Wednesday, July 19, 2023

सांख्यदर्शन ३

 मागील भागात आपण सांख्य दर्शनाच्या मूळ सिद्धांताचा वेध घेतला. 'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा मूळ आधार आहे.  सत् याचा अर्थ अस्तित्व. 'अस्तित्व हे अस्तित्वातूनच उदयास येते' असे सत्कार्यवाद सांगतो. म्हणूनच अस्तित्व हे शून्यातून उदयास आले असे सांगणाऱ्या बौद्धदर्शनापेक्षा आणि अस्तित्व हे परमेश्वराने निर्माण केले असे सांगणाऱ्या अन्य दर्शनांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. 

 सत् कारणापासून सत् कार्य उदयास येते असे सत्कार्यवाद सांगतो. या सत् कारणाला सांख्य दर्शनात 'प्रकृती' असे संबोधले आहे.  प्रकृतीचा शब्दश: अर्थ आहे 'कृतीच्या आधी'.  प्रकृती ही 'जड' आहे तिच्यात प्रचंड क्षमता (potential) आहे पण कोठलीही चेतना नाही.  प्रकृतीकडून कार्य करून घेणाऱ्या चेतनेस या दर्शनात 'पुरुष' असे संबोधले आहे. 

पुरुष आणि प्रकृती एकमेकांजवळ का येतात हे आता समजून घेऊ. 
एखादी गोष्ट 'कारण' होण्यासाठी तिच्यातील क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे लागते. प्रकृतीच्या क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे म्हणून प्रकृती सदैव बेचैन असते. पुरुष हा केवळ चेतनामात्र आहे, निर्गुण आहे. जी अनुभव घेऊ शकते तिला चेतना म्हणतात. अनुभवांशिवाय चेतनेला अर्थ नाही. पुरुषाला तो 'चेतना' आहे हे सिद्ध करण्यासाठी अनुभव घ्यावे लागतात. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष हे एकत्र येतात. प्रकृतीला आपल्या अनुभवांचे प्रकटीकरण करण्यासाठी पुरुषाच्या चेतनेची- इच्छाशक्तीची- आवश्यकता असते. तर प्रकृतीने निर्मिलेल्या विश्वाचा अनुभव पुरुष घेऊ शकतो. आपल्या अस्तित्वाला अर्थ प्रदान करण्यासाठी प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात. 

प्रकृती एकच आहे, परंतु तिची क्षमता असीम आहे. पुरुष मात्र संख्येने अनेक आहेत. पुरुष ही केवळ चेतना आहे. तिचे काम 'अनुभव घेणे' हेच आहे. विश्वात अनेक जीव आहेत. एकाच घटनेचे अनुभव प्रत्येक जीवाला वेगळे येतात. म्हणूनच सांख्य दर्शनाच्या प्रणेत्यांनी अनेक पुरुष आहेत असे मानले. 

जेव्हा एखादा पुरुष आणि प्रकृती जवळ येतात तेव्हा तो पुरुष प्रकृतीचा अनुभव घेऊ लागतो. यावेळी प्रकृती 'विकृत' होऊ लागते. प्रकृतीचा खेळ चालू होतो.  प्रथम प्रकृती पुरुषामध्ये बुद्धी (महत् ) उत्पन्न करते. बुद्धीमुळे पुरुष प्रकृतीच्या खेळात फसतो. बुद्धीमुळे पुरुष प्रकृतीचा अधिक खोलात शिरून अनुभव घेऊ इच्छितो.  मग प्रकृती पुरुषांमध्ये अहंकार हे दुसरे तत्व उत्पन्न करते. या वेळपर्यंत आपल्याला आपल्या आसपासच्या निसर्गापासून पुरुष वेगळे समजत नसतो. परंतु अहंकाराचा जन्म होताच तो स्वत:ला वेगळे समजू लागतो. आता प्रकृतीच्या खेळात पुरुष अधिकाधिक गुंतत जातो. 

पुरुषाला अहंकार प्राप्त झाल्यावर आपले वेगळे रूप असावे असे साहजिकच वाटते. मग जन्मतात ११ इंद्रिये आणि पाच तन्मात्रे.  प्रथम पाच ज्ञानेंद्रिये बनली (डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा). प्रकृतीच्या सत्व-रज-तम गुणांपासून ही  पंचेंद्रिये बनली. आजवर केवळ बुद्धीने प्रकृतीचा अनुभव घेता येत होता. आता त्या जोडीला ही पंचेंद्रिये आली. पंचेंद्रियांद्वारे पुरुष प्रकृतीचा अनुभव चांगल्याप्रकारे घेऊ शकला.  पुरुष प्रकृतीमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. 

आता प्रकृती सुचवीत आहे की माझा हा खेळ बराच काळ चालणार आहे. त्यामुळे पुरुषाला प्रकृतीचा हा अनुभव बराच काळ घेण्यासाठी प्रकृती सुचविते. म्हणून आता शरीराला प्रकृतीने पाच कर्मेंद्रिये दिली. हात पाय, लैंगिक इंद्रिये, मुख आणि गुदद्वार दिले. अशाप्रकारे प्रकृतीने पुरुषाला पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये दिली. तसेच एक मन ही दिले. बुद्धी प्रथम आली. बुद्धी निर्णय घेऊ शकते. मन चंचल असते. ते निर्णय घेऊ शकत नाही.  मनाला उभयेंद्रिय म्हटले आहे. हे एकाबाजूने ज्ञानेंद्रिय आहे तर दुसरीकडे कर्मेंद्रियही आहे. अशाप्रकारे प्रकृतीने चेतनेला आपल्यात पूर्णपणे गुंतविले आहे. आता पुरुष स्वत:लाच प्रकृतीचा एक भाग समजू लागला. 

परंतु फक्त ज्ञानेंद्रिये असून उपयोग नाही. जर ध्वनीचा नसेल तर कानाचा काय उपयोग? जर डोळे असतील तर किमान काही अनुभवण्यासाठी त्यासोबत एखादे रूप हवे. मग प्रकृती अनुभव देण्यासाठी तन्मात्रे बनविते. डोळ्यांसाठी रूप, कानासाठी 'शब्द', नाकासाठी 'गंध', जिभेसाठी 'रस', त्वचेसाठी 'स्पर्श'  अशी ही पाच तन्मात्रे आहेत. हे आपल्या ज्ञानेंद्रियांसाठी 'विषय' आहेत. या तन्मात्रांमधून पंचमहाभूते जन्मतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशी ही पंचमहाभूते तन्मात्रांमध्ये जन्मतात. प्रकृतीमधून अशी २३ तत्वे जन्म घेतात. प्रकृती आणि पुरुष यांना धरून अशी २५ तत्वे सांख्य दर्शनात मानली गेली आहेत. या प्रकृतीच्या २३ तत्वांचे एकाच काम आहे. पुरुषाला फसवून  तो प्रकृती आहे असा भ्रम  त्याच्यात निर्माण करणे. 

खालील क्रमाने प्रकृती पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढते.

बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते  

अशाप्रकारे निरंजन-निर्विकार असलेली चेतना फसते आणि स्वतः:ला प्रकृती समजू लागते.  हेच दु:खाचे मूळ कारण आहे असे सांख्य दर्शन मानते. 

पुढील भागात आपण याचा अधिक विस्ताराने विचार करू. 

----------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment