जुगणे, रतणे, प्रसवणे इतकेच काय वागणेही उत्क्रांतीचीच देन आहे. मनुष्याला पुनरुत्पादनासाठी फुटवे फुटत नाहीत (Asexual Reproduction) ते लैंगिक फलनातूनच (Sexual Reproduction) साधले जाते. माणसाला अंडी घालताच (Oviparity) येणार नाहीत. थेट पिल्लांना जन्म देणं (Viviparity) हेच मानवी औत्क्रांतिक भागधेय आणि हो माणूस हा स-स्तन प्राणी. त्यामुळे पिल्लांना अंगावर पाजणे आणि तेही फक्त माद्यांनी, हे तर मस्टच. याबरोबर संप्रेरके (Hormones), सरपटणाऱ्या (सरीसृप, Reptiles) पूर्वजांकडून; वार (Placenta), पिल्लावणाऱ्या (Viviparous) पूर्वजांकडून आणि जननमार्ग नर-वानर पितरांकडून आपल्याला वारसाहक्कानी प्राप्त आहे. या उत्क्रांती मंथनातूनच द्वीपाद चाल, मोजकी संतती, पिल्लांचा निगुतीने सांभाळ, ‘रक्त-मूल’ अशा प्रकारची वार आणि मोठाच्या मोठा मेंदू ही वैशिष्ठ्ये तयार झाली आहेत. (Hemochorial म्हणजे रक्त-मूल प्रकारच्या वारेत, आईच्या रक्तात बाळाच्या वारेची मुळे तरंगत असतात. आई आणि बाळाच्या रक्ता दरम्यान फक्त तीनच पदरांचा पापुद्रा असतो)


हां, तर मी काय सांगत होतो, माणसाच्या माद्या वितात त्या काही विशिष्ठ पद्धतीने. माणसाचं (Humans) आणि माकडांचं (Monkeys) नातं डार्वींननी स्पष्ट केलेलंच आहे. आपण चुलत भावंड आहोत. म्हणजे माकडापासून माणूस उत्क्रांत झाला असं नाही. तर जसे आपले आणि आपल्या चुलत भावंडांचे आजोबा एकच होते तसे माणसाचे आणि माकडाचे पूर्वज एकच होते. पण माकडांपासून फारकत घेतल्यावर माणसाच्या फांदीला गोरीला, चिम्पॅंजी अशा कपिकुळाच्या फांद्या फुटल्या. (चित्र क्र १) माणसाच्या होमो या प्रजातीत (Genus) इतरही काही भाईबंध होते. होमो हॅबिलीस, होमो निअंडरथॅलेसीस इत्यादि. पण हे ‘इतर सगळे’ काळाच्या उदरात लुप्त झाले. वंशखंड झाला त्यांचा. माणूस, होमो सेपीएन, तेवढा टिकला. नुसता टिकलाच नाही तर निसर्गाच्या नाकावर टिच्चून त्याचा वंश फुलला, फळला, फळफळला. सारी पृथ्वी त्यानी पादाक्रांत केली आणि कमाल म्हणजे ह्या साऱ्याची तीव्र जाणीव, जिज्ञासा त्यात उत्क्रांत झाली. आसपासच्या सृष्टीसोबतच स्वतःकडे इतक्या कुतुहलाने आणि कौतुकाने पहाणारा मनुष्य एवढा एकच प्राणी.

हां, तर मी काय सांगत होतो, मानवी माद्या वितात त्यांची काही खासियत आहे. एक तर माणसांत बाळंतपण खूपच अवघड आहे, वेळ खाऊ आहे, शक्तिपात करणारे आहे. इतके की कुणाच्या मदतीविना, कोणी ‘सोडवल्या’विना माणसाच्या मादया सुखरूप वितील अशी शक्यता कमी. नारींच्या मानानी माकडी, वानरी आणि कपी माद्या सहज वितात. हे असं आहे आणि हे असंच आहे ह्याला काही जीवशास्त्रीय, औत्क्रांतिक कारणे आहेत.


माणसाच्या मादया वितात तेंव्हा पिल्लाचा प्रवास मादीच्या जननमार्गातून, एका अरुंद बोगद्यातून होतो. आपल्यापैकी सीझरने जन्मा घातलेले वगळता, सर्वांना हा प्रवास करावा लागला आहे. हा प्रवास अगदी अद्वितीय आहे. जननमार्ग म्हणजे योनिमार्ग. योनि म्हणजे जणू भरपूर ताणता येईल अशी इलॅस्टिकची नळी आहे. (चित्र क्र २) हिच्या आतल्या टोकाला गर्भाशय आहे आणि बाहेरच्या टोकाशी बाह्यांग. कमरेच्या हाडांच्या कडीतून योनीमार्गाची ही नळी आरपार जात असल्याने, ताणले जाण्याला अर्थात कमरेच्या हाडांची मर्यादा आहे. योनीमार्ग ताणला जात असल्याने हाडांच्या कडीच्या आतील माप हेच जननमार्गाचे माप. हीच्या मागच्या बाजूला माकड हाड आहे. हे सुमारे सहा इंच लांब आणि पुढच्या बाजूचे हाड जेमतेम दीड इंचाचे. (चित्र क्र ३) पण हा प्रवास पिल्लाचं अंग पिळवटून टाकणारा आहे. पिळवटून म्हणजे शब्दश: पिळवटून टाकणारा. ह्याचे कारण म्हणजे हा बोगदा सरळसोट नाही. त्याला थोडा पीळ आहे. उभ्या आणि आडव्या अश्या दोन्ही अक्षांवर पीळ आहे. ह्या वळणानुसार बाळाचा प्रवास व्हावा लागतो. मूलत: ह्या बोगद्यात शिरायची जागा लांबटगोल असते. हा लंबगोल पुढूनमागे चपटा असतो आणि बाजूबाजूला ताणलेला. बाहेर यायची जागाही

(बाह्यांग) लंबगोल असते; पण ही बाजूबाजूने चेपलेली असते आणि पुढून मागे चांगली ताणलेली असते. म्हणजेच ह्या बोगद्याचा लांबट व्यास काटकोनात (९००) वळलेला असतो. शिवाय या बोगद्याच्या प्रवेशाचे तोंड आणि एक्झिटचे तोंड समोरासमोर नसतात. आत शिरताना पार्श्वदिशेला, माकडहाडाच्या दिशेला, जाणारा मार्ग आतल्याआत ५५०त वळून, बाहेर पडताना पुढच्या दिशेला तोंड करुन असतो. म्हणजे बाळाचे मुटकुळे ह्या अरुंद घाटमार्गातून (उभ्या अक्षात) नव्वद अंशातून पिळून आणि (आडव्या अक्षात) पंचावन्न अंशातून वळून यायला पाहीजे. (चित्र क्र ४) बाळ कळेगणिक खाली, खाली, आणि शेवटी बाहयांगातून बाहेर ढकलले जाते. पण वाटेत इतके आळोखेपिळोखे द्यायचे म्हणजे मामला अवघड होणारच.

आणखी एक भानगड असते. बाळाचे डोके चेंडू सारखे गोल गरगरीत नसते. ते अंडाकार, निमुळते असते. हे डोक्याचे अंडे निमुळत्या दिशेने बाहेर येणे सुकर. अंडे आडवे आले तर दुष्कर. जर बाळ नतमस्तक (Flexed) असेल तर हनुवटी छातीशी आणि नाकाचा शेंडा त्याच्या पायाच्या दिशेला राहील. अंडाकृती डोक्याचे मागच्या टाळूचे निमुळते टोक जननमार्गत शिरेल. जर बाळानी मान वर केली तर परिस्थिति बिनसेल. जन्मापासूनच मान वर करून न पहाणे किती महत्वाचे आहे पहा!!


वानरींचा (Nonhuman Primates) जननमार्ग हा नारींच्या मानानी सरळसोट असतो. (थोडासा एका दिशेने चेपलेला) वानरीसूतांचे डोकेही त्यात सहज बसेल असे (जर्रा चेपलेले) असते. बाकी एकूणच ऐसपैस जागा असल्याने चिंपांझीणी वगैरे झटक्यात बाळंत होतात. बाळ सुळकन् बाहेर येते. वेळही बराच कमी लागतो. वेदनाही कमी होत असाव्यात. तोंडातून सहसा ब्र सुद्धा निघत नाही. फार किंचाळलं वगैरे तर ती मादी आणि पिले कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडायची शक्यता जास्त. त्यामुळे उत्क्रांती दरम्यान सहनशक्ती आणि सुकर प्रसूती असं दोन्ही घडत गेलं.


नारींत आणि वानरींत मूल जन्मताना डोक्याकडून बाहेर येते. पायाळू होणे, म्हणजे डोक्याऐवजी आधी पाय किंवा ढुंगण पुढे येणे. दोघींतही, बाळाला आणि बाळंतीणीला, हे त्रासदायक ठरते. कुठेही, कधीही, प्रवेश करताना आधी ढुंगण पुढे करणे असभ्यच की!! शिवाय मानवी पिल्लू जन्मतः आईच्या गुदद्वाराकडे तोंड करुन जन्माला येतं. बाकी ओरांगउटांग, मार्मोसेट, बबून अशा बहुतेक वानरींत उलटं असतं. पिल्लू आईच्या मूत्रमार्गाकडे तोंड करुन बाहेर येतं. थोडक्यात वानरी, प्रसूत होताना, खाली वाकून आपल्या पिल्लाचं तोंड पाहू शकतात. नारींना हे ‘मुहं दिखाई’चं सुख नाही. पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वानरी आपल्या आपण बाळाच्या डोक्याला आधार देऊन प्रसंगी ते धरून बाहेर ओढून घेऊ शकतात. ह्या अवस्थेत आधार दिल्यास बाळाचे डोके अधिकाधिक नतमस्तक होते. त्याचा निमुळता भाग योनीमुखाशी येतो. नारी असं करू शकत नाहीत. (चित्र क्र ५) तसा प्रयत्न केलाच तर अंडाकार डोक्याचा निमुळता भाग पुढे येण्याऐवजी रुंद भाग पुढे येईल. बाळाने ‘मान वर केली’ (Extended Neck) असा अर्थ होईल. बाह्यांगाला मोठीच इजा होईल.

त्यामुळे मनुष्याच्या मादीला बाळंतपणात कोणीतरी दिमतीला असावं लागतं. डॉक्टर किंवा दाई तरी हवी; किमान आई तरी हवी. त्यामुळे आज माणसाच्या मुली डिलिव्हरीसाठी माहेरी येतात. गोरीलाच्या मुली येत नाहीत. सुईण ही अगदी आदीम गरज आहे. वेश्या किंवा वकिली हा आद्य व्यवसाय नसून सुईण हा आद्य व्यवसाय आहे. आदि-मातांची ही गरज आदि-सुईणी पुरवत आल्या आहेत. त्यांच्या लुडबुडीने काही थोडे भले होत होते. ही लुडबूड उत्क्रांतीधारेत उपकारक ठरत होती. सुईणपण, दाईपण माणसाच्या वागणुकीत कोरली जात होती. ‘ज्ञानी राखीजे अलिप्तता; अवधान दिजे, धरी अपेक्षा; करी कदापी न उपेक्षा, जन्मवेळी’। (अध्याय १८, ओवी २७)*; (Masterly inactivity with watchful expectancy) हे आधुनिक प्रसूतीशास्त्राचे ब्रीद आहे. पण आदि सुईणींना हे शिकवणार कोण? त्या आपल्या त्यांच्या अंतःप्रेरणेने बायका सोडवत होत्या.
(* ही ओळ माझ्याच, अद्याप एकच ओवी लिहून झालेल्या, आगामी ग्रंथातील आहे. गैरसमज नसावा.)

कळा वाढाव्यात म्हणून ह्या पोट चोळतात. पोटावर दाबून, प्रसंगी पोटावर स्वार होऊन, बाळ बाहेर येण्यास मदत करतात. मूल पायाळू असेल तर ते फिरवण्याचे प्रयोग सुइणींनी केले आहेत. विविध प्रकारे बाह्यांगमर्दन करून, तेले लावून जननमार्ग सैल आणि बुळबुळीत करण्याचे प्रयत्न ज्ञात आहेत. पाणमोट फोडणे, पिशवीचे तोंड ताणणे, विटप-छेद (बाह्यांग छेदणे, Episiotomy)केलेले आहेत. प्रसवेशी संग केला असता वीर्यामुळे प्रसूती जलद होते असेही एक प्राचीन निरीक्षण आहे. सुईणींनी ह्यालाही उत्तेजन दिलेले आहे. इतकंच काय, सर्व आदिम संस्कृतीत उदर-जननाच्या (Caesarean birth) कथा आहेत. बाईला सोडवण्यासाठी केलेत तसे बाळाला ‘रडवण्यासाठी’ ह्या सुईणींनी अनेक उपाय केले आहेत. बाळाला उलटे धरणे, फटके मारणे, गार/गरम पाण्याचे हबके मारणे, चोळणे असे अनेक. काही गैर, काही दुरुस्त.

हे प्रकार शतकानुशतके नव्हे, सहस्त्रानुसहस्त्रके चालू आहेत. अशा प्रकारे सहजीवाला सहकार्य करायला लावणारं हे अवघड बाळंतपण उत्क्रांतीच्या ओघात निपजलंच कसं?

उत्क्रांती शास्त्रानुसार इथे सक्षम ते टिकतात. ‘सक्षम’ म्हणजे मोठे होऊन पुढच्या पिढीला जन्म देऊ शकणारे. उत्क्रांतीच्या भाषेत बहुतेकदा ते तेवढेच सक्षम. म्हणजे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतील अशी रचना, अशी क्रिया, अशी वागणूक उत्क्रांती दरम्यान पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाणार. ह्याच्या विपरीत रचना, क्रिया, वागणूक असणारे नर-वानर उत्क्रांतीच्या स्पर्धेत बाद ठरणार. त्यांचा वंशखंड होणार. थोडक्यात जी रचना आज दिसत्येय, जी क्रिया आज होत्येय, जी वागणूक आज प्रत्ययास येत्येय; ती तर औत्क्रांतिक पुण्यसंचिताचे नवनीत म्हणून आहे. वानरींत एवढी सुलभ असणारी प्रसूतीक्रिया नारींत इतकी अवघड का? तर ही सगळी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची आणि भलामोठा मेंदू बाळगण्याची फळं भोगतोय आपण.

स्वतःच्या पायावर उभं रहायचं तर खुबे लांबलांब असलेले बरे. मग ते तसे उत्क्रांत झाले. पण मग जननमार्ग मागून पुढे असा अरुंद झाला आणि प्रसूती अवघड झाली. उभ्या देहाच्या वजनाची मदार आता माकडहाडाला पेलावी लागली. मग माणसांत माकडहाड जाड, जड आणि ठळक झाले. त्या भानगडीत ते जरा जननमार्गात सरकले आणि प्रसूती अवघड झाली.

त्याच वेळी माणसाचा मेंदूही मोठा मोठा होत होता. शेवटी तो अशा अवस्थेला पोहोचला की आता ह्याहून मोठा झाला तर बाळाचे डोके जननमार्गतून बाहेर येणेच अशक्य होईल. मग अशी बाळे जन्मालाच येणार नाहीत. ती मरतील. त्यांच्या आयाही अशा अडलेल्या बाळंतपणात मरतील.

मग उत्क्रांतीच्या ओघात यावर अनेक नामी तोडगे निघाले. रिलॅक्सिन ह्या संप्रेरकांच्या प्रेरणेने, माद्यांच्या कमरेचे सांधे किंचित सैल होऊ लागले. कमरेचे कडे किंचित विस्तारू लागले. माणसाच्या माद्या एकमेकींना, बाळंतपणात कंबर ढिली झाल्याचं सांगतात, ते काही खोटं नाही. माणसाच्या बाळाचे डोके जन्मसमयी लिबलिबीत राहू लागले. त्यामुळे डोक्याचा आकार अधिकाधिक निमुळता होऊन डोके जननमार्गाबाहेर येते. जन्मतः माणसाच्या पिल्लांची डोकी लांबोळकी, जिरेटोप घातल्यासारखी दिसतात ती यामुळेच. पुढेही चांगली दीड दोन वर्षाची होईपर्यंत कवटीची हाडे जुळून येत नाहीत. त्यात लिबलिबीत फटी रहातात. हाताला सुद्धा जाणवतात त्या. त्याला टाळू म्हणतात. झपाझप वाढणाऱ्या मेंदूला सामावून घ्यायला लवचिक कवटी बेस्ट. जन्मवेळी आईच्या कटीत मोठी कवटी मावूच शकणार नाही. त्यामुळे जन्मानंतर मेंदूची झपाट्याने वाढ (Encephalisation) हा औत्क्रांतिक बदल माणसांत घडून आला, मानववंशात सामावला गेला.

जन्मानंतरही मेंदूची झपाट्याने वाढ झाल्याचे फायदे तोटे दोन्ही झाले. वानरीच्या पिल्लांचा ५० ते ६०% मेंदू जन्मतः तयार असतो. नारीच्या पिल्लांचा जेमतेम २५%. म्हणजे मेंदू दृष्ट्या माणसाची पिल्लं, पूर्ण दिवसाची पण ‘अपुऱ्या वाढीची’ निपजतात (Secondary Altriciality). माकडीच्या किंवा वानरीच्या पिल्लांसारखी ती आपलीआपण आईला बिलगून धरू शकत नाहीत. मुठीत धरायला नारींच्या अंगावर वानरींसारखे केसही नसतात आणि नन्ह्यामुन्न्यांच्या बाळमुठीत तेवढं बळही नसतं. त्यांना सतत अंगाखांद्यावर वागवावं लागतं. पुढेही बराच काळ त्यांना वाढवावं लागतं, पढवावं लागतं, तेंव्हा कुठे ती हाताशी येतात.

मेंदू जसा जन्मानंतर वाढतो तशाच माणसातील अनेक गुंतागुंतीच्या जैवरासायनिक क्रिया, प्रतिकारशक्ती, वगैरेही ‘अपुऱ्या वाढीच्या’ असतात, कच्च्या असतात. जन्मानंतर त्या सावकाश आणि यथावकाश पिकतात. विविध अवयव सक्षम असण्याच्या दृष्टीने विचार केला तर माणसाच्या बाळाला अजून तीन ते सहा महीने गर्भवास हवा, असा निष्कर्ष निघतो. आपल्या निएनडर्थल भगिनींत एक वर्षाची गर्भावस्था असायची. पण मेंदू मोठा मोठा होत गेल्याने माणसांत नवव्या महिन्यातच प्रसूती आणि पुढे परावलंबी पण झपाट्याने वाढ असा सुवर्णमध्य उत्क्रांत झाला आहे. कसा ते पाहू या.

असं बघा; खरंतर आई आणि बाळ यांच्यात निम्मीच गुणसूत्र समान असतात. म्हणजेच आई आणि बाळ ही जनुकीय दृष्ट्या भिन्न भिन्न जीव असतात. त्यांचे रक्तगटही बरेचदा भिन्न असतात. भिन्न व्यक्तीचे रक्त, त्वचा, अवयव असं काही आपलं शरीर सहजासहजी स्वीकारत नाही. सहसा अशा परकीय पेशींचा नायनाट करण्याची यंत्रणा अगदी चोखपणे आपलं काम बजावत असते. यालाच प्रतिकारशक्ती म्हणतात. मग हा परका जीव आईच्या उदरात रुजतोच कसा? वाढतोच कसा? मूळ धरायच्या आत समूळ उच्चाटन व्हायचं, तिथे भरण, पोषण, पालन, संवर्धन कसं होतं? या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत.

कल्पना करा की आईची प्रतिकारशक्ती बाळाचे ‘वेगळे’, आईला ‘परके’ असे रेणु, म्हणजे मुख्यत्वे प्रथिने, पाहू शकते. अशी रेणु/प्रथिने नजरेस पडली की ती त्यांचा नायनाट करणार. म्हणजे गर्भपात होणार. आईच्या प्रतिकारशक्तीची दृष्ट लागू नये म्हणून बाळाला अनेक पातळ्यांवर संरक्षण असते. त्यातील एक महत्वाचा अवयव म्हणजे वार. ह्या वारेतून बाळाला हवे ते पोहोचवले जाते आणि नको ते परत घेतले जाते. वारेत आई आणि बाळाचे रक्त आमनेसामने येतं; पण एकमेकांत मिसळत नाही. रक्त वेगवेगळं ठेवणारा पापुद्रा अनेक पदरी असतो. अश्वकुळातील (Genus Equus) प्राण्यांत हा सहा पदरी असतो (Epitheliochorial Placenta). त्यामुळे मातेच्या प्रतिकारशक्तीच्या अपरोक्ष बाळ सुखेनैव वाढत असतं. त्या तट्टाला मोठेपणी लागणारी बरीचशी प्रथिन-सामुग्रीही गर्भावस्थेतच प्राप्त होते.

माणसांत असं नसतं. माणसांत वारेचा हा पापुद्रा अगदी पातळ, म्हणजे तीनच पदरी (Hemochorial) असतो. त्यामुळे आईच्या प्रतिकारशक्तीच्या डोळ्यावर येणार नाहीत एवढीच आणि अशीच प्रथिने माणसाच्या बाळात असतात. पचन, चलनवलन, संरक्षण इत्यादीसाठी लागणारी संपूर्ण सामुग्री जन्मानंतर यथावकाश निर्माण होते. कारण ह्या निर्मिती दरम्यान बाळाचे अनन्य असे रेणु निर्माण होतात. ते जर आईच्या प्रतिकारशक्तीच्या नजरेस पडले तर आफतच. त्यामुळे माणसाचे बाळ जन्मतः खूपच हतबल असतं. घोड्याचं बाळ जवळपास घोडा म्हणूनच जन्माला येतं पण माणसाच्या बाळाचा ‘एवढा मोठा घोडा’ व्हायला बराच वेळ लागतो.

पण ह्या निव्वळ तीनपदरी वारेचा एक मोठाच फायदा असतो. गर्भावस्थेत मेंदूच्या जलद वाढीसाठी त्याला सतत ग्लुकोजचा खुराक लागतो. ही ग्लुकोजची रसद पुरवायची तर त्याला अशी पातळ वारच हवी. सहा पदरी वारेतून मिळणाऱ्या ग्लुकोजवर, माणसाच्या मेंदूएवढा मेंदू, पोसलाच जाणार नाही. म्हणजे बलिष्ठ मेंदू आणि हतबल, परावलंबी, प्रदीर्घ, शैशव हे माणसाच्या बाळाचे औत्क्रांतिक प्रारब्ध आहे.

अर्थात जन्मानंतरही मेंदूला ग्लुकोजचा खुराक लागतोच. तो आता स्तन्य देऊन पुरवावा लागतो. ह्या स्तन्यातील घटकही प्राण्यागणिक बदलत जातात. सील, डॉल्फिन वगैरेंच्या पिल्लांत मेंदूची बरीचशी वाढ गर्भावस्थेतच पूर्ण झालेली असते. त्यांच्या दुधात साखर (दुग्धशर्करा Lactose) जवळपास नसतेच. माणसाचा मेंदू जन्मोत्तरही उत्तरोत्तर वाढणारा. त्याला भूक फार. त्यामुळे माणसाच्या मादयांच्या दुधात दुग्धशर्करा (Lactose) भरपूर. शर्करा हे इन्स्टंट फूड आहे तर चरबी हे साठवून वापरता येईल असे अन्न आहे. पिल्ले सतत आसपास असणाऱ्या माणसाच्या माद्या शर्करायुक्त दूध स्त्रवतात. जरा भुकेजली की यांची पिल्ले लगेच लुचतात. पिल्लांना सोडून लांब लांब जाणाऱ्या, सिंहिणी, हरिणी वगैरे चरबीयुक्त दूध स्रवतात. आई पुन्हा परत येईपर्यंत त्यांची भूक भागली पाहिजे ना. व्हेलच्या पिल्लांना ऊब राखायला भरपूर चरबीची गरज असते. व्हेलीणीच्या दुधात निम्मी चरबी असते. म्हणजे साय किती निघेल ते बघा!!

जन्मानंतर माणसाचा ‘माते-बाहेरचा-गर्भवास’ (Exterogestation) सुरू होतो. आईला ह्याची मोठीच किंमत चुकवावी लागते. वारेतून पोसण्यापेक्षा स्तन्यावर बाळ पोसणे तसे ‘अवघड’ आणि ‘महाग’ असते. पण हा वरवर आतबट्याचा वाटणारा सौदा अंतिमतः फायद्यात पडतो. कारण गर्भाशयात जे शक्य नसते ते इथे सुरू होते. गर्भस्थ जीव आता समाजस्थ होतो. मेंदू इथे दुधावर पोसला जातो तसा आसपासच्या पर्यावरणावरही पोसला जातो. वास, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण अशा माध्यमातून; आई, बाबा, समाज यांच्या सान्निध्यातून, शिकत शिकत शेवटी माणसाचे पिल्लू भाषावधानी बनतं. उत्क्रांतीचं संचित ते बरोबर घेऊन आलेलं असतं; त्याला आता संस्कृतीचं संचित प्राप्त होणार असतं.

वानरी म्हणजे सुलभ प्रसूती आणि सबल पिल्लू. नारी म्हणजे अवघड बाळंतपण आणि अनघड पिल्लू. पण नारीचे पिल्लू आपल्या मेंदूच्या बळावर आज पृथ्वी व्यापून, सृष्टी समजावून घेत आहे. वानरीचे पिल्लू पिढ्यानपिढ्या जैसे थे आहे.

जीव सृष्टीतील सारेच जीव तसे एकमेवाद्वितीय. पण आपली मादी विते, म्हणजे त्यामागे इतके सगळे घडते, ही जाणीव, हे कौतुक, फक्त मनुष्यालाच प्राप्त होऊ शकते. सृष्टीतील काही अणुरेणू एकत्र आले आणि तुम्हांआम्हां हा मनुष्यदेह प्राप्त झाला. मग दुर्मिळ असा हा मनुष्यजन्म, पुनर्जन्माच्या पारलौकिक विवंचनेत वाया घालवायचा, का हे सृष्टीचे कौतुक जाणण्यासाठी सार्थकी लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

Thursday, July 23, 2020

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी.
Image may contain: 1 person, standingआटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावूं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून सांगितलं. धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करूं सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जियती उत्तर करिते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचीं आईबाप चिंता करीत बसलीं होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

मनाला मोठी चुटपुट लागली. घरीं आला. मोठ्या थाटानं मामदं केलं.त्या दिवशी शुक्रवार होता. गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करूं लागली. तो म्हणाल, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Tuesday, July 21, 2020

बुध-बृहस्पतींची कहाणी

ऐका बुधबृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहींत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, “आम्हीं संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे. आतां आम्ही पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासीं दर बुधवारीं आणि बृहस्पतवारीं जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावें पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढतें आहें.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हांकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा तीं अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागले, तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविलि. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढूं सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.

जशी त्यांवर बुध-बृस्पतींनीं कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Monday, July 20, 2020

मंगळागौरीची कहाणी

mangalagaur-kahaniआटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.

Sunday, July 19, 2020

प्रस्तावना : श्रावणातील कहाण्या

Image may contain: textमहाराष्ट्रात पूर्वीपासून श्रावणात कहाण्या सांगण्याची पद्धत आहे. या कहाण्यांतून अंधश्रद्धेची जोपासना हा मुख्य हेतू नव्हता तर समाजाला सामाजिक मूल्यांची जाणीव करून देवे हा प्रधान हेतू होता. मी शाळेत असताना माझ्या आजीला या कहाण्या त्या त्या सणाच्या दिवशी वाचून दाखवीत असे. आता आपला हा अमूल्य सामाजिक ठेवा लुप्त होऊ लागला आहे. म्हणून आपल्या आठवणी जगविण्यासाठी आणि नव्या पिढीला या ठेव्याची ओळख करून देण्यासाठी मी ही श्रावणातील कहाण्यांची लेखमाला आपल्या ग्रुपवर सुरु करीत आहे. सोमवारी यातील पहिली कहाणी असेल.
या कहाण्या मी लिहिलेल्या नाहीत तर आपल्या परंपरेतून आलेल्या आहेत. मी केवळ तुमच्यापर्यंत आणण्याचे काम करणारा भारवाही हमाल आहे.
#श्रावणातील_कहाण्या