Wednesday, July 19, 2023

सांख्यदर्शन ५ : कुंडलिनी विद्या आणि आयुर्वेद

 मागील काही लेखात आपण सांख्य दर्शनासंबंधी थोडे जाणून घेतले. सांख्य दर्शन हे अत्यंत प्राचीन दर्शन आहे. काही जण त्याचा उगम वेदांपूर्वीचा आहे असे मानतात. कारण वेदात कपिलमुनींचा उल्लेख आहे.  कदाचित म्हणूनच सांख्यदर्शन वेदांचा पुरस्कार करत नाही, परंतु धिक्कार ही करत नाही. यासाठी हे दर्शन 'नास्तिक' दर्शन मानले गेले आहे.  भारतीय जनमानसावर  याच दर्शनाचा प्रभाव आहे. आयुर्वेद, योग, शाक्तपंथ, कुंडलिनी योग इत्यादी अनेक शाखांचा उगम याच दर्शनात आहे. 

हे दर्शन सत्कार्यवादावर आधारलेले आहे. सत याचा अर्थ अस्तित्व. अस्तित्व हे अस्तित्वातूनच जन्म घेते असे हे दर्शन मानते. या दर्शनात पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्वे मानलेली आहेत. प्रकृतीकडे असीम क्षमता (Potential) आहे. परंतु या क्षमतेचे प्रकटीकरण प्रकृती करू शकत नाही. कारण त्यासाठी चेतनेची आवश्यकता आहे. या उलट पुरुषाकडे चेतना आहे. परंतु या चेतनेचे प्रकटीकरण करण्यासाठी त्याला प्रकृतीची आवश्यकता आहे. म्हणून ते एकत्र येतात. एकत्र आल्यावर प्रकृती आपल्या खेळात पुरुषाला गुंतविते. मग पुरुषाला आपल्या निरामय चेतना या स्वरूपाचा विसर पडतो. तो स्वतःला प्रकृतीचा एक भाग समजू लागतो. तेथेच दु:खाचा जन्म होतो हे आपण पाहिले. दु:खमुक्तीसाठी पुरुषाला या प्रकृतीच्या खेळातून दूर होऊन आपल्या चेतना स्वरूपाची जाणीव व्हावी लागते. यालाच सांख्य दर्शनात कैवल्य असे नाव आहे. 

कैवल्यावस्थेला जाण्यासाठी पुरुषाला प्रकृतीने ज्या क्रमाक्रमाने बद्ध केले आहे त्याच्या उलट क्रमानेच सोडवून घ्यावे लागते हे आपण मागच्या लेखात पहिले. हा क्रम म्हणजे 
बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते  

कुंडलिनी विद्या ही पुरुषाने अशा उलट्या क्रमाने सोडवून घ्यावे यासाठी निर्मिलेली विद्या आहे. त्यांच्याशी निगडित पंचमहाभूते क्रमश: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी आहेत. पंचमहाभूतांमध्ये  प्रथम आकाश जन्मले. नंतर क्रमाक्रमाने वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी जन्मली.  कुंडलिनी विद्येच्या प्रवर्तक ऋषींनी या पंचमहाभूतांची आपल्या शरीरातील पाठीच्या कण्यातील स्थाने शोधली. ही स्थाने आपले या पंचमहाभूतांसंबंधी असलेले तादात्म्य नियंत्रण करतात. या स्थानांवर आपले नियंत्रण आल्यास आपण (म्हणजे आपली चेतना - आपला पुरुष) या पंचमहाभूतांशी असलेले आपले तादात्म्य तोडू शकतो. आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत हे त्याला जाणवते. पुरुषाला प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत हे जाणवण्याची ही सुरुवात आहे. ही स्थाने म्हणजे कुंडलिनी विद्येत दाखवलेली चक्रे. यात मूलाधार चक्रापासून सुरुवात करून क्रमाने स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध चक्रापर्यंत जायचे असते. ही चक्रे अनुक्रमे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी संबंधीत आहेत. म्हणजेच प्रकृतीने पुरुषाला ज्या क्रमाने आपल्यां गुंतविले त्याच्या विरुद्ध क्रमात आहेत. याच क्रमाने आपल्याला आपल्या चेतनेला प्रकृतीपासून मुक्त करायचे आहे. कुंडलिनी योगातील अन्य चक्रे - आज्ञा आणि सहस्रार - ही अनुक्रमे मन आणि बुद्धीशी संबंधित आहेत. एकदा चेतनेचे बुद्धीशी तादात्म्य सुटले की चेतना - म्हणजेच पुरुष - प्रकृतीपासून मुक्त होतो. त्याला आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हे उमगते. त कैवल्यला पोचतो. कुंडलिनी विद्या ही सांख्य दर्शनातून उगम पावलेली विद्या आहे. 

प्रकृतीमध्ये असलेले तीन गुण सत्व-रज आणि तमोगुण हे स्वभावत: संतुलित असतात. परंतु पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रकृती या तीन गुणांच्या विविध मिश्रणाने सृष्टीतील विविध पदार्थ - ऊर्जा बनविते. लाल, पिवळा आणि निळा या मूळ रंगांची विविध प्रमाणात मिश्रणे करून अनेक रंग मिळविता येतात तसेच काहीसे हे आहे. मानवी शरीरात हेच तीन गुण कफ, पित्त आणि वात या नावाने ओळखले जातात. या तीन गुणांचे संतुलन असते तेव्हा मानवी शरीर आरोग्यपूर्ण असते. मात्र या गुणांचे संतुलन बिघडल्यास आरोग्य बिघडते. आयुर्वेद हे तीन गुण औषधांच्या साहाय्याने संतुलित करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आयर्वेदाचा पाया 'सांख्यदर्शन' आहे. 

सांख्यदर्शन हे भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेले आहे. भारतीयांवर अद्वैत दर्शनाचा नाही तर सांख्य दर्शनाचा प्रभाव आहे. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या अनेक संज्ञा या दर्शनातून आलेल्या आहेत. म्हणून आपल्याला या दर्शनाची किमान माहिती व्हावी हा माझा या लेखमालेद्वारे प्रयत्न होता.  

हा या लेखमालेतील शेवटचा लेख.
लेखनसीमा !

संतोष कारखानीस ठाणे 

No comments:

Post a Comment