Wednesday, July 19, 2023

सांख्य दर्शन - २

 सांख्य दर्शनाचे प्रणेता आणि हे दर्शन कसे विकसित होत गेले हे आपण मागील भागात पाहिले. आता या दर्शनात काय सांगितले गेले आहे ते पाहू. 

कोणत्याही दर्शनाचा एक आधार असतो. 'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा आधार आहे. याचा अर्थ सत् कार्याच्या निर्मितीसाठी सत् कारणांची उपस्थिती आवश्यक असते. सत् याचा अर्थ 'अस्तित्व' हे आपण पूर्वी अद्वैतवाद शिकताना पाहिले आहे. याचा अर्थ अस्तित्व हे केवळ अस्तित्वातून निर्माण होऊ शकते. ते शून्यातून (असत्) अथवा अन्य कशातूनही निर्माण होऊ शकत नाही. एखादी दैवी शक्ती अस्तित्व निर्माण करू शकत नाही. हाच सत्कार्यवाद आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. आधिनिक विज्ञानाच्या बिग बँग सिद्धांतानुसारही विश्व एका बिंदूतून निर्माण आले आहे, शून्यातून नाही. 

सत्कार्यवादाचे दोन पैलू आहेत. 'कारण' आणि 'कार्य'. 'कार्य' म्हणजे परिणाम. कारणात कार्य घडविण्यासाठी योग्य असा शक्तिसंचय (Potential) असावा लागतो. कारण हे दोन प्रकारचे असते. 'निमित्त कारण' आणि 'उपादान कारण'. जर आपल्यासमोर एक मातीचा घट आहे. तर तो अस्तित्वात येण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे 'माती' आणि दुसरे म्हणजे 'कुंभार'. जर माती नसेल तर तो घट बनविता येणार नाही. तसेच कुंभार नसेल तरीही तो घट बनविता येणार नाही. कुंभार हे 'निमित्त कारण' आहे तर माती हे 'उपादान कारण' आहे.  'ईश्वराने ' ही सृष्टी बनवली असे मानणारी दर्शने/धर्म केवळ निमित्त कारण दर्शवितात असे कपिलमुनींचे मत होते.  म्हणूनच कपिलमुनींनी 'उपादान कारणाचा' शोध घेण्यास सुरुवात केली. 

आपल्यासमोर 'कार्य' अस्तित्वात आहे. तेव्हा कारण असलेच पाहिजे. पण कधीकधी कारण आपल्याला समोर येत नाही. उदाहरणार्थ ही सृष्टी आपल्यासमोर आहे. म्हणजेच 'कार्य' आहे. पण त्यामागचे कारण आपल्यासमोर नाही. अशावेळी अनुमानाच्या साहाय्याने आपल्याला कारणाचा शोध घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आपल्यासमोर मातीचा घडा आहे. आपण लोखंड, माती, लाकूड इत्यादी बघून या घड्याच्या 'उपादान' कारणाचा वेध घेऊ शकतो. हा घडा मातीचा बनला असेल असे सांगू शकतो. 

जेव्हा आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्माण्ड पाहिले तेव्हा एक अनुमान असे होते की हे ब्रह्माण्ड ज्यापासून तयार झाले (उपादान कारण) हे ब्रह्माण्डासारखेच असले पाहिजे. ब्रह्माण्डात काही गोष्टी प्रकाशमान आहेत, काही गतिमान आहेत तर काही अंध:कारमय आहेत. पृथीवरील माणसांचे निरीक्षण करतानाही असे दिसले की काही माणसे प्रसन्न आहेत, आपली कामे प्रसन्न चित्ताने वेळच्यावेळी करत आहेत, काही माणसे अत्यंत धावपळीत आहेत, आपली कामे वेगात करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण ती थकलेली आहेत. प्रसन्न नाहीत. तर काही माणसे आळसात जीवन घालावीत आहेत, प्रसन्न नाहीत. अशा प्रकारे ब्रह्माण्डातील विविध गोष्टींचे वर्गीकरण या ऋषीमुनींना तीन प्रमुख प्रकारात करता आले. त्यामुळे सृष्टीनिर्मितीच्या  मूळ उपादान कारणातही ही तीन गुण असले पाहिजेत असे अनुमान त्यांनी काढले. सृष्टीच्या उपादान कारणाला त्यांनी 'प्रकृती' हे नाव दिले. प्रकृती याचा अर्थ प्र+कृती. प्र म्हणजे आधीचे कृती म्हणजे कार्य. प्रकृती 'प्रधान' आहे असे त्यांनी मानले. 'प्रधान' म्हणजे सगळ्याच्या पूर्वी. प्रकृतीला 'सर्वगर्भा' असेही नाव दिले. 

वर पाहिलेलं हे जे तीन गुण प्रकृतीत असले पाहिजेत असे ऋषीमुनींनी म्हटले आहेत त्यांना सत्व, रज आणि तम अशी नावे दिली.  सत्वगुण प्रकाशमान आहे, रजगुण गतिमान आहे तर तमोगुण अंध:कारमय आहे, उदासीन आहे. मूळ प्रकृतीत हे तिन्ही गुण साम्यावस्थेत (Equilibrium) असले पाहिजेत. म्हणूनच मूळ प्रकृती निर्गुण आहे, Formless आहे. या मूळ प्रकृतीमध्ये कोठलीही चेतना नाही, ती 'जड' आहे, 'अव्यक्त' आहे. मात्र ती असीम (Infinite Potential)आहे.   मातीपासून घडा बनवायचा का अन्य काही हे माती हे सांगू शकत नाही. कारण माती ही 'जड' आहे, चेतनाशून्य आहे. तसेच प्रकृती तिच्या तीन गुणांपासून विश्वाची जडणघडण करू शकत नाही. 

मातीपासून घट बनविण्यासाठी कुंभाराची आवश्यकता आहे, चेतनेची आवश्यकता आहे, 'निमित्त कारणाची' आवश्यकता आहे. तसेच प्रकृतीपासून सृष्टीच्या निर्मितीसाठी चेतनेची आवश्यकता आहे. याच चेतनेला 'पुरुष' असे संबोधले गेले आहे. प्रकृतीत असलेल्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या मिश्रणाने ही सृष्टी बनते (तीन मूळ रंगांच्या साहाय्याने सगळे रंग बनतात तसेच). या गुणांचे कोणत्या प्रमाणात मिश्रण करायचे हे पुरुषाची चेतना ठरवते. 

पुढील लेखात आपण सृष्टी निर्मितीच्या अधिक खोलात जाऊ. तेथून आपण आपल्याला अनुभवायला लागणाऱ्या दु:खाचे कारण शोधू. या दु:ख निवारण्यासाठी सांख्य दर्शन काय सांगते हे पाहू. या दर्शनाची मोक्षाची कल्पना काय आहे ते ही पाहू. 

No comments:

Post a Comment