Thursday, July 20, 2023

पुनर्जन्म:

पुनर्जन्म ही संकल्पना सर्व पौर्वात्य धर्मांमध्ये आहे. मात्र अब्राहमीक धर्मांत (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) या संकल्पनेला स्थान नाही. आपल्यावर ब्रिटिश राजवटीत ख्रिश्चन संकल्पनांचा मारा झाल्याने आपल्यालापैकी अनेकांना पुनर्जन्म ही संकल्पना म्हणजे एक कल्पनाविलास वाटू लागला आहे. परंतु भारतात आणि पाश्चिमात्य देशांत आता यावर शिस्तबद्ध अभ्यास सुरु झाला आहे. ज्यांना मागील जन्म आठवतो त्यांच्या आठवणी संकलित करून त्याची शहानिशा केली जात आहे. (मला मागील जन्म अंधुकसा आठवतो. त्याची सांगड मी या जन्मातील माझ्या वर्तनाशी घालू शकतो).
अद्वैत दर्शनाच्या दृष्टीने आपण पुनर्जन्माकडे पाहू. आकाशात सत्-चित्-आनंद रुपी सर्वसाक्षी ब्रह्म तळपत आहे. या ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते. आपले मन ब्रह्माचे हे सत्-चित्-आनंद गुण सर्वसाक्षी ब्रह्माकडून उधार घेते (Acquired qualities). मनाचा 'अहंकार' हा भाग या प्रतिबिंबाशी एकरूप होतो. आपल्या चेतासंस्थेच्या साहाय्याने तो संपूर्ण शरीरात पसरतो. मग आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. हे ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या अहंकाराशी (मी-पणाच्या भावनेशी) एकरूप झालेले असल्याने आपल्याला हा चैतन्यमय अहंकार म्हणजे आपला 'आत्मा' आहे असे वाटते. अहंकाराची जोड मिळाल्याने तो 'माझा' आत्मा आहे असे आपण विधान करतो. चेतासंस्थेचे केंद्र मेंदू असल्याने आपल्याला आपला आत्मा आपल्या मेंदूत आहे असेही अनेक वेळा वाटते. अद्वैत वेदान्ताच्या मते 'आत्मा' म्हणजे केवळ सर्वसाक्षी ब्रह्माकडून सत्-चित्-आनंद उधार घेतलेला आपला अहंकार असतो.
एका माळ्याने काही बालाद्यांत पाणी भरून ते उघड्यावर उन्हात ठेवले आहे. प्रत्येक बालदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. प्रत्येक बालदीला तो आपला स्वतंत्र आत्मा वाटतो. खरे तर ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब आहे. कधीकधी या बालदीतील पाणी गढूळ होते. मग बालदीतील सूर्याचे प्रतिबिंबही झाकोळते. बालदीला वाटते की आपल्या आत्म्यावर-चैतन्यावर मळभ आले आहे. खरे तर साक्षी-चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने तळपत असतो. बालदी उगचगच खंतावते. कधीकधी बालदीतील पाणी डुचमळते. सूर्याच्या प्रतिबिंबाचे तुकडे-तुकडे होतात. बालदी खोल निराशेत -डिप्रेशनमध्ये- फेकली जाते. पण खरेतर साक्षीचैतन्याच्या सूर्याला काहीही झालेले नसते. थोड्याच वेळात पाणी शांत होऊन प्रतिबिंब तेजाने झळकू लागते. कधीकधी बालदी जुनी होते. गळू लागते. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बालदीत ओततो. नव्या बालदीत परत सूर्याचे प्रतिबिंब उमटते. हाच तो पुनर्जन्म. या नव्या बालदीत जुन्या बालदीतील प्रतिबिंब गेले आहे काय? मग नव्या जन्मात मागील जन्मातील आत्मा जातो का?
वरील उदाहरणात माळ्याने एका बालदीतील पाणी दुसऱ्या बालदीत ओतले. तद्वतच आपला मनोमय कोष दुसऱ्या शरीराला जाऊन चिकटतो आणि त्याच्यात परत साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब पडते. यालाच कदाचित आपण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असे म्हणू शकू. पण हा सर्व खेळ मायेच्या परिक्षेत्रात चालला आहे हे ध्यानात ठेवायला हवे.
संतोष कारखानीस ठाणे

All reactions:
Prakash Patil, Rajendra Hirlekar and 39 others

No comments:

Post a Comment