माझा जवळचा मित्र आणि मी राष्ट्रसेवादलात असतानाचा माझा जुना सहकारी असलेल्या एकाने माझ्या एका पोस्टवर कॉमेंट करताना 'विज्ञाननिष्ठेचा' उल्लेख केला. राष्ट्र सेवादलाच्या पाच तत्वांपैकी विज्ञाननिष्ठा हे एक तत्व आहे. माझा हा मित्र १९८२ साली राष्ट्रसेवादलाने महाराष्ट्रात काढलेल्या विज्ञानयात्रेत सहभागी झाला होता. त्यामुळे विज्ञाननिष्ठा या तत्वाबद्दल त्याची बांधिलकी मी समजू शकतो.
विज्ञाननिष्ठा हे तत्व राष्ट्रसेवादलाने स्वीकारले असले तरी दुर्दैवाने त्याबाबत स्पष्टता नाही. काही नव सेवादलसैनिक या तत्वाला 'देवधर्मविरोध' असेही मानतात. खरेतर राष्ट्रसेवादलाचे एक आद्य नेते आणि ४२च्या चलेजाव आंदोलनाच्या पाच तरुण नेत्यांपैकी एक 'अच्युतराव पटवर्धन' हे स्वातंत्र्य मिळाल्यावर वाराणशीला जाऊन ध्यानधारणेत रमले होते. आयुष्याच्या अखेरीस ते परत आपल्या घरी पुण्यात आले. पण त्यांनी विजनवासात राहणे पसंत केले. पुण्यात राष्ट्र सेवादलाचे मुख्य कार्यालय असूनही राष्ट्रसेवादलाच्या कोठल्याच कार्यक्रमात ते दिसले नाहीत. कदाचित सेवादलाच्या नवीन नेतृत्वाने सेवादलाच्या पंचतत्वांचे जे अर्थ लावले आहेत ते त्यांना मान्य नसावेत. राष्ट्रसेवादलाच्या पंचतत्वांवर सेवादलात कधीही विचारमंथन होताना दिसत नाही. नव्या साथींना या पंचतत्वांबद्दल पुसटशीही माहिती नसावी.
विज्ञाननिष्ठा या नावातच विरोधाभास भरलेला आहे असे मला वाटते. निष्ठा ही एखाद्या चिरस्थायी तत्वावर ठेवायची असते. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत या विश्वाच्या सर्व रहस्यांचा शोध लवकरच विज्ञान लावेल असा विश्वास वाटत होता. न्यूटोनियन फिजिक्स हे अंतिम तत्व मानले गेले होते. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समजुतींना हादरे बसण्यास सुरुवात झाली. Relativity सिद्धांतामुळे न्यूटनचे नियम एका विशिष्ट परिस्थितीत सत्य आहेत हे लक्षात आले. Heisenberg uncertainty principle ने विज्ञान निश्चित काही सांगू शकेल का नाही याबद्दल शंका निर्माण केल्या. विश्वाचे रहस्य उलगडताना विश्वाचे प्रसारण होण्याचा वेग वाढत असल्याचे ध्यानात आले. यासाठी ऊर्जा कोठून येते हे समजेना. मग या उर्जेला डार्क एनर्जी असे नाव दिले गेले. ही अज्ञात ऊर्जा एकूण ऊर्जेच्या ९६ टक्के आहे असे दाखवून दिले गेले. हे विश्व प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रसरण पावत आहे हे लक्षात आले. आजवर प्रकाशाचा वेग ही सर्वोच्च वेग मानला जात होता. मग या विश्व प्रसरणाच्या वेगाचे रहस्य निर्माण झाले. आता तर विश्वाचे गुरुत्वाकर्षण बल कमी होत चालले असून त्यातून मुक्त होणारी ऊर्जा ही विश्व प्रसरणासाठी वापरली जाते असा सिद्धांत आला आहे.
सूक्ष्मात अधिक शिरल्यावर अणूचे विभाजन होते हे लक्षात आले. या कणांचे आधी विभाजन करताना केवळ सूत्रे हातात आली. यावरील गणिते करताना दहा मिती गृहीत धरल्या तर गणिते सोडविता येतात हे ध्यानात आले. आपले विश्व आणि विज्ञान चार मितींवर (काळ आणि लांबी, रुंदी, खोली) आधारलेले आहे. मग विश्व निर्मितीच्या महास्फोटात चार मिती आपल्या विश्वात आल्या आणि सहा मितींचे वेगळे विश्व अथवा विश्वे निर्माण झाली काय हा प्रश्न पडतो. या अन्य मिती असलेले विश्व कदाचित आपल्या आसपासच असू शकेल.
Hard Problem of Consciousness हा विज्ञानाला पडलेला प्रश्न आहे. आपली ज्ञानेंद्रिये माहिती गोळा करतात. ती मेंदूपर्यंत कशी जाते याचा शोध विज्ञानाला लागलेला आहे. पण या विद्युत स्पंदनांचे परत माहितीत (चित्र, गंध इत्यादी) रूपांतर कसे होते, आपल्या चैतन्यासमोर ते कसे उभे ठाकते हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
केवळ धर्माला विरोध करणे, केवळ प्रचलित विज्ञाननियमांत बसत नाही म्हणून निरनिराळ्या बाबांचे चमत्कार खोटे ठरविणे हीच जर विज्ञाननिष्ठा असेल तर हा फारच उथळ विचार आहे असे म्हणावे लागेल. विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपल्या विचारात स्पष्टता आणावी ही विनंती.
No comments:
Post a Comment