मित्रहो, आधी सांगितल्याप्रमाणे मी सांख्य दर्शनाचा अभ्यास सुरु केला. अर्थात माझा सांख्य दर्शन फार खोलात जाऊन शिकण्याचा विचार नाही. आणि कोठलेही दर्शन समजून घ्यायचे असेल तर खूप खोलात जावे लागते. दोन वर्षांनंतर आता कुठे मला अद्वैत दर्शन थोडेफार समजू लागले आहे. म्हणून हा लेख सांख्य दर्शनाची केवळ तोंडओळख करून देणारा असेल.
हे दर्शन भारतीय माणसावर सर्वात प्रभाव टाकणारे दर्शन आहे. सांख्य दर्शन हे अन्य भारतीय दर्शनांप्रमाणेच अत्यंत तार्किक आहे.
कपिलमुनींना सांख्य दर्शनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. कपिलमुनींचा काळ हा इसवीसन पूर्व सातशे वर्ष मानला जातो. कपिलमुनींना प्राचीन भारतात अत्यंत आदराने गौरविले जात होते. गौतम बुद्धानेही त्यांचा आदराने उल्लेख केलेला आहे. गौतमबुद्धाचे बालपण याच कपिलमुनींचा नावाने वसविण्यात आलेल्या कपिलवास्तू नगरीत व्यतीत झालेले आहे. 'सांख्य प्रवचन सूत्र' हा कपिलमुनींनी लिहिलेला ग्रंथ या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ आहे. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. कपिलमुनींच्या नंतर सांख्य दर्शनाचे भाष्यकार म्हणून आसुरी ऋषींची नाव घेतले जाते. परंतु त्यांनी कोठलीही ग्रंथरचना केल्याचे माहीत नाही. त्यानंतर पंचशिखाचार्य हे सांख्यदर्शनाचे महत्वाचे गुरु मानले जातात. त्यांनी षष्ठीतंत्र हा ग्रंथ लिहिला आहे. या नंतर गुरुपरंपरेने हे ज्ञान ईश्वरकृष्ण ऋषिंपर्यंत हे ज्ञान आले. इसवीसन पूर्व ३०० च्या सुमारास ईश्वरकृष्ण ऋषींनी सांख्य कारिका हा ग्रंथ लिहिला आहे. आज हा ग्रंथ सांख्यदर्शनाचा प्रमाण ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो.
'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा आधार आहे. याचा अर्थ 'सत्कारणांनीच सत्कार्याची निर्मिती होऊ शकते'. 'सत् ' या शब्दाचा अर्थ 'अस्तित्व' असा आहे हे आपण अद्वैत दर्शन शिकताना पाहिले आहेच. म्हणजेच शून्यातून कशाचीही उत्पत्ती होऊ शकत नाही. अस्तित्वच अस्तित्वाला जन्म देते.
सांख्य दर्शनासंबंधी अधिक नंतरच्या लेखात.
No comments:
Post a Comment