Thursday, July 20, 2023

मॅशमॅलो एक्सपरिमेंट आणि भगवद्गीता

 आधुनिक मानसशास्त्रात  वॉल्टर मिशेल या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने १९६० च्या दशकात केलेला एक प्रयोग सुप्रसिद्ध आहे. त्याने चार वर्षांच्या मुलांवर हा प्रयोग केला. प्रत्येक मुलाला एका खोलीत बसवून त्यांना एक मॅशमॅलो (अमेरिकन लहान मुलांची एक आवडती मिठाई) दिले. पण  वॉल्टर खोलीच्या बाहेर जाऊन सुमारे दहा मिनिटात परत येईपर्यंत त्या मुलाने ते मॅशमॅलो न खाल्ल्यास त्याला  आणखी एक मॅशमॅलो बक्षीस म्हणून मिळणार होते. म्हणजेच ते समोर ठेवलेले मॅशमॅलो लगेच खाण्याच्या इच्छेवर त्याने  मात केल्यास त्याला भविष्यात दुप्पट मॅशमॅलो मिळणार होते. ते मॅशमॅलो लगेच खाणे त्यांच्यासाठी प्रेयस-प्रिय गोष्ट होती. पण ते लगेच न खाणे त्यांच्या भविष्यकाळासाठी  श्रेयस-चांगली गोष्ट होती. 

वॉल्टरने त्यानंतर चौदा वर्षांनी या मुलांचे सर्वेक्षण केले. ज्या मुलांनी लहानपणी मॅशमॅलो लगेच खाण्याच्या आपल्या इच्छेवर मात करून दोन मॅशमॅलो मिळविली होती त्यांनी भविष्यात करियरमध्ये, खेळात, कौटुंबिक जीवनात आणि एकंदरीतच खूप प्रगती केली होती. या मुलांच्यात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला होता. मात्र जी मुले वॉल्टर परत येण्यापूर्वीच मॅशमॅलो खाऊन मोकळी झाली होती, ज्यांना मॅशमॅलो लगेच खाण्याच्या आपल्या इच्छेवर मात करता आली नव्हती ती मुले जीवनात मागे पडली होती. आपण youtube वर शोध घेतल्यास या टेस्टचे अनेक व्हिडीओ बघण्यास मिळतील. 

 https://www.youtube.com/watch?v=y7t-HxuI17Y  लिंकवर  क्लीक केल्यास असाच एक व्हिडीओ बघण्यास मिळेल. खूप मजेशीर व्हिडीओ आहे. नक्की बघा.  

आपण मागील एका लेखात दुर्योधनाची आणि अर्जुनाची मनावर नियंत्रण नसल्याची समस्या पहिली. या लहान मुलांची समस्या तीच आहे. ही आपली - म्हणजे मानवजातीची प्रातिनिधिक समस्या आहे. 

श्रीकृष्णाने तिसऱ्या अध्यायातील ३३ व्य श्लोकात ही समस्या का निर्माण होते हे सांगितले आहे. 

सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि |
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति || ३-३३||

सर्वच प्राणिमात्र आपल्या नैसर्गिक प्रेरणेने- राग (लोभ)-द्वेष या भावनेने लिप्त होऊन वागतात. या नैसर्गिक भावनांचे दमन करून काय मिळणार आहे? मग श्रीकृष्ण यावर उपायही सुचवितात.

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ |
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४||

आपली इंद्रिये ही आपल्या मनापुढे केवळ त्या त्या इंद्रियांना जाणवलेल्या संवेदना ठेवतात. त्यांना आपण बंधने घालू शकत नाही. मात्र त्यापासून या राग-लोभाच्या भावना निर्माण होतात त्यावर आपण नक्कीच नियंत्रण ठेऊ शकतो. हे नियंत्रण म्हणजे त्या भावनांचे दमन नव्हे, दमन केल्याने या भावना भविष्यात अधिक जोमाने उफाळून वर येतील. राग-लोभ निर्माणच होणार नाहीत, अथवा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होत जाईल यासाठी काही करणे आपल्या हातात आहे. आपण हे करू शकल्यास लगेच मॅशमॅलो खाण्याच्या इच्छेवर मात करणाऱ्या मुलांसारखे आपले आपल्या आपल्यावर नियंत्रण येऊ शकेल. आपण जीवनात यशस्वी होऊ. 

मग आपण श्रीकृष्णाने सांगितलेल्या ध्यानमार्ग/भक्तिमार्गाचा अवलंब करणार का? 


No comments:

Post a Comment