Thursday, July 20, 2023

आपल्या इतिहासाची मोडतोड कोणी केली?

आपण ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास शिकलो आहोत/शिकत आहोत. आपले सध्याचे केंद्र सरकार त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्या मनात ब्रिटिशांनी शिकवलेलाच इतिहास आहे. त्यामुळे सरकारचा प्रयत्न म्हणजे आपल्याला इतिहासाचे भगवेकरण वाटते.  म्हणूनच आपल्या इतिहासाची मोडतोड कोणी केली, हे कधीपासून सुरु झाले हे आपण नीट समजून घेणे आवश्यक आहे. 

आपल्या परंपरेत इतिहास लिहिला जात नाही. म्हणून आपला इतिहास ज्ञात नाही असे आपल्याला सांगितले जाते. पण हे अर्धसत्य आहे. आपले पूर्वज इतिहास लिहीत होते. त्यातील काही आजही पाहण्यास मिळतो. उदाहरणार्थ कल्हानाणी सुमारे एक हजार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये  लिहिलेला राजतरंगिणी आजही उपलब्ध आहे. भारतात अनेक विश्वविद्यालय होती. त्यातील ग्रंथालयांमध्ये हा इतिहास उपलब्ध होता. परंतु सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या सर्व विश्वविद्यालयांमधील पुस्तके जाळण्यात आली. केवळ नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय काही महिने जळत होते.  त्यानंतर आपल्या पूर्वजांनी आपल्या इतिहासाचे स्मरण अनेक पाड्यातून ठेवले आणि मौखिक परंपरेने हा इतिहास जिवंत ठेवला. परंतु जेव्हा येथे युरोपियन्स आले त्यांनी आपल्याला सांगण्यास सुरुवात केली की हा मौखिक परंपरेने आलेला इतिहास म्हणजे भाकडकथा आहेत.  आणि मग त्यांनी त्यांच्या सोयीनुसार आपला इतिहास लिहिणे चालू केले. आपण हाच इतिहास शिकलो. 

जेव्हा युरोपियन्स भारतात आले तेव्हा त्यांचा प्रगत संस्कृतीशी प्रथमच परिचय झाला. अशी प्रगत संस्कृती पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी आपल्या कुटुंबव्यवस्थेची खूपच स्तुती केली होती. खरे तर या वेळपर्यंत तुर्की आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर प्रहार केलेले होते. संस्कृतीची नासधूस झालेली होती. मात्र नंतरच्या काळात येथे ख्रिश्चन मिशनरी आले. त्यांनी येथील संस्कृतीवर प्रहार करायला सुरुवात केली. या मिशनऱ्यांच्या प्रवेशामुळे भारतात आपल्या व्यापारावर परिणाम होतो अशी ईस्ट इंडिया कंपनीची धारणा झाली होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात मिशनऱ्यांच्या प्रवेशाला हरकत घेतली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना भारतीय संस्कृती आवडत होती. परंतु मिशनऱ्यांच्या लॉबीने पार्लमेंटच्या सभासदांना आपल्या बाजूला वळविले. इ.स. १८१३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर त्यांचा चार्टर अमेंड करण्याची सक्ती केली आणि येथे मिशनऱ्यांचा प्रवेश सुकर झाला. या मिशनऱ्यांनी  भारतीय संस्कृतीला जंगली ठरविले. 

जेम्स मिल हा स्कॉटिश माणूस चर्चचा मिनिस्टर होता. त्याला पाद्री बनायचे होते. परंतु त्याला काही कारणाने पाद्री होता आले नाही. मग तो लंडनला आला. त्याला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम मिळाले. त्याने भारताचा इतिहास लिहिण्यास घेतला. जेम्सला कोणतीही भारतीय भाषा अवगत नव्हती. तो कधीही भारतात आला नव्हता. तरीही त्याने भारताचा इतिहास लिहिण्यास घेतला. त्याने भारताच्या इतिहासाचे तीन खंड लिहिले. त्याचे नाव आहे James Mills History of India. ते १८०५ साली प्रकाशित झाले. त्याच्या मते त्याने कधीही भारताला भेट न दिल्याने त्याने लिहिलेला इतिहास वस्तुनिष्ठ आहे.  जेम्स मिल स्वत: स्कॉटलंड मधून, म्हणजेच ब्रिटिश वसाहतीतून आलेला होता. ब्रिटिशांचा सच्चा सेवक मनात होता आणि भारताची संस्कृती बदलण्याच्या मिशनरी प्रयोगास त्याची मान्यता होती. त्याला हिंदूंबद्दल खूप आकस होता. त्याच्या मते हिंदू हे केवळ गुलाम बनण्याच्याच लायकीचे होते.   त्याच्या मते ब्रिटिश  भारतीय लोकांना सुसंस्कृत बनविण्याच्या मोहिमेवर भारतात आले आहेत. म्हणूनच या त्याने लिहिलेली भारताच्या इतिहासाची मध्यवर्ती कल्पना हीच आहे. ईस्ट इंडिया कंपनीने यांच्या भारतात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला भारतात येण्यापूर्वी या जेम्स मिल याने लिहिलेलय इतिहासाच्या अभ्यास करणे अनिवार्य  केले होते. त्यामुळे त्यानंतर भारतात येणार प्रत्येक इंग्रज अधिकारी हा हिंदूंबद्दल आणि भारतीयांबद्दल तुच्छता मनात ठेऊनच भारतात पाऊल टाकीत असे. यामुळे या नंतरच्या काळात येथे ब्रिटिशांची दंडेली चालू झाली.  येथे भारतीयांना आणि विशेषतः हिंदूंना अपमानास्पद वागविणे आणि धर्मांतरं करणे हीच आपली जबाबदारी आहे असे त्यांना वाटू लागले.

त्यानंतर मॅक्स मुल्लरने भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानेही आधी जेम्स मिल याच्या पुस्तकाचा अभ्यास केला होता. त्याला भारतीय संस्कृतीतील चांगुलपणा दिसत होता. पण त्याच्या मते येथील मूळच्या 'जंगली' भारतीयांमध्ये अशी संस्कृती उपजणे शक्य नव्हते. मग त्याने उच्च वर्णीय 'आर्य' युरोपातून भारतात आले असल्याचे प्रतिपादन केले.  सुमारे ख्रिस्तपूर्व १५०० साली हे 'आर्य' भारतात आले असल्याचे त्याने सांगितले.  या आर्य आक्रमण थिअरीचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिला म्हणजे 'हिंदू' धर्म भारतात युरोपमधून आला आणि तो येथील मूळ रहिवाशांवर लादला गेला. दुसरा भाग म्हणजे 'संस्कृत' ही मूळची भारतीय भाषा नाही. ती युरोपमधून येथे आली. 

बिशप रॉबर्ट कॉलवेल हा दक्षिण भारतात लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु त्याला अपयश येत होते. या माणसाने मग भारताच्या इतिहासाला अधिक विकृत बनवून आपले कार्य साध्य करण्याचा प्रयत्न केला. या माणसाने 'द्रविड' वादाला जन्म दिला. दक्षिणेतील ब्राह्मणेतर लोक हे द्रविड असून त्यांना 'आर्य' ब्राह्मणांनी गुलाम बनविले असल्याचा विचार त्याने मांडला. खरे तर हा रॉबर्ट युरोपातून आलेले  'आर्य ब्राह्मण'  अधिक सुसंस्कृत असल्याचे मनात होता. परंतु आपला धर्मांतरणाचा हेतू  करण्यासाठी त्याने तथाकथित द्रविड लोकांना भडकविण्यास सुरुवात केली. त्याने अनेक पुस्तके तामिळ भाषेतून लिहिली.  आजही भारतीय क्रमिक अभ्यासात ही आर्य-द्रविड कल्पना 'इतिहास' म्हणून सांगितली जाते. वस्तूत: या कल्पनेला काहीही आधार नाही. ही खोटी कल्पना पसरवून भारतीय समाजात फूट पडणाऱ्या रॉबर्ट कॉलवेलचा भव्य पुतळा आजही चेन्नईचा मरिनाबीचवर आहे. त्याला राजकीय पक्षांकडून वेळोवेळी हारही घातले जातात.  

पुढील काळात पौर्वात्य  इतिहासाचा अभ्यास युरोपमधील महाविद्यालयात चालू झाला. हे अर्वाचीन इतिहास संशोधक युरोपमध्ये राहूनच तेथे उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे हा अभ्यास करत होते. हा अभ्यास प्रामुख्याने इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषेत होत होता.  हा अभ्यास म्हणजे पौर्वात्य इतिहासाच्या फार खोलात न शिरता इतिहासाची ढोबळ मांडणी होती. जेम्स मिल, मॅक्स मुल्लर अशा भारतीय इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या लेखकांचा आधार या अभ्यासात घेतला गेला. त्यामुळे भारतीय आणि  पौर्वात्य संस्कृती जंगली असल्याचेच त्यात दाखविले गेले. उदाहरणार्थ भारत हा गारुड्यांचा देश आहे अशी प्रतिमा त्यांच्याकडून उभी केली गेली. भारतीय इतिहासाचे बाळकडू पाश्चात्य पुस्तकातून घेतलेल्या जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी त्याला हातभार लावला. आपल्या संस्कृतीचे  करतानाही त्या चित्रकारांच्या मनात अशीच प्रतिमा होती. म्हणून अशीच चित्रे भारतात येऊन पाश्चात्य चित्रकार काढू लागले. संस्कृती जंगली आहे हे दाखविताना जगन्नाथ यात्रेत दरवर्षी अनेक जण रथाखाली चिरडले जातात अशासारखा प्रचार सुरु झाला. सतीची परंपरा भारतात सर्वमान्य आहे आणि नियमित पाळली जाते असे दाखविले गेले. भारतात नरबळींची प्रथा सर्वमान्य असल्याचे दाखविले गेले.  जातिप्रथेचे विकृत वर्णन केले गेले. यातून पाश्चात्यांना भारतीय समाजाला सतत अपमानित करायचे होते. भारतीय समाज जंगली असल्याने पाश्चात्य त्यांना संस्कृती शिकवतील,  त्यातून पौर्वात्य समाज अधिक मोठ्या प्रमाणात गुलामीत ढकलला जाईल असा हेतू होता. एका अरब-अमेरिकन विचारवंत एडवर्ड सैद याने १९७० मध्ये यावर प्रकाश टाकला आहे. आजही आपल्याला पाश्चात्य देशांमध्ये ही वृत्ती कमी-अधिक प्रमाणात दिसते. विशेषतः हिंदू धर्माबद्दल ही वृत्ती स्पष्टपणे दिसते. सध्याच्या साहू-राजकीय परिस्थितीमुळे अशा प्रकारे भारतीय समाजाला अपमानित करण्याचा प्रयत्न या राष्ट्रांकडून होत असतो. यावर आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अत्यंत स्पष्टपणे बोलतात. आपलेच डावे  विचारवंत अत्यंत उत्साहाने भारतीय समाजाला परदेशात अपमानित करण्यात भाग घेताना दिसतात. 

मागील हजार वर्षांचा इतिहास तर बराचसा पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. या कालखंडात भारतीयांचे आणि विशेषतः: हिंदूंचे पद्धतशीर शिरकाण झाले.  प्रथम तुर्कांच्या आक्रमणात हे शिरकाण झाले. नंतर ब्रिटिशांच्या काळात कृत्रिम दुष्काळात येथे लाखो भारतीय बळी पडले. गोव्यात इन्क्विझिशनमध्ये अनेक हिंदूंना हाल हाल करून मारले गेले. परंतु याबाबत जगातील आणि भारतातील सगळे इतिहासकार मूग गिळून बसलेले दिसतात. आपल्या कोठल्याही शाळेत शिकविल्या जाणाऱ्या इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात याचा पुसटसा उल्लेखही नाही.  याबाबत ब्रिटिश इतिहासकारांनी काही लिखाण केले आहे. उदाहरणार्थ Elies Endowsan. खरे रे तर Henry Elies यांनी हे लिखाण करण्यास घेतले होते. Elies Endowsan यांनी ते पूर्णत्वास नेले. आठ खंडात हा ग्रंथ लिहिलेला आहे. सुमारे दोनशे अरेबिक आणि पर्शियन लेखकांच्या लिखाणाचा संदर्भ या ग्रंथाला आहे. हे अरेबिक आणि पर्शियन लेखक भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांच्या पदरी होते. जेव्हा इंग्रजांनी भारतात धर्माच्या नावाखाली दुही माजविण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा ग्रंथ अतिरंजित असल्याचा प्रचार ब्रिटिशांच्या छत्राखाली असलेल्या येथील इतिहासकारांनी सुरु केला. स्वातंत्र्यानंतर त्याचीच री येथील डाव्या विचारवंतांनी ओढली. 

भारतीय हे केवळ गुलामी करण्याच्या लायकीचे आहेत असा समज ब्रिटिश राज्यकर्त्यांचा असताना मात्र अमेरिकेत वेगळेच चित्र दिसत होते. १९ च्या  शतकाच्या पूर्वार्धात तेथील सगळ्या युनिव्हर्सिटीज भारतीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भरभरून वहात होत्या.  भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ हिच्या वडील (अथवा आजोबा .. नक्की लक्षात नाही) यांनी अमेरिकेतील एका प्रसिद्ध विद्यापीठात १८७० सालच्या आसपास आपले शिक्षण पूर्ण केले.  भारतात येऊन त्यांनी ठाणे  जिल्ह्यातील मनोरजवळ एक बँक सुरु केली. या बँकेतून १८५७ स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांच्या हातात न सापडलेल्या आणि अजूनही भूमिगत राहिलेल्या स्वातंत्र्ययोद्धयांना मदत केली जात होती. ब्रटिशांच्या हे ध्यानात येताच त्यांनी शिलोत्री यांना अटकेत टाकले. बँक बंद केली. शिलोत्री यांचा अंत तुरुंगातच झाला. अमेरिकेत शिकत असलेल्या भारतीयांनी कॅलिफोर्नियात गदर पार्टीची स्थापना केली होती. या गदर पार्टीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली.  

प्राचीन भारतीय साम्राज्यांबद्दलही माहिती शाळेच्या इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात येणार नाही अशी काळजी ब्रिटिशांनी घेतली होती. हीच प्रथा पुढे आपल्या राज्यकर्त्यांनी चालू ठेवली. गुप्त साम्राज्याचा ओझरता उल्लेख आमच्या पाठ्यपुस्तकात होता. दक्षिणेतील चोळ साम्राज्याचा गौरवशाली इतिहासाचा आपल्याला पत्ताही नसतो. हे साम्राज्य सुमारे १५०० वर्षे गादीवर होते. त्यांनी अगदी सिंगापूरपर्यंत आपला साम्राज्य विस्तार केला होता. सिंगापूर ज्याने वसविले तो राजा या चोळ वंशातील होता. एकदा या चोळ साम्राज्याचा सम्राट निपुत्रिक असल्याने काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा व्हिएतनाम येथे राज्य करीत असलेल्या चोळ घराण्याच्या वंशज राजकुमाराला येथे आणून गादीवर बसविण्यात आले. चोळ साम्राज्याने एका बिकट प्रसंगी चीनच्या राजालाही बेजिंगपर्यंत आपले आरमार पाठवून मदत केली होती. त्या काळी चोळ साम्राज्याचे नौदल हे जगातील एकमेव Blue Water Navy होते. पण हा गौरवशाली इतिहास आम्ही कधी शिकलोच नाही.  वास्को द गामा याला भारताचा रस्ता राम नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने दाखविला होता. हा व्यापारी बारा गलबते घेऊन आफ्रिकेत गेला होता. तेथे त्याची वास्को द गामा बर्बर मैत्री झाली. वास्को द गमाने त्याला केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात कसे जायचे याचे मार्गदर्शन केले होते. पण हा इतिहास आम्हाला कधी सांगितलं गेलाच नाही. कोरियाची राणी ही अयोध्येची राजकन्या होती. तिच्या सोबत गेलेल्या पंडितांनी  कोरियन लिपी तयार केली आहे. म्हणून ती 'बाराखडी' या स्वरूपात आहे याचा आम्हाला कधी पत्ताच लागू दिला नाही. कुशाण हे परकीय हूण होते असेच शिकविले गेले. कुशाण हे हूण वंशाचे नव्हते. ते भारतीय वंशाचेच होते. ते कुरु प्रदेशातून आलेले होते. हा भाग काश्मीरच्या उत्तरेला आहे.  तो भाग भारतीय म्हणूनच ओळखला जात होता. त्यांची भाषाही भारतीय भाषासमूहामधील होती. त्यांची संस्कृती भारतीय होती. आणि त्यांचे भारतीय संस्कृतीत मोठे योगदान आहे. कुशाण राजांपैकी कनिष्कने पूर्ण पूर्व आशियामध्ये भारतीय संस्कृती लोकप्रिय केली. कनिष्कने पाडलेली नाणी मिळाली आहेत. त्यावर एका बाजूस कनिष्क राजाचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूस देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. यात अनेक देवदेवता आहेत. यात हिंदू, ग्रीक आणि बौद्ध देवतांच्या प्रतिमा आहेत. त्यापैकी सुमारे पाच टक्के नाण्यांवर गौतम बुद्धाच्या प्रतिमा आहेत. परंतु केवळ या आधारावर कनिष्काला बुद्ध धर्मीय ठरवले गेले. खरे तर बौद्ध हा येथील हिंदू धर्माचाच एक पंथ होता. त्याला राजकीय कारणांसाठी नंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी (जेम्स मिल याने मुख्यतः:) हिंदू धर्मापासून वेगळे केले. अशा प्रकारे पूर्णतः अशास्त्रीय संशोधनातून येथील हिंदू संस्कृतीवर, हिंदू आत्मविश्वासावर सातत्याने प्रहार करण्यात आले. 

पाठयपुस्तकातील  इतिहास केवळ मुघल साम्राज्याचे वर्णन करणारा असतो. मुघल हे तुर्की होते. त्यांना आपले पूर्वज 'तुरुष्क' या नावाने ओळखत. नरहर कुरुंदकर यांनी वर्णन केल्याप्रमाणे आपल्या इतिहासाचे इंग्रजांनी अशास्त्रीय तुकडे तोडले आहेत. यामुळे मुस्लिमांचा आपण भारतावर राज्य केले. म्हणून आपण हिंदूंपेक्षा वरचढ आहोत असा समज होतो. हिंदूंना आपण 'गरीब बिच्चारे' आहोत असे वाटून हीनगंड निर्माण होतो. तर ब्रिटिशांनी नंतर सर्वांवर राज्य केल्याने ते हिंदू-मुस्लिमांपेक्षा वरचढ असल्याची भावना निर्माण होते.  ब्रिटिशांनी असा इतिहास आपल्याला शिकविला.  ब्रिटनमध्ये जॉन मिलचा इतिहास वाचून Discovery of India सारखी पुस्तके लिहीत भारत शोधणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना आपला गौरवशाली इतिहास कधी कळलाच  नाही. 

स्वातंत्र्यानंतर आपल्या तेव्हाच्या सरकारने स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे पूर्णतः तोडमोड केली. सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतीकारकांना दुर्लक्षित करण्यात आले. जागोजागी ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या आदिवासी जमातीच्या योगदानाचा कोठेच उल्लेख नाही. 


No comments:

Post a Comment