Thursday, July 20, 2023

विचारयात्रा - परा-पश्यन्ति-मध्यमा-वैखरी

 प्राचीन भारतीय तत्वज्ञानाने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण केले आहे. भतृहरी ऋषी (इ.स. सुमारे ४५० ते ५००)हे मोठे व्याकरण तज्ज्ञ होते. आपल्या तोंडून शब्द येताना त्याची प्रक्रिया त्यांनी 'वाक्यपदीय' या ग्रंथात समजावून सांगितली आहे. 

आपल्या तोंडातून येणारे शब्द हे प्रथम विचार बनून आपल्या मनात येतात. तोंडावाटे निघणारे शब्द हे 'वैखरी वाणी' बनून येतात. तोंडावाटे शब्द हे प्रथम 'मध्यमा वाणी बनून येतात. एखाद्या बासरीमधून येणारे सूर हे त्या बासरीच्या आत नसतात. ती फुंकणाऱ्या माणसाच्या श्वासातून हे सूर उमटत असतात. बासरी केवळ त्यांना रूप देणारे  यंत्र आहे. तसेच आपल्या तोंडातून निघणारे शब्द हे केवळ आपल्या मनात येणाऱ्या विचारांची अभिव्यक्ती आहे. 

हे विचार आपल्या मनात शब्दरूपाने जन्म घेतात. हे शब्द एखाद्या भाषेचा आधार घेऊनच येतात. मला मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषा चांगली अवगत आहे. म्हणूनच हे विचार केवळ त्याच भाषेचे शब्द घेऊन प्रकट होतील. विचारांचे प्रकटीकरण कोणत्यातरी भाषेच्या साहाय्याने आपल्या मनात होते (अजून तोंडावाटे शब्द बाहेर आलेला नाही), हीच मध्यमा. मध्यमा ही वैखरीपेक्षा अधिक सूक्ष्मात जन्माला येते. 

मात्र हे विचार शब्दात जन्माला येण्याआधी त्यांची जुळवाजुळव मनात सुरु होते. नंतरच त्याला शब्दरूप मिळून ते मध्यमेत उतरते. ही जी शब्दरूप मिळण्याआधी विचारांची अवस्था आहे त्याला भर्तृहरीऋषी 'पश्यन्ति' म्हणतात. 

हे विचार पश्यन्तीमध्ये जन्माला येण्याआधी (काही क्षण तरी) मनाची अवस्था निर्विकार-निर्विचार असते. निर्विकार ही आकाशाची अवस्था आहे. 'आकाश' हे पंचमहाभुतांमधील सर्वात सूक्ष्म आहे. त्याचे तन्मात्र (म्हणजेच प्रकटीकरण) शब्द आहे. विचार मनात येतात (पश्यन्ति अवस्थेत) ते या आकाशातूनच. हीच ती विचारांची परावस्था. याला काहीजण परब्रह्म असेही म्हणतात. 

ज्यावेळी विचार पश्यन्तीमध्ये उतरतात तेव्हा शरीरावर कोठे ना कोठे काही संवेदना उमटतात. कधी श्वासाच्या  गतीत बदल होतो तर कधी शरीराच्या एखाद्या भागावर झिणझिण्या अथवा अन्य संवेदना उमटतात. आपण यावेळी  आपल्या शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत असलो तर पश्यन्तीकडून हे विचार माध्यमेकडे जाताच आपण त्यांना पकडू शकतो. आपण यावेळी या विचारांवर काही प्रतिक्रिया दिली नाही (समत्व) तर आपल्याला या विचारांचा त्रास होत नाही. पण अनेकवेळा आपण शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत नसतो. अजाणतेपणी आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. मग आपण अस्वस्थ होत जातो. 

विपश्यना ध्यानात आपण आपल्या शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत होतो. त्यामुळे आपण शांत होत जातो. आपल्या ऋषींनी प्राचीन काळी यावर संशोधन करून आपल्याला विपश्यना ध्यानाची देणगी दिली. वेदांमध्ये विपश्यना ध्यानाचा उल्लेख आहे. मात्र प्राचीन काळी हे ज्ञान फक्त गुरु-शिष्य परंपरेने देण्याची पद्धत असल्याने त्याचे विस्तृत विवेचन प्राचीन ग्रंथात नाही. गौतम बुद्धाने विलुप्त झालेली विपश्यना विद्या अथक परिश्रमाने परत शोधून काढली आणि सामान्य लोकांना लाभ व्हावा म्हणून टप्प्याटप्प्याने शिकविण्याची पद्धत विकसित केली. मी ही विद्या गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात शिकलो आहे. 

विचारांच्या उगमाचा अभ्यास करणाऱ्या भर्तृहरीऋषींना प्रणाम. 

No comments:

Post a Comment