Thursday, July 20, 2023

मेंदू - कार्यक्षमता - मानसिक रोग

 आपल्याला कार्यक्षमतेने कोठलीही कामे करायची असतील तर मेंदूची काम करण्याची पद्धत जाणून घ्यावी लागेल. मेंदू हा चेतासंस्थेचा महत्वाचा भाग आहे. चेतासंस्था ही विविध चेतापेशींची बनलेली असते. चेतापेशी मेंदूत असतात. या चेतापेशी सतत एकमेकींच्या संपर्कात असतात. या चेतापेशींपासून निघालेले अनेक चेतातंतू असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो/करतो तेव्हा चेतातंतूंमध्ये विद्युत संदेश तयार होतो. मेंदूत हा संदेश गेल्यावर आसपासच्या चेतापेशींत हा संदेश चेतातंतूंद्वारे पाठविला जातो. यासाठी चेतापेशींचे चेतातंतू परस्परांशी जोडले जातात. अशाप्रकारे काही चेतापेशींचा समूह या  शिकण्याच्या अथवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत भाग घेतो. एखादे विशिष्ट काम करणाऱ्या पेशींचे समूह मेंदूतील विशिष्ट भागात असतात. उदाहरणार्थ बघण्याचे काम करणाऱ्या चेतापेशींचे समूह मेंदूतील एका भागात असतात, तर ऐकण्याचे काम करणाऱ्या चेतापेशींचे समूह दुसऱ्या भागात. या समूहातील चेतापेशींचा एकमेकींशी  चांगला संपर्क असतो. त्यांचे चेतातंतू एकमेकांशी जोडलेले असतात. आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा चेतापेशींतून जाणारा संदेश एका विशिष्ट मार्गाने जातो. आपण परत ही कृती करतो तेव्हा चेतातंतूंचा हाच मार्ग परत वापरला जातो. 

चेतातंतूंमधून जेव्हा विद्युत लहर जाते तेव्हा त्याचे भौतिक परिणामही होतात. या चेतातंतूंच्या आसपास विद्युतचुंबकीय क्षेत्र (Electromagnetic Field) तयार होते. त्यामुळे आसपासच्या भागाच्या द्रवातील आयन्स त्याकडे आकर्षित होतात. त्या पेशींवर एक थर तयार करतात. हा थर मेदाचा असतो. जेवढ्या वेळा या चेतातंतूंमधून विद्युत संदेश जाईल तेवढा हा थर जाड बनत जातो. हा थर विद्युत रोधक असतो. त्यामुळे चेतातंतूंमधून जाणाऱ्या विद्युत संदेशाची तीव्रता राखण्यास मदत करतो. 

जेव्हा आपण एखादी गोष्ट अथवा एखादा विचार परत परत करतो तेव्हा यासाठी बनलेल्या चेतातंतूंची जोडणी परत परत वापरली जाते आणि या संपूर्ण जोडणीवर जमलेला मेदाचा थर जाड होत जातो. त्यातून जाणाऱ्या विद्युत संदेशांचा कमी ह्रास (Loss) होतो. अर्थात या जोडणीतून वाहणारे विद्युत संदेश आपली तीव्रता कायम राखतात. म्हणूनच एखाद्या गोष्टीची वारंवार उजळणी केली की ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहाते. उजळणी केली नाही तर हा थर हळूहळू बाजूच्या द्रवात विरघळून जातो.

मेंदूत चेतापेशींचा एक समूह असतो जो अमूर्त संकल्पनांवर (Abstract Thinking) काम करतो. या भागाचे मुख्य काम आहे ते म्हणजे पूर्वी घडलेल्या घटनांचा विचार करून भविष्यात येणाऱ्या धोक्यांपासून शरीराला सावध करणे. अर्थात भूतकाळाचे प्रक्षेपण (Projection) भविष्यकाळावर करणे. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप अहत्वाचे काम आहे. त्यामुळे हा भाग स्वभावत:च खूप सक्रिय असतो. शिवाय आपले संरक्षण करण्यासाठी शरीराने ताबडतोब कृती करावी म्हणून या भागातील चेतापेशींचे चेतातंतूंचे मेंदूतील सर्व भागातील चेतापेशींच्या चेतातंतूंशी उत्तम जोडणी असते. या भागाला Default Mode Network अथवा DMN म्हणतात. आपण या लेखात त्याचा असाच उल्लेख करू. 

मानवाने आपल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मेंदूच्या DMN चा खूप वापर केला.  त्यामुळे निसर्गत:च हा भाग खूप कार्यक्षम बनला. हल्लीच्या युगात शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रमाला महत्व आल्याने हा भाग अधिक कार्यक्षम बनत गेला. मनात विचारांचे अकारण थैमान माजू लागले. त्याचा मेंदूतील सर्व भागांमध्ये निकट संपर्क असल्याने मेंदूचा अन्य कामांमध्ये त्याचा अडथळा होऊ लागला. मानसिक रोगांचा आधुनिक मानव शिकार बनला. 

यावर उपाय काय? एक सहज सोपा वाटणारा उपाय म्हणजे औषधी गोळ्यांच्या सहाय्याने मेंदूत रासायनिक बदल घडविणे. याद्वारे चेतातंतूंमधील संपर्कात अडथळा निर्माण होईल. मग DMNमधील  चेतापेशी मेंदूतील अन्य भागातील चेतापेशींच्या कामात अडथळा आणणार नाहीत. पण यात एक अडचण आहे. या रासायनिक बदलामुळे मेंदूतील सर्वच चेतातंतूंच्या संदेश प्रणालीवर परिणाम होईल. संपूर्ण मेंदूचे कार्य मंदावेल. जे मानसिक रोगांसाठी औषधी गोळ्या घेतात त्यांना हा अनुभव आला असेल. 

यावर दुसराही उपाय आहे. जर मेंदूमधील अन्य भागांना आपले काम करण्यास उत्तेजन दिले तर हे भाग DMN मधून येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करतील. मग DMNशी संपर्कात असणारे चेतातंतू वापरले न गेल्याने काही काळाने त्यांच्यावरील मेदाचे आवरण कमी होऊन ते कमकुवत होतील. मेंदूतील अन्य भाग भूत-भविष्य काळाचा विचार न करता वर्तमानात काम करत असतात. म्हणजेच आपल्या पंचेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदना ग्रहण करत असतात. आपण या संवेदनांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले तर आपोआप DMNची विनाकारण वाढलेली आणि नियमित कामात अडथळा ठरणारी कार्यक्षमता कमी करू शकू. आपल्या मनातील अनावश्यक विचार कमी होतील. मनाला शांतता लाभेल.  मनातील अनावश्यक विचार दूर करण्याची ही गुरुकिल्ली आहे. 

ध्यानाची कोठलीही पद्धत ही आपल्या इंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत आहे. विपश्यना ध्यानात हेच शिकविले जाते. बऱ्याच ध्यानपद्धतीत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. मला  नुकतेच समजले की नर्मदा परिक्रमेत प्रत्येक पावलाला 'नर्मदे हर' म्हणत जाणीवपूर्वक पाऊल टाकायचे असते. म्हणजेच आपले लक्ष आपल्या पावलांच्या संवेदनांवर हवे -वर्तमानात हवे.

प्राचीन काळी मानसशास्त्राचा एवढा खोलवर अभ्यास करून मानवाला मानसिक शांतीचे विविध मार्ग दाखविणाऱ्या आपल्या ऋषींना प्रणाम.  

No comments:

Post a Comment