Thursday, July 20, 2023

भक्तिमार्ग

 अद्वैत वेदांत परोपरीने हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की आपण आणि हे केवळ ब्रह्म आहोत. मग जेव्हा भक्तीचा प्रश्न येतो, मंदिरात जाण्याचा प्रश्न येतो तेव्हा वाटते, मी तर ब्रह्म आहे, मी केवळ साक्षी चैतन्य आहे. मग मी भक्ती कोणाची करायची? साक्षीचैतन्याबद्दल  माझ्या मनात कोणतीही भावना नाही. ना प्रेमाची, ना द्वेषाची. मग मी भक्ती कसली करू? मी माझीच भक्ती करू? माझ्यापुढेच नतमस्तक होऊ? 

हा प्रश्न योग्य आहे. कारण भक्तिभाव हा फक्त एखाद्या Object बद्दल असू शकतो. ज्याला आपले चैतन्य जाणू शकते त्याला Object म्हणतात. म्हणूनच Object आणि चैतन्य हे भिन्न असतात. चैतन्य हे चैतन्यालाच जणू शकत नाही. म्हणून ते Object नाही.  मग या साक्षी चैतन्याबद्दल भक्तिभाव कसा जागवायचा?

खरे तर याचे उत्तर आपल्या प्रश्नातच दडलेले आहे. 'मी भक्ती कोणाची करायची?' या प्रश्नातील 'मी' हे केवळ ब्रह्म अथवा साक्षीचैतन्य नाही. येथे 'मी' याचा अर्थ चैतन्यासहित मायेने उभे केलेले माझे स्थूल शरीर, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर आहे.  या मायेच्या 'नाम-रूपाच्या' पांघरुणामुळेच मी अन्य व्यक्तींपासून, अन्य वस्तूंपासून वेगळा झालेलो आहे. 'मी' एक Object आहे.  तेव्हा या 'नाम-रूपाच्या' पांघरुणाखालील 'मी' ने याच  मायेने नाम-रूपाचे पांघरूण  घालून आपल्यासमोर उभ्या केलेल्या देवतेचे ध्यान करायचे आहे. याच मायेने या देवतेला असीम शक्तीही दिलेल्या आहेत. आणि हा मायेचा खेळ या विश्वापुरता आहे.  ते या व्यावहारिक पातळीवरील सत्य आहे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी आपण भक्तिमार्ग अथवा ध्यानमार्ग अवलंबितो तेव्हा आपण व्यावहारिक पातळीवर जगत असतो. तेव्हा 'मी माझीच भक्ती कशी करू?' हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. 

No comments:

Post a Comment