Thursday, July 20, 2023

अध्यात्मिक भाषा

अध्यात्मिक अनुभव सांगताना अथवा अध्यात्मिक विषय समजावून सांगताना भाषा तोकडी पडते.  आपण आपली भाषा अनुभवाद्वारे शिकतो. उदाहरणार्थ लाल फुल दाखवून हा लाल रंग आहे असे लहान मुलाला (रंग ही संकल्पना माहीत नसलेल्या) सांगितले तर त्याला कळणार नाही. पण लाल फुल आणि लाल रंगाची अन्य गोष्ट एकाचवेळी दाखवून दोन्ही लाल आहे असे सांगितले तर तो कदाचित लाल म्हणजे काय हे समजू शकेल. म्हणजेच भाषा समजण्यासाठी आधी अनुभूती यावी लागले. या अनुभूतीचा अर्थ लावण्याची क्षमता अंगी बाणवावी लागते. 

आपण दुसरे उदाहरण घेऊ. एखाद्या माणसाने आयुष्यात कधीही गोड  पदार्थ खाल्ला नसेल तर त्याला केवळ शब्दांनी गोड म्हणजे काय हे कळणार नाही. मग त्याला आपण 'ते खाल्ल्यावर छान वाटते' इत्यादी भाषेत समजाविले तरी त्याला त्या चवीचे पूर्ण आकलन होणार नाही. 

अध्यात्मात एखादी संकल्पना अथवा अनुभव स्पष्ट करताना हीच समस्या समोर उभी ठाकते. एखाद्याला अध्यात्मिक अनुभव नसेल (आणि तो अनेकांना नसतो) त्याला काही अनुभव आलेला सांगणार कसा? मग त्या अनुभवाच्या जवळपास जाणारे काहीतरी म्हणजे 'प्रकाश दिसला' वगैरे सांगावे लागते. पण ते पूर्णपणे सत्य नसते. 

म्हणूनच अध्यात्मिक अनुभव शब्दात उतरताच 'असत्य' होऊन जातो.  अध्यात्मिक अनुभव आलेले अनेक साधक यामुळेच अनुभवासंबंधी काहीही वाच्यता न करणे अधिक शहाणपणाचे समजतात. 

No comments:

Post a Comment