Friday, December 8, 2023

सांख्य दर्शन ७ : उपसंहार

 गेला आठवडा आपण सांख्य दर्शनाचा अभ्यास करत होतो. हे इ.स. पूर्व ७०० वर्षे इतके प्राचीन दर्शन आहे.  भारतीय जनमानसावर सर्वात अधिक प्रभाव या दर्शनाचा आहे. 

'सत्कार्यवाद' हा या दर्शनाचा आधार आहे. म्हणजेच शून्यातून काही निर्माण होऊ शकत नाही असे हे दर्शन मानते, त्यामुळे या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या 'देवाने विश्व घडविले' या सिद्धांतास हे दर्शन विरोध करते. या विश्वाची 'पुरुष' आणि 'प्रकृती' ही दोन मूलभूत तत्वे असल्याचे हे दर्शन प्रतिपादन करते.

प्रकृतीमध्ये असीम शक्यता दडलेल्या आहेत. मात्र या शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी ती अस्वस्थ आहे. पुरुष हा केवळ चैतन्य आहे. अनुभवाशिवाय चैतन्यला अर्थ नाही. प्रकृती आणि पुरुष एकत्र आल्यावर प्रकृती पुरुषापुढे विश्व उभे करते. पुरुष त्याचा अनुभव घेण्यात अडकत जातो. आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हेच विसरतो. त्यामुळे तो दु:ख अनुभवतो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पुरुषाला आपल्या निरंजन चैतन्याची जाणीव होणे. याला या दर्शनात 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला ही जाणीव होण्यासाठी अनेक मार्ग या ऋषीमुनींनी दाखविले आहेत. आपण एक उदाहरण म्हणून त्यातील एका मार्गाची ओळख करून घेतली.

हे दर्शन प्रकृतीचा खोलात शिरून अभ्यास करते. प्रकृतीने हे विश्व आपल्यापुढे उभे केले आहे. आपल्या समस्याच या विश्वातील समस्याच आहेत. त्यामुळे आपल्या विविध ज्ञानशाखांनी आपल्या दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी याच दर्शनाचा आधार घेतला. आपण यापैकी एका ज्ञानशाखेचे उदाहरण पाहिले. 


प्राचीन भारतीय ज्ञान हे विविध शाखांच्या तुकड्यातुकड्यात निर्माण झालेले नाही. ते एकसंघ (streamlined) आहे. हेच आपल्या विविध ज्ञानशाखांचे वैशिष्ट्य आहे.  आयुर्वेदाचा अभ्यास सांख्यदर्शनाच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण राहील. असेच अन्य शाखांच्याबाबत आहे. 

एक भारतीय म्हणून आपल्याला सांख्य दर्शनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते. 

ही लेखमाला येथेच संपवितो. 
लेखनसीमा  !

Thursday, December 7, 2023

सांख्य दर्शन ६ : आयुर्वेद


सांख्यदर्शन हे आपले अतिप्राचीन दर्शन आहे. भारतीय माणसावर या दर्शनाने अनेक शतके प्रभाव टाकलेला आहे. 

वेदान्त दर्शन प्रामुख्याने हे विश्व 'माया' आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील समस्यांवर या दर्शनाच्या माध्यमातून उपाय शोधणे कठीण जाते. याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती अशी विभागणी करून प्रकृतीचा खोलात जाऊन वेध घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या विश्वातील विविध समस्यांची कारणे आणि उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा होतो. 

भारतीय आयुर्विज्ञान शास्त्र आयुर्वेद हे ही सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. यात आपल्या शरीरात 'कफ', 'पित्त' आणि 'वात' या तीन दोषांचे (गुणांचे) संतुलन असते असे मानले गेले आहे. हे दोष पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून तयार होतात. जर हे संतुलन बिघडले तर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात असे आयुर्वेद मानतो. हे संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी विविध रसायने आयुर्वेद सुचवितो. 


आकाश आणि वायू एकत्र येऊन 'वात' दोषाची निर्मिती होते. 'आकाश' आणि 'वायू' एकत्र आल्यामुळे 'हालचाल' हे वाताचे मुख्य लक्षण आहे. आपल्या शरीरातील आणि चित्तामधील चलनवलन यावर वातदोषाचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ रक्तप्रवाह, शरीरातील विषद्रव्यांचे निराकरण, श्वासोच्छवासाची प्रक्रिया, चेतासंस्थेचे कार्य, मनातील विचारांचा प्रवाह, सांध्यातील हालचाली इत्यादींवर वातदोषाचा प्रभाव असतो. वातदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'अग्नी' आणि 'जल' एकत्र येऊन 'पित्त' दोषाची निर्मिती होते. ही दोन पंचमहाभूते एकत्र आल्याने उष्णता, तरलता आणि स्निग्धता ही पित्ताची मुख्य लक्षणे आहेत. पचनसंस्था, त्वचा आणि त्वचेचा उजळपणा, शरीराचे तापमान यावर पित्तदोषाचा प्रभाव असतो. पित्तदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येऊ शकतो. 

पंचमहाभुतांमधील 'जल' आणि 'पृथ्वी' एकत्र येऊन 'कफ' दोषाची निर्मिती होते. 'पृथ्वी' हे अत्यंत स्थिर पंचमहाभूत आहे हे आपण जाणतोच.  संथपणा, स्थिरता, शांतता, गारवा ही कफदोषाची मुख्य लक्षणे आहेत. कफदोष असंतुलित झाल्यास शरीराच्या या कार्यात अडथळा येतो. 

आयुर्वेदात या तीन दोषांच्या संतुलनाचा विचार केला जातो. पण आपल्या शरीरावर 'प्रकृती' आणखीही वेगळ्या मार्गाने प्रभाव टाकत असते. जन्मत:च आपले शरीर संतुलित नसते. प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या दोषाचा अधिक प्रभाव असतो. आपले शरीर त्यानुसार विविध गोष्टींना प्रतिसाद देत असते. त्यामुळे आयुर्वेदिक औषध देताना आपल्या शरीरात मूलभूत कोणते दोष अधिक आहेत यावरही औषधयोजना ठरत असते. आपल्या शरीरात कोणता दोष अधिक आहे हे आपले आपल्याला ओळखता येते आणि त्याप्रमाणे आपण आपली काळजी घेऊ शकतो. हा विषय मोठा आहे आणि विस्तारभयास्तव येथे देता येत नाही. कधीतरी यावर विस्तृत लिहीन. 

आयुर्वेदाचा आधार 'सांख्यदर्शन' आहे.  सांख्यदर्शन भारतीय समाजात खोलवर मुरलेले आहे. 







Wednesday, December 6, 2023

सांख्य दर्शन ५ : कुंडलिनी ध्यान

 प्रकृती आपल्यातील असीम शक्यता दाखविण्यासाठी अस्वस्थ आहे. पुरुष (चैतन्य) विविध अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष एकत्र आले की एकमेकांना सहाय्यभूत होतात. परंतु आपला खेळ अधिकाधिक वेळ चालत राहावा म्हणून प्रकृती पुरुषाला आपल्यात अधिकधीक गुंतवत जाते. यात पुरुष आपण मुळात 'केवळ चैतन्य' आहोत हेच विसरतो. मग प्रकृतीमुळे मनात निर्माण होणारी सुख-दु:खे आपलीच आहेत असे समजू लागतो. हेच माणसाच्या दु :खाचे कारण आहे. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याची जाणीव होणे - म्हणजे कैवल्य प्राप्त होणे - हा या जीवनातील दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते. 

कपिल मुनींनी इ.स.पूर्वी सातशे वर्ष या काळात सांख्य दर्शन प्रतिपादन केले. त्यानंतर सत्तावीसशे वर्षात पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचे अनेक मार्ग सुचविले गेले. यापैकी एक मार्ग आहे 'कुंडलिनी ध्यान'. कुंडलिनी ध्यानाचा आधार सांख्य तत्वज्ञान आहे. 

पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून बाहेर यायचे असेल तर अत्यंत सावधपणे ज्या क्रमाने गुंतत गेलो त्याच्या विरुद्ध क्रमाने स्वत:ला सोडवून घ्यावे लागेल. म्हणजेच ज्या गोष्टीत शेवटी गुंतलो त्यातून प्रथम सुटका करावी लागेल. कोठल्याही जाळ्यात अडकलेल्या माणसाला अशाच क्रमाने जावे लागते. कुंडलिनी ध्यानात हाच क्रम आहे. 

पाठीच्या काण्यात प्रत्येक दोन मणक्यांमधून चेतातंतू बाहेर पडतात. यातील पाच ठिकाणे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली गेली आहेत. या शिवाय कपाळावरील दोन भुवयांमधील जागा (भ्रूमध्य) आणि डोक्याचा सर्वात वरचा भाग (टाळू) ही ठिकाणेही महत्वाची मनाली गेली आहेत. या ठिकाणांना 'चक्र' म्हणतात. ही सात चक्रे कुंडलिनी ध्यानात महत्वाची मनाली जातात. 

सर्वात खालचे गदद्वाराजवळचे मूलाधार चक्र  या चक्रावर  'पृथ्वी' या पंचमहाभूतांचे  वर्चस्व असते. त्यानंतर अनुक्रमे स्वाधिष्ठान चक्र (जल), मणिपूर चक्र (अग्नी), अनाहत चक्र (वायू) आणि घशातील विशुद्ध चक्र (आकाश) अशी चक्रे येतात. प्रकृतीच्या खेळातून बाहेर पडायचे असेल तर क्रमाक्रमाने मूलाधार चक्रापासून सुरुवात करून विशुद्ध चक्र जागृत करावे लागते. नंतर भ्रूमध्यातील आज्ञाचक्र आणि टाळूमधील सहस्त्रार जागृत करावे लागते. शेवटची दोन चक्रे आपल्या चित्ताशी संबंधित आहेत. अशा प्रकारे पुरुष ज्या क्रमाने प्रकृतीच्या जाळ्यात अडकला त्याच्या विरुद्ध क्रमाने सुटका करून घ्यावी लागते. 

पुरुषाला प्रकृतीच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी इतरही अनेक उपाय ऋषीमुनींनी शोधले आहेत. परंतु त्यावर माझा फार अभ्यास नाही. आपला नित्य व्यवहार प्रकृतीशी होत असल्याने सांख्य दर्शन आधारभूत मानून अनेक जीवनोपयोगी शास्त्रे विकसित झाली आहेत. उदा. योग, आयुर्वेद. आपण याबद्दल पुढील लेखात विचार करू. 

कुंडलिनी ध्यानासंबंधी विस्तृत विवेचन माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' विभागात आहे. 

Tuesday, December 5, 2023

सांख्य दर्शन ४ : सृष्टीची निर्मिती

 कोणत्याही गोष्टीची (Object) निर्मिती होण्यासाठी 'निमित्त कारण' आणि 'उपादान कारण' या दोन्हीची आवश्यकता  असते असे सांख्य दर्शन मानते. या सृष्टीच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे, तर 'प्रकृती' हे उपादान कारण आहे हे आपण मागील लेखात पाहीले. तसेच प्रकृती 'सत्व', 'रज' आणि 'तम' या तीन गुणांनी बनली आहे हे ही पाहिले.

प्रकृती तिच्यामधील असीम शक्यतांचे प्रदर्शन करता यावे/ प्रकटीकरण करता यावे  म्हणून सतत बेचैन असते. या उलट पुरुष हा केवळ चैतन्य आहे. समोरील गोष्टींना अनुभवणे हे चैतन्याचे कार्य आहे. पण समोर अनुभवण्यासाठी काहीही नसेल तर पुरुषाला आपल्यातील चैतन्य सिद्ध करता येत नाही. म्हणून पुरुष-प्रकृती एकत्र आले तर प्रकृतीला आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटन करता येते आणि चैतन्य ते अनुभवू शकते. 

पुरुष आणि प्रकृती एकत्र आल्यावर मूल प्रकृती (महत) सत्व गुणापासून प्रथम बुद्धी निर्माण करते. ही बुद्धी चेतनारहित असते. नंतर प्रकृती 'रज, गुणापासून अहंकार निर्माण करते. पुरुष एकदा अहंकाराच्या जाळ्यात फसला ही बाहेर येणे कठीण असते. हा अहंकार पुरुषामध्ये 'मी पणाची' भावना जागवितो. यानंतर प्रकृती जे निर्माण करेल ते 'माझे' आहे असे पुरुषाला वाटते. नंतर 'तम्' या गुणापासून   मनाचा जन्म होतो. मन, अहंकार आणि बुद्धी यांनी मिळून चित्त बनते. अहंकार राजस असल्याने सतत काहीतरी करावे, अधिक चांगले व्हावे असे वाटून बेचैन असतो. याउलट मन हे तामसिक असते. तामसिक असल्याने ते आळशी (Inert) असते, आपल्याजवळ अनेक आठवणींचा साठा करू शकते. म्हणूनच सात्विक बुद्धी, राजसिक अहंकार आणि तामसिक मन आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत. 

एकदा चित्ताचा जन्म झाला की प्रकृती आपला खेळ जोरात चालविते. तीन गुणांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टी (Objects - वस्तू आणि ऊर्जा) बनतात. या तीन गुणांमधील 'रज' हा गुण क्रियाशील असतो. त्यामुळे तीन गुणांचे मिश्रण होताना सत्व आणि रज तसेच रज आणि तम यांचे मिश्रण होताना दिसते. मात्र सुरुवातीला सत्व आणि तम यांचे मिश्रण होत नाही. 

सृष्टीची निर्मिती होताना प्रथम पंचमहाभुतांची निर्मिती झाली. यातही प्रथम सत्व गुणांपासून 'आकाश' उत्पन्न झाले. त्यानंतर क्रमाक्रमाने अन्य पंचमहाभूते उदयास आली. सत्व आणि रज यांच्या मिश्रणाने 'वायू' उत्पन्न झाला. रज गुणांपासून 'अग्नी' निर्माण झाला. रज आणि तमोगुणांच्या मिश्रणाने 'जल' हे पंचमहाभूत निर्माण झाले. शेवटी तमोगुणापासून पृथ्वीतत्वाची निर्मिती झाली. 

परंतु केवळ पंचमहाभूतांची निर्मिती होऊन त्याचा अनुभव पुरुष घेऊ शकणार नव्हता. या पंचमहाभूतांचा अनुभव पुरुषाला (चैतन्याला) घेता यावा म्हणून पंचमहाभूतांपासून तन्मात्रे उत्पन्न झाली. आकाशापासून 'शब्द' हे तन्मात्र बनले, वायूपासून 'स्पर्श', अग्नीपासून 'रूप', जलापासून 'चव' आणि पृथ्वीप्ससुन 'गंध' ही तन्मात्रे उत्पन्न झाली. 

केवळ तन्मात्रे उत्पन्न होऊन चालणार नव्हते. या तन्मात्रांचा अनुभव घेण्यास इंद्रिये आवश्यक होती. मग अनुक्रमे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. 

हा सृष्टीचा अनुभव चांगल्याप्रकारे यावा म्हणून पाच कर्मेंद्रिये निर्माण झाली. तोंड, हात, पाय, मलोत्सर्जनासाठी अवयव आणि पुनरुत्पादनासाठी अवयव ही ती  पाच कर्मेंद्रिये आहेत. 

प्रकृती कायम अस्वस्थ असते आणि सातत्याने आपापले रूप बदलत असते. याउलट पुरुष म्हणजेच चैतन्य स्थिर असते. पुरुष प्रकृतीच्या खेळात हळूहळू गुंतत जातो. अहंकारामुळे तो आपण कोण आहोत हेच विसरतो. यामुळे प्रकृतीच्या खेळात तो दु:ख अनुभवतो.  पुरुषाला आपण प्रकृतीच्यापेक्षा वेगळे असल्याची जाणीव होणे हाच दु:खमुक्तीचा मार्ग आहे असे सांख्य दर्शन मानते. 

पुरुषाला प्रकृतीच्या खेळाची जाणीव करून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनेक मार्ग अनुसरले. त्यातील एका मार्गाची ओळख आपण पुढील भागात करून घेऊ. 

Monday, December 4, 2023

सांख्य दर्शन - ३ : त्रिगुणात्मक प्रकृती

सत्कार्यवाद हा सांख्य दर्शनाचा पाया आहे हे आपण पाहीले. सत्कार्यवादानुसार कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी निमित्त कारण आणि उपादन कारण या दोन्हीची आवश्यकता असते. या विश्वाच्या निर्मितीसाठी 'पुरुष' हे निमित्त कारण आहे आणि 'प्रकृती' हे उपादान कारण आहे असे हे दर्शन मानते. पुरुष हे प्रत्येकाचे चैतन्य आहे तर प्रकृती ही चेतनाहीन  आहे. 

जेव्हा कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते तेव्हा तिच्यात उपादान कारणाचे काही गुणवैशिष्ट्य सापडू शकते असे सांख्य दर्शनकर्त्यांचे मत होते. मातीपासून मातीचा घट बनविला तर तो पाहून आपण तो मातीचा आहे, सोन्याचा नाही हे सांगू शकतो. कारण मातीचे काही गुण (उदा. रंग) त्या घटात आलेले असतात. तसेच ही सृष्टी बनताना प्रकृतीचे काही गुण सृष्टीत आले असणार असे त्या ऋषींनी मानले. 

जेव्हा त्यांनी सृष्टीचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना सृष्टीतील काही गोष्टी तेजस्वी (उदा. तारे) दिसल्या, काही गोष्टी गतिमान दिसल्या (उदा. ग्रह) तर काही गोष्टी एकाच ठिकाणी स्थिर आहेत, अंधाऱ्या आहेत असे दिसले. यावरून त्यांनी मूळ प्रकृतीतही ही तीन गुण असावेत असे मानले. या तीन गुणांना त्यांनी सत्व, रज आणि तम अशी नावे दिली. 

प्रकृतीमध्ये या तीन गुणांचे समत्व असते तेव्हा प्रकृती स्थिर असते. तिच्यात काहीही बदल होत नाहीत. परंतु काही कारणाने या तीन गुणांचे प्रमाण बदलते तेव्हा त्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणामुळे विविध गोष्टींची (Objects) निर्मिती होते. या विविध गोष्टी म्हणजे वस्तू अथवा ऊर्जा असू शकतात.  लाल, पिवळा आणि निळा या तीन मूलभूत रंगांच्या मिश्रणातून अनेक रंग बनू शकतात तसेच काहीसे हे आहे. 

पण ही तीन गुणांच्या समत्वाने बनलेली प्रकृती अस्थिर का होते? प्रकृतीमध्ये असीम शक्यता (Potential) दडलेल्या आहेत. परंतु प्रकृती स्थिर राहिल्यास या असीम शक्यतांचे प्रकटीकरण होण्यास वाव राहात नाही. आपल्यातील असीम शक्यतांचे प्रकटीकरण करण्यासाठी प्रकृती सतत अस्वस्थ असते. म्हणून प्रकृती अस्थिर होऊन (सत्व, रज आणि तम) गुणांचे विविध प्रकारे मिश्रण करून पुरुषासमोर - चेतनेसमोर एक विश्व उभे करते. 

पुरुषांची चेतना ही अनुभवाशिवाय निष्क्रिय असते. चेतनेचे अंतिम उद्दिष्ट विविध अनुभव घेणे हेच असते. प्रकृती  स्थिर असेल तर चेतनेला म्हणजेच पुरुषाला विविध घेता अनुभव येणार नाहीत. आपण 'चेतना' आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याला अनुभव घ्यावे लागतात. प्रकृती आणि पुरुष या दोघांच्याही अस्तित्वाला अर्थ येण्यासाठी त्यांनी एकत्र येणे आवश्यक असते. विश्वाची निर्मिती झाल्यावर पुरुष या विश्वातील अनुभव घेण्यात रमतो. त्यात तो प्रकृतीच्या जाळ्यात गुंतत जातो. 

सत्व, रज आणि तमोगुणांच्या सहाय्याने प्रकृती क्रमाक्रमाने विश्वाची निर्मिती कशी करते, त्यात पुरुष कसा गुंतत जातो आणि त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे पुढील काही लेखांत पाहू. 

सांख्य दर्शन -२ : सत्कार्यवाद

 सांख्य दर्शन हे अत्यंत प्राचीन दर्शन आहे. इ.स. पूर्व ७०० या कालखंडातील कपिल मुनी या दर्शनाचे प्रवर्तक समजले जातात हे आपण मागील लेखात पाहिले. 


'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा पाया आहे. आपण अद्वैत वेदांत दर्शनाचा अभ्यास करताना 'सत्' शब्दाचा अर्थ पाहिला आहे. सत् म्हणजे 'अस्तित्व'. कोणतीही गोष्ट शून्यातून अस्तित्वात येऊ शकत नाही. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट अस्तित्वात येते असे सत्कार्यवाद मानतो. (आधुनिक विज्ञान असेच मानते). 'माती' या कारणावर 'कार्य' घडून 'घट' बनतो, 'दुध' या कारणावर कार्य घडून 'दही' बनते.


'कारण' हे ही दोन प्रकारचे असते. एखादे कार्य घडण्यास ही दोन्ही प्रकारची कारणे आवश्यक असतात. मातीपासून घट बनविण्यासाठी केवळ माती असून पुरेसे नसते. घटाची निर्मिती करणारा कुंभारही आवश्यक असतो. म्हणजेच कुंभाराची चेतना आवश्यक असते. कुंभार हे 'निमित्त' कारण आहे. तर माती हे 'उपादान' कारण आहे.

हा सत्कार्यवाद कपिलमुनींच्या आधीच्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाच्या प्रतिपादनाला छेद देणारा आहे. न्याय आणि वैशेषिकांच्या मते या विश्वाला देवाने/परमेश्वराने घडविले. कपिल मुनींच्या मते हे केवळ 'निमित्त कारण' आहे. मात्र त्यातून 'उपादान कारणाचा' बोध होत नाही.

कपिल मुनींनी विश्वाच्या उपादान कारणाला 'प्रकृती' असे नाव दिले. विश्वाचे निमित्त कारण 'पुरुष' हे आहे. अर्थात पुरुषाची चेतना हे आहे. मात्र विश्वाच्या निर्मितीनंतर प्रकृतीच्या खेळात पुरुष फसत जातो. आपले स्वतंत्र अस्तित्व तो विसरतो. मानवी दु:खाचे हेच मूळ कारण असल्याचे सांख्य दर्शन मानते. पुरुषाला आपण प्रकृतीपासून वेगळे असल्याचे उमगणे - म्हणजेच पुरुष कैवल्याला पोचणे - हा दु:खमुक्तीचा मार्ग असल्याचे सांख्य दर्शन प्रतिपादन करते.

पुढील काही लेखात आपण 'पुरुष या प्रकृतीच्या खेळात कसा फसत जातो आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग' पाहू. तसेच प्रकृती कशी बनली आहे, तिची तत्वे याचा विचार करू. आयुर्वेद, योगशास्त्र, कुंडलिनीविद्या, तंत्रशास्त्र, शिवस्वरोदय शास्त्र अशा अनेक प्राचीन विद्यांचा आधार प्रकृतीची तत्वे आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

Sunday, December 3, 2023

सांख्य दर्शन

 

आपण अद्वैत दर्शन खूप खोलात जाऊन पहिले. आता सांख्य दर्शनाकडे वळू. माझा सांख्य दर्शनावर अद्वैत वेदांत दर्शनाएवढा सखोल अभ्यास नाही. आपण मला समजून घ्याल अशी आशा. 

सांख्य दर्शन हे खूप प्राचीन दर्शन आहे. कपिल मुनी याचे प्रणेते आहेत. कपिल मुनींचा काळ हा इसवीसन पूर्व सातशे वर्ष मानला जातो. न्याय आणि वैशेषिक दर्शन या पूर्वीचे आहेत.  'सांख्य प्रवचन सूत्र' हा कपिलमुनींनी लिहिलेला ग्रंथ या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ आहे. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. त्यानंतर अनेक ऋषींनी यावर ग्रंथ लिहिले आहेत. इसवीसन   पूर्व ३०० च्या सुमारास ईश्वरकृष्ण ऋषींनी 'सांख्य कारिका' हा ग्रंथ लिहिला आहे.  आज हा ग्रंथ सांख्यदर्शनाचा प्रमाण ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो

आपण आधी अभ्यासलेला अद्वैत वेदांत हा 'विश्व हे सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे' असे मानतो. अद्वैत वेदांताची संपूर्ण मांडणी ही मायेचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झालेली आहे. मायेचे अस्तित्व लक्षात आले आणि ब्रह्माचा क्षणोक्षणी अनुभव येऊ लागला की आपण मुक्त असल्याची प्रचिती येते असे हे दर्शन मानते. जागृतावस्थेत विश्व हे ब्रह्माचे विवर्त असल्याने त्याचा फार खोलात जाऊन अभ्यास या दर्शनात नाही.

याउलट सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती या भिन्न गोष्टी आहे असे मानते. प्रकृती (जागृतावस्थेतील विश्व) का आणि कशी निर्माण झाली हे शोधण्याचा प्रयत्न हे दर्शन करते. यामुळे जागृतावस्थेतील विश्वात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न या दर्शनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. हेच या दर्शनाचे बलस्थान आहे. यामुळेच भारतवर्षात 'योग', 'आयुर्वेद', 'कुंडलिनी विद्या', 'शाक्तविद्या', 'शिवस्वरोदय शास्त्र' यासारख्या नित्य जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक विद्या या दर्शनातूनच निर्माण झाल्या. कदाचित यामुळेच हे दर्शन गेली कित्येक शतके भारतीय जनमानसावर आपला प्रभाव टिकवून ठेवत आहे.

सांख्य दर्शन काय आहे ते पुढील लेखापासून बघू.

Saturday, November 25, 2023

सर्वं खल्विदं ब्रह्म

 

गेले काही दिवस आपण अद्वैत वेदांताची मांडणी बघत आहोत.

अद्वैत वेदांतानुसार सगळे विश्व (आणि अन्य विश्वे) सत्-चित्-आनंद स्वरूपी ब्रह्म आहे. विश्वाचे 'अधिष्ठान' ब्रह्म आहे. त्यावर मायेने 'नाम-रुपाचे' पांघरूण घातले आहे. पण या पांघरूणाआडूनही ब्रह्म डोकावत असते. आपण कधीही ते अनुभवू शकतो. हे आपण पाहीले. मात्र या ब्रह्माची जाणीव होण्यासाठी आपण जागृत हवे. मनाची जागरूकता कशी वाढवायची?
यासाठी दोन मार्ग आहेत. 'भक्तिमार्ग' आणि 'ध्यानमार्ग' . दोनपैकी कोठलाही मार्ग आपल्याला निवडता येतो. आपापल्या स्वभावानुसार आणि मागील जन्मातील वाटचालीनुसार हा मार्ग निवडायचा असतो. आपला मार्ग कुठला हे समजत नसेल तर सुरुवात दोन्ही मार्गांनी करावी. जो आपला मार्ग असेल त्यात प्रगती वेगाने होते. आपोआप आपल्याला आपला मार्ग कळतो.
यासाठी 'गुरु'ची आवश्यकता कितपत आहे? मला निश्चित सांगता येणार नाही. माझा प्रवास अंत:प्रेरणेने झाला. भगवान शिव हेच माझे या जन्मातील गुरु आहेत असे मी मानतो. माझ्या प्रवासात मला वेळोवेळी अनेक मार्गदर्शक भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रवास सुकर झाला. परंतु ते माझे गुरु नव्हेत. गुरूंसमोर संपूर्ण समर्पण करायचे असते. गुरु जे सांगेल ते मनात कोठेही किंतु न आणता करायचे असते. म्हणूनच केवळ भगवान शिव हेच माझे गुरु आहेत असे मी मानतो. जर गुरु निवडायचाच असेल तर फार काळजीपूर्वक निवडावा लागतो. अर्धाकच्चा गुरु असेल तर तो त्याच्या मार्गानेच जाण्याचा आग्रह धरण्याची शक्यता असते. आणि त्याचा मार्ग हा आपला मार्ग नसू शकतो.
अनेक वेळा भक्तिमार्ग अथवा ध्यानमार्गाने बराच काळ प्रवास करूनही ब्रह्माची प्रचिती येत नाही, मन स्थिर होत नाही. याचे कारण म्हणजे मालिन चित्त. मालिन चित्त कधीही स्थिर होत नाही. चित्ताची मलिनता दूर करण्यासाठी गीतेत 'कर्मयोग' सांगितला आहे. पातंजल योगात 'यमनियम' सांगितले आहेत. तसेच बौद्ध आणि जैन धर्मातही उपाय सांगितले आहेत.
आपल्याला आपला योग्य मार्ग लवकर मिळावा आणि या जन्मातच ब्रह्मज्ञान व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ही मालिका येथेच संपवितो आहे.

लेखनसीमा.
संतोष कारखानीस ठाणे.

Friday, November 24, 2023

माया

 

माया ही अद्वैत वेदांतातील महत्वाची संकल्पना. विश्व हे केवळ सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्म आहे आणि त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे असे हे दर्शन मानते. आपल्याला प्रतीत होणारे, आसपास आपण अनुभवतो ते सगळे 'माया' कसे असेल हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. म्हणूनच 'माया' हे सामान्य साधकांसाठी कायम एक गूढ राहिले आहे.

प्रथम हे लक्षात घेऊ की 'माया' ही ब्रह्मापासून वेगळी नाही. ती ब्रह्माची एक 'शक्ती' आहे. तिच्यात 'आवरणशक्ती' आणि 'विक्षेपशक्ती' या दोन शक्ती सामावलेल्या आहेत. आवरणशक्ती सत्य गोष्टींवर पांघरूण घालते तर विक्षेप शक्ती आहे त्या गोष्टींना वेगळेच आहे असे भासविते. उदाहरणार्थ अंधारात एक दोर पडला आहे. आवरणशक्ती त्या दोराच्या खऱ्या स्वरूपावर आवरण घालते आणि विक्षेपशक्ती त्या दोराच्या जागी सर्प आहे असा आभास निर्माण करते. मात्र माया या दोराला संपूर्ण झाकू शकत नाही. आपल्याला भासणाऱ्या सर्पाची लांबी, जाडी, वेटोळे घालण्याची ढब इत्यादी त्या दोरापासूनच आलेले असते. मायेच्या आडून ब्रह्म असेच डोकावत असते. आपण जागरूक असू तर हे क्षणोक्षणी दिसणारे ब्रह्म ओळखू शकू. हाच मुक्तीकडे जाणारा मार्ग आहे.
आपण 'अधिष्ठान' या संकल्पनेचा विचार करताना पाहिले की मातीच्या घटाचे अधिष्ठान 'माती' आहे. हा घट फोडला तर केवळ माती शिल्लक राहील. त्या मातीपासून आपण अन्य वस्तू बनवू शकू. म्हणजेच तो घट हा केवळ मातीला दिलेले एक रूप आहे. त्या रुपाला आपण 'घट' हे नाव आपल्या सोयीसाठी दिले आहे. वस्तूत: ती केवळ माती आहे. या नावामुळे व्यवहारात या घटाचा उपयोग करणे आपल्याला सोयीचे होते.
समुद्रात लाटा उसळत असतात. प्रत्येक लाटेचे अधिष्ठान 'पाणी' आहे. लाटा या केवळ पाण्याला आलेले रूप आहे. त्याला 'लाट' हे नाव आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी दिले आहे. लाट किनाऱ्याला येऊन नष्ट होईल. त्यातील पाणी परत सागराला मिळेल. त्यातून नवी लाटही तयार होईल. तसेच दागिन्यांचे अधिष्ठान सोने आहे. एक दागिना मोडून आपलं दुसरा करू शकतो. तो दागिना हा केवळ सोन्याला दिलेले रूप आहे. आणि त्या रुपाला आपण 'बांगड्या', 'पाटल्या', 'हार' इत्यादी नावे आपल्या सोयीसाठी देतो.
अगदी अशाच पद्धतीने आपण पाहिले होते की या विश्वाचे अधिष्ठान 'सत्' म्हणजेच 'अस्तित्व' आहे, अर्थात ब्रह्म आहे. या अस्तित्वाला - आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या वस्तूंना-उर्जेला-शक्तींना मायेने काही रूप दिले आहे, त्या रुपाला आपण व्यवहारातील सोयीसाठी नावही दिले आहे. पण ते केवळ अस्तित्व आहे , ब्रह्म आहे. हेच सत्-चित् -आनंद रुपी ब्रह्मावर मायेने घातलेले 'नाम-रूपाचे' पांघरूण'. आपण जागरूक असू तर क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तूतून आपल्याला अस्तीत्व म्हणजेच 'ब्रह्म' जाणवत असते. या जागरूकतेतूनच आपला मुक्तीचा प्रवास सुरु होतो. अशी अखंड जागरूकता म्हणजेच 'मुक्ती'.
नित्य व्यवहारात आपली जागरूकता वाढविण्यासाठी काय करावे लागेल, त्यात येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करायची हे पुढील लेखात पाहू.
संतोष कारखानीस ठाणे

Thursday, November 23, 2023

प्रकटीकरण

आज आपण विविध गोष्टींच्या प्रकटीकरणासंबंधी थोडा विचार करू. मी जेव्हा गोष्ट असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ Objects असा आहे. Objects म्हणजे चैतन्य अनुभवू शकते अशा सर्व गोष्टी. यात केवळ भौतिक वस्तू नव्हे, तर विविध ऊर्जा, शक्तीही येतात.

एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असेल तरी ती अनुभवण्यासाठी तिचे प्रकटीकरण व्हावे लागते. सूर्यप्रकाश संपूर्ण अंतराळ व्यापून राहिला आहे. परंतु अवकाशात गेल्यावर अंतराळवीरांना आकाश अंधारे भासते. एखादी वस्तू अंतराळात असेल तर ती प्रकाशमान झाल्यामुळे तेथे प्रकाश आहे हे कळते. अंधाऱ्या खोलीतही प्रकाशाची तिरीप आल्यास वाटेतील धूलिकणांमुळे त्या प्रकाशाच्या येण्याचे अस्तित्व जाणवते. म्हणजेच प्रकाशाच्या प्रकटीकरणासाठी वाटेत एखाद्या वस्तूची गरज आहे, एखाद्या माध्यमाची गरज आहे.
तसेच चैतन्य संपूर्ण विश्व व्यापून राहिले आहे. एखादी निर्जीव वस्तू असेल त्यात चैतन्य असतेच. परंतु तेथे त्या चैतन्यला प्रकट होण्यास वाव मिळालेला नसतो. चैतन्य प्रकट होण्यासाठीचे माध्यम म्हणजे सूक्ष्म शरीर. त्याच्या साहाय्यानेच चैतन्य प्रकट होते. अंत:करण हा सूक्ष्म शरीराचा भाग आहे. त्यात चैतन्याची प्रतिमा उमटते आणि अंत:करणाच्या अहंकार या भागाशी एकरूप होऊन चेतासंस्थेच्या साहाय्याने संपूर्ण शरीरात पसरते. अहंकाराशी एकरूप झाल्याने आपल्याला हे चैतन्य 'माझे' आहे असे वाटते. परंतु विश्वात पसरलेल्या चैतन्याचा केवळ तो एक भाग असते.
ब्रह्म सत्-चित्-आनंद स्वरूपी आहे. चित् म्हणजेच चैतन्य. संपूर्ण विश्व चैतन्यमय म्हणजेच ब्रह्ममय आहे. मी चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे.
अहम् ब्रह्मास्मि |
संतोष कारखानीस ठाणे

Wednesday, November 22, 2023

अंगभूत गुणधर्म आणि उधार गुणधर्म

आता अद्वैत वेदान्तामधील आणखी एक संकल्पना पाहू. ही संकल्पना समजण्यास खूप सोपी आहे. 'अंगभूत गुणधर्म आणि उधार गुणधर्म' .
एका चुलीवर भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याची उष्णता हा त्या पाण्याचा मूलभूत गुणधर्म नाही. तो त्याने भांड्याकडून 'उधार' घेतला आहे. पाण्याचा आकार हा ही भांड्याकडून उधार घेतला आहे. मात्र पाण्याचे वस्तुमान हा पाण्याचा मूलभूत गुणधर्म आहे. पाणी दुसऱ्या भांड्यात ओतले तर ते थंड होईल. त्याचा आकारही बदलेल.
तसेच भांड्याची उष्णता हा भांड्याचा मूलभूत गुणधर्म नाही. त्याने तो खालच्या चुलीच्या जाळाकडून उधार घेतला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हे त्या भांड्याचे मूलभूत गुणधर्म आहेत. भांडे चुलीवरून उतरवले तरी त्याचा आकार तोच राहील.
चुलीच्या जाळाचा मात्र उष्णता हा मूलभूत गुणधर्म आहे. ही उष्णता जाळाकडून भांड्याकडे आणि भांड्याकडून पाण्याकडे जाते. चुलीखालचा जाळ काढून घेतला तर भांड्यातील आणि पाण्यातील उष्णता निघून जाईल.
तसेच चैतन्य हा आपल्या शरीराचा मूलभूत गुणधर्म नाही. आपल्या शरीराने तो आपल्या सूक्ष्म शरीराकडून घेतला आहे. सूक्ष्म शरीराने तो ब्रह्माकडून घेतला आहे. म्हणूनच सूक्ष्म शरीराने स्थूल शरीराचा काही कारणाने त्याग केला की आपले जड शरीर चैतन्यहीन होते.
संतोष कारखानीस ठाणे

#santoshkarkhanisthane #advaita 

Tuesday, November 21, 2023

वृत्ती

 या पूर्वी आपण साक्षी, विवर्त, उपाधी आणि अधिष्ठान या अद्वैत वेदांतातील चार महत्वाच्या संकल्पनांसंबंधी माहिती घेतली. या चार संकल्पनांवर अद्वैत तत्वज्ञानाची उभारणी झालेली आहे असे म्हणता येईल. आता आपण भारतीय तत्वज्ञानातील अन्य एका संकल्पनेची माहिती करून घेऊ.

'वृत्ती' हा शब्द मराठी भाषेत रुजला आहे. त्याचा मूळ अर्थ आता आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूची कार्यपद्धती बघावी लागेल. मेंदूत अनेक पेशी असतात. त्यांना चेतापेशी म्हणतात. त्यातून चेतातंतू शरीराच्या भागात गेले असतात. हे चेतातंतू सतत मोठ्या प्रमाणात माहिती मेंदूकडे आणत असतात. या माहितीचे पृथकारण करून ती माहिती योग्य ठिकाणी साठविण्याचे काम मेंदू करत करत असतो. याच वेळी मेंदूत साठविलेल्या प्रचंड माहितीतील योग्य माहितीतील माहितीचे पृथकारण करून योग्य त्या अवयवांना कृती करण्याचे आदेश देण्याचे कामही मेंदू करत असतो. या सगळ्यासाठी मेंदूला खूप मोठी Processing Capacity ची आवश्यकता असते. परंतु मेंदूची Processing Capacity केवळ १२० bits/second एवढीच आहे.
याचाच अर्थ मेंदूकडे येणाऱ्या सगळ्या माहितीचे पृथकारण मेंदू करू शकत नाही. त्यातही आधी साठविलेल्या माहितीचे पुनराविलोकन (Retrival) मेंदू करत असेल तर सर्व अवयवांकडून आलेल्या फारच थोड्या माहितीचे पृथकारण होऊ शकते. अशावेळी मेंदू कोठल्या अवयवांकडून येणाऱ्या माहितीचे पृथकारण करायचे याचा निर्णय घेतो. यालाच त्या विषयीची वृत्ती आपल्या मनात जागृत झाली असे म्हणतात.
मी शाळेत वर्गात बसलो आहे. शिक्षक शिकवीत आहेत. मला तो विषय शिकण्याची इच्छा जागृत झाली तर त्या विषयाच्या वृत्तीने माझे मन व्याप्त झाले असे म्हणता येईल. मग माझ्या डोळ्यांकडून आणि कानांकडून हेणाऱ्या संदेशांचे मेंदू ग्रहण करून पृथकारण करेल आणि मला तो विषय समजेल. एखाद्या विषयाचे ज्ञान होण्यासाठी त्या विषयाची वृत्ती मनात जागणे आवश्यक आहे.
एखादी अंधारी खोली आहे. त्यातील एका कोपऱ्याचे ज्ञान करून घ्यायचे आहे. खोलीच्या खिडकीत ऊन येत आहे. आपण एक आरसा घेऊन त्याचा कवडसा त्या खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पाडून त्या कोपऱ्याचे ज्ञान मिळवू शकतो. आपल्याला हव्या त्या जागी तो कवडसा फिरवून ज्ञान घेता येईल. मात्र तो आरसा लहान असल्याने एकाच वेळी खोली उजळू शकणार नाही.
चैतन्याचा सूर्य आकाशात तळपत आहे. आपल्या मनाच्या आरशाच्या साहाय्याने चैतन्याचा कवडसा एखाद्या गोष्टीवर टाकून हवे ते ज्ञान मिळवू शकतो. मात्र आपल्याला सूर्याचे ज्ञान हवे असेल तर मनाच्या आरशाने सूर्यावर कवडसा पाडण्याची गरज नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसेच चैतन्य स्वयंप्रकाशित आहे. प्रत्येक क्षणी आपल्याला चैतन्याची जाणीव असते. त्याच्या साहाय्यानेच आपण ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. त्यासाठी चैतन्याची वृत्ती जगविण्याची गरज नाही.
चैतन्यमय जीवनासाठी शुभेच्छा.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, November 20, 2023

साक्षी

 'साक्षी' ही केवळ अद्वैत वेदांतातील नाही, तर सर्वच भारतीय दर्शनांतील एक मूलभूत संकल्पना आहे.

साक्षीचे इंग्रजीत भाषांतर 'Observer' असे सर्वसाधारणपणे केले जाते. पण यात त्यातील सगळा अर्थ येत नाही. साक्षी हा Observer असतोच, पण त्या निरीक्षणाच्यामध्ये त्याची मानसिक गुंतवणूक नसते. तो त्रयस्थ असतो.
डोळे आसपासच्या गोष्टी बघतात. डोळे या गोष्टींचे 'साक्षी' असतात. म्हणूनच डोळे आणि ते बघत असलेल्या गोष्टी भिन्न असतात. डोळे स्वत:लाच बघू शकत नाहीत. फार तर आरशात डोळ्याचे प्रतिबिंब तो डोळा बघू शकेल. मेंदू आपल्या डोळ्यांनी पाठविलेले संदेश ग्रहण करू शकतो, अनुभवू शकतो. मेंदू डोळ्यांचा साक्षी आहे असे म्हणता येईल. मेंदू (अथवा मन) डोळ्यांनी पाहिलेले आपल्या चैतन्यासमोर उभे करतो. आपले चैतन्य हे मेंदूचे साक्षी आहे. म्हणूनच आपले चैतन्य (म्हणजेच आपण)आपल्या मनापेक्षा, मेंदूपेक्षा, शरीरापेक्षा वेगळे आहे. चैतन्य या गोष्टी कोणासमोरही उभ्या करत नाही. ते अंतिम साक्षी आहे. हे अंतिम साक्षी असलेले चैतन्य हीच आपली ओळख आहे.
आपले चैतन्य, म्हणजेच आपण केवळ साक्षी आहोत. मनात उद्भवणाऱ्या भाव-भावना, सुख-दु:ख यांचे चैतन्य केवळ साक्षी आहे. आपण निराश झालो तर त्या मनातील नैराश्याचे चैतन्य (म्हणजेच आपण) केवळ साक्षी असते. त्या नैराश्याचा 'आपल्यावर' काहीही परिणाम होत नाही, चैतन्यावर साधा ओरखडाही उठत नाही.
या साक्षीभावासंबंधी आपले तत्वज्ञान पूर्वीपासून सांगत आहे. परंतु विज्ञानातील नव्या संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडत आहे. १९८० साली जर्मन शास्त्रज्ञ H. Dieter Zeh यांनी केलेल्या डबल स्लिट एक्सपेरिमेंट - कोपनहेगन इंटरप्रिटेशन प्रयोगात असे दिसून आले की तरंग स्वरूपात असलेला फोटॉन निरीक्षण केले असता कण स्वरूपात येतो. याचा अर्थ कसा लावायचा याबद्दल अजून शास्त्रज्ञांत एकमत झालेले नाही. परंतु 'निरीक्षक' म्हणजेच 'साक्षीत्वा'मुळे हे विश्व उदयास येते का, 'हे विश्व केवळ चैतन्यात उदयास येते का' असा मूलभूत प्रश्न यामुळे पुढे आला आहे.
विज्ञान त्याच्या परीने उत्तर शोधेल. पण आपण हा साक्षीभाव जागवू आणि सुख-दु:खापासून स्वत:ला दूर ठेऊ.
संतोष कारखानीस ठाणे

Sunday, November 19, 2023

अधिष्ठान

 'अधिष्ठान' ही अद्वैत वेदांतातील आणखी एक महत्वाची संकल्पना... 'विवर्त' आणि 'उपाधी' या संकल्पनांविषयी आपण आधी जाणून घेतले आहे.

ही संकल्पना काही उदहरणांनी समजून घेऊ. दगिन्यांतून सोने काढून घेतले तर दागिने राहाणार नाहीत. मात्र वितळवून दागिना नष्ट केला तरी सोने तसेच राहील. त्याचे अन्य दागिने बनविता येतील. सोने हे दगिन्यांचे अधिष्ठान आहे.
मातीच्या घटातून माती काढून टाकली तर घट रहाणार नाही. मात्र मातीतून घट काढला, म्हणजेच तो घट फोडला तरी माती शिल्लक राहील. त्या मातीपासून अन्य वस्तू बनविता येतील. माती हे त्या घटाचे अधिष्ठान आहे.
त्याचप्रमाणे 'अस्तित्व' (ज्याला 'सत्' असेही म्हणतात) हे या विश्वाचे अधिष्ठान आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट (Matter, Energy) अस्तित्वाने परिपूर्ण आहे. त्यातून अस्तित्व काढून टाकले तर ती गोष्ट राहणार नाही. एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट बनते तेव्हा पहिली गोष्ट नष्ट होते, पण अस्तित्व नष्ट होत नाही. ते दुसऱ्या गोष्टीच्या रूपाने दिसते. या विश्वाचा जेव्हा लय होईल तेव्हाही सर्व गोष्टी नष्ट होतील, पण अस्तित्व हे 'केवळ अस्तित्व' या रूपात उरेल, त्याचे Potential शाबूत असेल. त्यातून पुढे नवे विश्व आकाराला येईल.
ब्रह्म सत्-चित्-आनंद स्वरूपात आहे. आपल्या सगळ्यांचे अधिष्ठान अस्तित्व - अर्थात 'सत्' - आहे हे आपण पाहिलेच. म्हणजेच आपले अधिष्ठान ब्रह्म आहे. आपण ब्रह्मस्वरूपी आहोत.
अहम् ब्रह्मास्मि |
संतोष कारखानीस ठाणे

Saturday, November 18, 2023

उपाधी

 'उपाधी' हा अद्वैत वेदान्तामधील आणखी एक महत्वाची संकल्पना.

हा शब्द मराठीमध्येही अनेक वेळा वापरला जातो. पण त्यावेळी त्याचा मूळचा संस्कृतमधील अर्थ विसरला जातो. अनेकवेळा उपाधी हा शब्द 'विशेषण' अथवा 'पदवी' या अर्थाने वापरला जातो.
एखाद्या गोष्टीच्या सानिध्यामुळे त्या गोष्टीचे गुण दुसऱ्या गोष्टीचे आहेत असे वाटणे म्हणजे उपाधी. उदाहरणार्थ एखाद्या पारदर्शक काचेच्या लोलकामागे (Crystal) लाल जास्वंदीचे फुल ठेवले असता तो लोलक लाल भासतो. लोलकाला लाल रंग आलेला नसतो. केवळ त्या लाल फुलाच्या सानिध्यामुळे लोलकाचा रंग तसा भासतो. फुल दूर केले असता लोलक रंगहीनच आहे हे लक्षात येते.
ब्रह्म अथवा साक्षीचैतन्य आकाशात अविरत तळपत असते. आपल्या सूक्ष्म शरीराच्या अंत:करण या भागात त्याचे प्रतिबिंब पडते. अंत:करणाचे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे भाग आहेत. हे साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब अहंकार या भागाशी एकरूप होऊन चेतासंस्थेमार्फत संपूर्ण शरीरात पसरते. आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. आपल्या मनात उमटणाऱ्या भावभावना 'उपाधी'मुळे (मनाच्या सानिध्यामुळे) आपल्या चैतन्यातच उमटल्या आहेत असे आपल्याला वाटते. खरे तर आपले चैतन्य कायम निरामय, निरंजन असते. मनात उमटणाऱ्या भावभावनांचा, सुखदु:खाचा त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नसतो.
आपण आपल्या कायम निरामय असलेल्या चैतन्यला जाणून घेऊ.
संतोष कारखानीस ठाणे

Friday, November 17, 2023

विवर्त

'विवर्त' हा अद्वैत वेदांताचा पाया आहे असे म्हणावे लागेल. सत्य हे अनेक पातळ्यांवर असते असे हा सिद्धांत सांगतो.
वाळवंटात मृगजळ दिसते. ते आपल्या दृष्टीच्या पातळीवर सत्य असते. परंतु प्रत्यक्षात (सत्याच्या अधिक उच्च पातळीवर) ते केवळ वाळवंट असते. मृगजळ हे वाळवंटाचे 'विवर्त' आहे. अंधारात पडलेला दोर हा सापासारखा भासतो. दृष्टीच्या पातळीवर तो सर्प सत्यच असतो. सर्प हे त्या दोराचे 'विवर्त' आहे.
झोपेत स्वप्न पडते. स्वप्नाच्या पातळीवर ते सत्यच असते. मात्र जागृतावस्थेच्या पातळीवरील सत्य हे स्वप्नावस्थेतील सत्यापेक्षा उच्च पातळीवर असते. स्वप्नातील सत्याला कच्चा माल जागृतावस्थेतील मन अथवा घटना पुरवीत असतात. स्वप्न हे जागृतावस्थेचे 'विवर्त' आहे.
ही सर्व उदाहरणे आपल्या नित्य अनुभवातली आहेत, सहज समजणारी आहेत. म्हणूनच याचा अधिक विचार करता जागृतावस्था ही सुद्धा एक विवर्त आहे हे सहजपणे पटते. ब्रह्मावस्थेतील सत्य हे जागृतावस्थेतील सत्यापेक्षा उच्च पातळीवर असते. जागृतास्थेतील घटनांना कच्चा माल ब्रह्मावस्थेकडूनच येतो. जागृतावस्था हे ब्रह्मावस्थेचे विवर्त आहे.
जागृतावस्था हे ब्रह्मावस्थेचे विवर्त असण्याची संकल्पना समजली की तत्वज्ञानातील अनेक जटील प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. ब्रह्मावस्थेतील एक सर्वशक्तिमान परमात्मा (ब्रह्म) आणि जागृतावस्थेतील अनेक देव-देवता यात काही विरोधाभास दिसत नाही. जागृतावस्थेतील देवदेवता या ब्रह्माचे विवर्त आहेत. त्यांना शक्ती ब्रह्माकडूनच प्राप्त झाल्या आहेत. त्याही आपल्यासारख्या ब्रह्मस्वरूपच आहेत हे लक्षात येते. मग त्यांना आपल्यासारख्याच भाव-भावना असणे यात काहीच गैर वाटत नाही. जसे स्वप्नात झालेल्या रोगावर इलाज स्वप्नातील डॉक्टरकडूनच करावे लागतात. जागृतावस्थेतील डॉक्टरांचा तेथे उपयोग नसतो, तसेच जागृतास्थेतील आपल्या समस्यांवर उपाय या विश्वातील (विवर्तातील) देव-देवतांकडूनच होऊ शकतात - ब्रह्मावस्थेतील ब्रह्माकडून नाही हे लक्षात येते. आपले तत्वज्ञान अब्राहमीक (मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू) तत्वज्ञानापेक्षा कसे वेगळे आहे हे कळते.
आपण आपल्या तत्वज्ञानातील 'विवर्त' ही वैशिष्टपूर्ण संकल्पना नीट समजून घेऊ.
संतोष कारखानीस ठाणे

विश्व आणि ईश्वर यातील संबंध

 


प्राचीन भारतात विविध तत्वज्ञाने उगम पावली. या तत्वज्ञानांना 'दर्शने' या नावाने ओळखले जाते. तत्वज्ञानाचा अभ्यास हा 'दर्शनशास्त्र' या नावानेच ओळखला जातो. प्राचीन भारतीय दर्शनांपैकी आठ दर्शने ही प्रमुख मानली जातात. त्यात सहा दर्शने ही हिंदू दर्शने म्हणून ओळखली जातात (षटदर्शने) तर जैन आणि बौद्ध दर्शने ही अहिंदू दर्शने मानली जातात. सहा प्रमुख हिंदू दर्शने पुढील प्रमाणे .. न्याय, वैशेषिक, सांख्य, चार्वाक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा वेदांत. या विविध दर्शनांनी विश्व आणि ईश्वर यांचा संबंध याबाबत उहापोह केलेला आहे.

चार्वाक दर्शन हे इहवादी आहे. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्वच हे दर्शन नाकारते.
विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध तीन प्रकारे दाखविता येतो. याला आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशी नावे आहेत.
१> आरंभवाद : नैय्यायिक आणि वैशेषिक विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'आरंभवाद' या तत्वाने मांडतात. आरंभवाद म्हणजे कोठल्यातरी कारणाने कोणत्यातरी गोष्टीपासून पूर्णतः नवी गोष्ट उदयास येणे. प्राणवायू आणि हायड्रोजन यांच्या संयुगातून पूर्णतः: वेगळे गुणधर्म असणारे पाणी तयार होते तसेच काहीसे हे आहे. आरंभवादानुसार ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पाश्चात्य धर्मही विश्व आणि ईश्वर यांचा संबंध आरंभवादानुसार दाखवितात. माणसाच्या आदिम अवस्थेत स्फुरलेला हा विचार आहे.
२> परिणामवाद : सांख्य दर्शन विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध 'परिणामवाद' या तत्वाने मांडतात. एखादी गोष्ट दुसऱ्या भिन्न गुणधर्म असलेल्या गोष्टीत परावर्तित होते त्याला परिणामवाद म्हणतात. उदाहरणार्थ दूध हे दह्यात रूपांतरित होते तेव्हा दुधाचे गुणधर्म बदलतात. सांख्य दर्शनानुसार प्रकृती ही या विश्वात परिवर्तित होते. हे विश्व म्हणजे प्रकृतीचेच परिवर्तन आहे. योग आणि आयुर्वेद हे सांख्य दर्शनातून आलेले असल्याने त्यावर या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.
३> विवर्तवाद : अद्वैत वेदांत विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'विवर्तवादाने' मांडते. विवर्तवादानुसार एखादी वस्तू अज्ञानामुळे वेगळी भासते. वस्तू तीच असते, केवळ अज्ञानामुळे ती वेगळी भासते. अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला असतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सापासारखा वाटतो. आपला तो अनुभव पूर्णतः: खरा असतो. आपण तो साप समजून घाबरतोही. आपले अज्ञान दूर होताच आपल्याला तो दोर आहे हे कळते. अद्वैत वेदांतानुसार विश्व हे ईश्वरच (ब्रह्म) आहे, परंतु केवळ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते विश्व ब्रह्मापासून वेगळे भासते. आपले अज्ञान दूर झाल्यावर विश्व हे ब्रह्मच असल्याची स्पष्ट जाणीव होते.
संतोष कारखानीस

Friday, November 3, 2023

जात -- कवि: जीवन आनंदगावकर

कालपरवापर्यंत मी कोणत्या जातीचा आहे हे माझ्या लक्षातच नव्हते! अलिकडे जातीशिवाय जगणं धोकादायक ठरू शकतं हे मला पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे!

मी जात विसरून जगण्याचा
प्रयत्न केला तेंव्हा पिसाळलेल्या
हती सारखे ते माझ्या अंगावर
धावून आले!

ते म्हणाले की बिनजातीच्या
माणसाला मातीत गाडण्याची
त्यांची प्रथा आहे!

मी एक सामान्य प्रापंचिक
माणूस आहे, मलाही एकटं
पडण्याची, संपुन जाण्याची
खूप भिती वाटू लागली आहे!

शेवटी नाईलाजापोटी मरणाच्या
भितिला घाबरून मी थोडी थोडी
जात पकडायला सुरूवात केली आहे!