Thursday, July 20, 2023

देव-देवता

 जर आपण सगळे ब्रह्म आहोत तर विविध देवता कोण आहेत? आपण त्यांची उपासना करण्याची गरजच काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. (माझ्या आठवणीप्रमाणे अशा स्वरुपाचा The Kerala Story या चित्रपटात अन्य धर्मियांकडून उपस्थित केलेला दाखविला आहे).

यासाठी आपल्याला आपल्या प्राचीन तत्वज्ञानामधील 'विवर्त' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. 'सत्य' हे अनेक पातळीवर अस्तित्वात असते. उदाहरणार्थ स्वप्नात आपल्यासमोर विश्व उभे ठाकते. आपणही त्यात असतो. स्वप्नाच्या पातळीवर स्वप्नात घडणाऱ्या सर्व घटना 'सत्य' असतात. ही सत्याची एक पातळी आहे. जागेपणाच्या पातळीवर स्वप्नातील गोष्टी असत्य होतात. पण स्वप्नाच्या पातळीवर त्या सत्यच असतात. मी स्वप्नात आजारी पडलो तर डॉक्टर स्वप्नांतलाच बोलावावा लागेल आणि औषधही स्वप्नातच घ्यावे लागेल. जागेपणी स्वप्नातील रोगावर औषध घेऊन उपयोग होणार नाही. 

स्वप्नातील घटनांसाठी Raw Material माझ्या मनातून पुरविले जाते. तसेच आपल्या जागृतावस्थेसाठी Raw Material आपल्या ब्रह्मस्वरूपाकडून पुरविले जाते.  जागृतावस्था ही जशी सत्याची स्वप्नावस्थेपेक्षा उच्च पातळी म्हणता येईल, तशी ब्रह्मावस्था ही सत्याची आणखी उच्च पातळी आहे. 

जसे स्वप्नातील रोगांसाठी स्वप्नातील डॉक्टरकडून इलाज करवून घ्यावा लागतो, तसेच जागृतावस्थेतील समस्यांसाठी या विश्वातील शक्तींकडूनच मदत घ्यावी लागते. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. परंतु आपल्या जागृतावस्थेतील सत्याच्या पातळीवर आपण आपले शरीर-मन आहोत. आपल्या समस्या या आपल्या ब्रह्मरूपाच्या समस्या नाहीत तर शरीर-मनाच्या समस्या आहेत. म्हणूनच त्या समस्यांसाठी आपल्याला या विश्वातील शक्तींकडूनच - देवतांकडूनच मदत मिळू शकते. आपण आणि या देवता शेवटी ब्रह्मस्वरूपच आहोत. या देवता या विश्वातीलच आहेत. तेव्हा त्यांना भावना असणे यात काहीही गैर नाही.  त्यांच्या या भावना उच्च स्वरूपाच्या असतात, म्हणजेच चांगल्या व्यक्तींना मदत करण्यास या शक्ती उत्सुक असतात. 

अन्य धर्मियांचे तत्वज्ञान वेगळे आहे. त्यांचे तत्वज्ञान आणि आपले तत्वज्ञान या गल्लत करू नका. आपले तत्वज्ञान अधिक लॉजिकल आहे. 

No comments:

Post a Comment