आपले चैतन्य हे साक्षीचैतन्याचे आपल्या मनात पडलेले प्रतिबिंब आहे. मनाच्या अहंकार या भागाशी ते एकरूप होऊन चेतांस्थेद्वारे संपूर्ण शरीरात पसरते हे आपण मागील भागात पहिले.
पण आपल्या चैतन्यात (म्हणजे आपल्यात) कधीकधी राग, लोभ, द्वेष अशा भावना उमटतात. साक्षीचैतन्य हे निरंजन, निर्विकार असते. मग हे आपले चैतन्य असे विविध भावनांनी गढूळ का होते. हे मालिन झालेले चैतन्य स्वच्छ कसे करायचे? यासाठी आपल्याला आपल्या तत्वज्ञानामधील 'उपाधी' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल.
एखाद्या सानिध्यात असलेल्या वस्तूचे गुण सानिध्यामुळे त्याच वस्तूचे आहेत असे वाटणे म्हणजे 'उपाधी'. एखाद्या अत्यंत पारदर्शक अशा स्फटिकाच्या गोळ्याच्या मागे आपण लाल रंगाचे फुल ठेवले असता आपल्याला तो गोळा लाल रंगाचा आहे असे वाटते. तो लाल रंग त्या गोळ्याचा नसतो, परंतु सानिध्यामुळे त्या गोळ्याला तसा रंग आहे असे भासते. हे फुल बाजूस केले असता गोळा परत पारदर्शकच भासतो. हे उपाधीचे एक उदाहरण आहे.
आपल्या शरीर-मनात उमटणाऱ्या संवेदना (स्पर्श, गंध, विचार इत्यादी) आपली चेतासंस्था आपल्या चैतन्यासमोर उभ्या करते. (चेतासंस्थेतील विद्युतसंवेदनांचे रूपांतर संवेदनांमध्ये कसे होते हे विज्ञानाला अजून न उलगडलेले कोडे आहे). चैतन्य केवळ निर्विकारपणे या संवेदना स्वीकारते. या संवेदनांमुळे मनात विविध विकार (राग, लोभ, द्वेष इत्यादी) निर्माण होतात. चैतन्य निर्विकारच असते. पण मनाच्या सानिध्यामुळे (उपाधीमुळे) हे विकार आपल्या चैतन्यात तयार झाले आहेत असे आपल्याला वाटते. मग आपण 'मला दु:ख झाले', 'मला आनंद झाला' अशी भाषा बोलू लागतो. केवळ भाषा नव्हे, आपल्याला तसेच वाटते. सानिध्यामुळे चैतन्याने हे 'रंग' धारण केले आहेत - चैतन्यात बदल झाला आहे असे भासते. उपाधीमुळे झालेला हा भ्रम आहे. पण चैतन्य 'निरामय' आहे, 'नि:संग' आहे. 'दु:ख' मला (म्हणजे माझ्या चैतन्यला) झालेले नसते - माझ्या चैतन्यात उमटलेले नसते, माझ्या मनात दु:खाची भावना निर्माण झालेली असते. मी म्हणजे माझे शरीर-मन नाही, तर चैतन्य आहे ही भावना मनात रुजलेली असल्यास आपण आपल्या दु:खाकडे अशा त्रयस्थ भावनेने बघू शकतो. या विश्वात आलो आहोत, दु:ख तर होणारच, पण त्या दु:खाचा त्रास होत नाही.
आपण म्हणजे शरीर-मन नव्हे तर आपले चैतन्य आहोत - साक्षी चैतन्य आहोत ही भावना मनात रुजविण्यासाठीच आपण हा अध्यात्माचा अभ्यास करीत आहोत. हे केवळ पुस्तके वाचून-प्रवचने ऐकून (ज्ञानयोग) होणार नाही. त्यासोबत दैनंदिन जीवनात त्याची प्रचिती यावी लागेल. हे काही कोठल्या चमत्काराने होणार नाही, ध्यानातील अतींद्रिय अनुभवाने होणार नाही. आपल्या आसपासच्या सामान्य घटनांतून आपल्या विश्वातील विविध वस्तूंमधून (Objects) डोकावणारे ब्रह्म बघण्याची क्षमता अंगी यावी लागेल. हे कठीण नाही. फक्त आपली प्रत्येक क्षणी एकाग्रता वाढवावी लागेल, प्रत्येक क्षणी आपल्याला जागृत व्हावे लागेल. त्यासाठी ध्यानमार्ग अथवा भक्तिमार्गाचा अवलंब करावा लागेल. ही वाट प्रथमतः: दिसायला कठीण वाटली तरी मार्गक्रमण सुरु केल्यावर सोपी वाटू लागते.
करणार सुरुवात ?
No comments:
Post a Comment