Wednesday, July 19, 2023

सांख्यदर्शन ४

मागील भागात आपण सांख्य दर्शनात प्रतिपादलेली २५ तत्वे बघितली. या पैकी २३ तत्वे 'प्रकृती' या तत्त्वापासून उत्पन्न होतात हे ही पाहिले. प्रकृती या २३ तत्वांच्या साहाय्याने पुरुषाला आपल्या खेळात गुंतविते. सार्वभौम, निरामय चेतना  - अर्थात पुरुष- स्वत:ला  त्या प्रकृतीचा एक भाग समजू लागतो. पुरुषाला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडणे हेच दु:खाचे मूळ कारण आहे असे सांख्य दर्शन मानते. हे आपण मागील भागात पाहिले.  

सांख्य दर्शनानुसार दु:ख तीन प्रकारचे आहे. अधिभौतिक (अधिदैहिक),अधिदैविक, प्राकृतिक. 

अधिदैविक दु:ख म्हणजे शरीर-मनाला झालेले दु:ख. आपल्याला एखादी जखम झाली, अथवा मानसिक क्लेश झाले तर हे आदिभौतिक दु:ख आहे. आपला जन्म गरिबीत झाला,हे अधिदैविक दु:ख. हे दु:ख आपल्याला भाग्यवश मिळते. पूर, दुष्काळ इत्यादींमुळे होणारे दु:ख हे प्राकृतिक दु:ख आहे. हे तीनही प्रकारचे दु:ख आपली चेतना स्वत:ला 'प्रकृतीचा' एक भाग समजू लागल्यामुळेच होते. 

या दु:खाचे निराकरण करण्याचा उपाय सांख्यदर्शन सुचविते. ज्या क्रमाने प्रकृतीने पुरुषाला - चेतनेला फसविले आहे त्याच्याच उलट्या क्रमाने पुरुष या 'आपण प्रकृतीचा भाग असल्याच्या' भ्रमातून मुक्त होऊ शकतो. जेव्हा पुरुष या भ्रमातून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा त्या अवस्थेला सांख्य दर्शनात 'कैवल्य' म्हटले आहे. 

मागील भागात आपण पाहिले खालील क्रमाने प्रकृती पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढते.

बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते 

पुरुषाला फसविण्यासाठी सर्वात शेवटी पंचमहाभूते आणि त्या आधी तन्मात्रा (रस, गंध, रूप, स्पर्श, ध्वनी) जन्मल्या. तन्मात्रांना  'विषय' असेही नाव आहे. आपल्याला स्वत:पासून [रथां तन्मात्रांना म्हणजेच विषयांना अलग करावे लागेल. एखादे सुंदर रूप पाहिले की त्याची अभिलाषा सोडावी लागेल. एखादा अप्रिय शब्द आपल्याला कोणी बोलला तर आपल्याला त्याने त्रास होता कामा नये. आता मन, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांपासून पुरुषाला वेगळे करायचे आहे. उदाहरणार्थ आपल्याला ऐकू नसेल अथवा पाय मोडला तर त्यापासून (ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय) होणाऱ्या दु:खापासून आपल्याला दूर जायचे आहे. पुसूंश का केवळ चेतनामात्र हे समजून घ्यायचे आहे. यानंतर मनाला पुरुषापासून अलग करायचे आहे. आपले मन चंचल आहे. सतत भरकटत असते. हे मनाचे भरकटणे आपल्याला अलिप्तपणे जाणून घ्यायचे आहे. मनाचे दु:ख अलिप्तपणे बघायचे आहे. आता पुरुषाला अहंकारापासून दूर करायचे आहे. ही कठीण गोष्ट आहे. अहंकाराचे विसर्जन म्हणजे 'मी' पणाचे  विसर्जन. विविध ध्यान पद्धतींनी हे साध्य होते. आता राहिली बुद्धी. बुद्धीपासून पुरुषाला अलग करणे हे तर खूपच कठीण आहे. आपण सांख्य दर्शन शिकत आहोत तेच बुद्धीच्या साहाय्याने. ध्यानात खूप खोलवर गेल्यावर पुरुष बुद्धीपासूनही स्वत:ला अलग करू शकतो. आता चेतना कैवल्यला प्राप्त होते.  हाच सांख्यदर्शनाने सांगितलेला दु:ख निवारणाचा मार्ग आहे. 

पुढील लेख या लेखमालेतील अखेरचा लेख असेल. 


संतोष कारखानीस ठाणे 


No comments:

Post a Comment