( पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण मागील पन्नास वर्षे पंचांग - दिनदर्शिका तयार करीत आहेत. भारतीय पंचांगे तयार करण्यात कसा कसा चांगला बदल होत गेला ते या लेखात त्यांनी सांगितले आहे . सध्या भारतीय पंचांगे ही दृक् गणितावर आधारलेली आहेत. जसे आकाशात दिसते तसे पंचांगात दिलेले असते आणि जसे पंचांगात दिलेले असते तसेच आकाशात प्रत्यक्ष दिसते. सध्या
पंचांगांबरोबरच ग्रेगोरियन वर्षारंभाप्रमाणे दिनदर्शिकाही प्रसिद्ध होतात. प्रत्येक इंग्रजी तारखेपाशी त्या त्या दिवसाचे पंचांग आणि सण-उत्सव दिलेले असतात.)
सण-उत्सव कशासाठी असतात ? असा प्रश्न काही लोक विचारतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य ! शरीराचे आरोग्य मुख्यत्वे करून आहारावर अवलंबून असते. ठराविक ऋतूत ठराविक आहार घेतला तर माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होते. सणांप्रमाणे आपण आहार करतो. म्हणून ठराविक सण सण ठराविक ऋतूंमध्ये साजरे केले जातात. म्हणजे पहा. उपवासाचा श्रावण मास हा पावसाळयात येतो. पावसाळयात शरीराचे चलनवलन कमी होते, भूक कमी लागते. हलक्या आहाराची शरीराला आवश्यकता असते. थंडीमध्ये भूक जास्त लागते. शरीराला तेल-तुपाची जास्त आवश्यकता असते म्हणून दिवाळी, मकर संक्रातीसारखे सण थंडीत येतात. परंतू सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण आणि ऋतू यांची सांगड घालण्यासाठी आपल्या पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. परंतू कधीकधी एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्रमहिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास धरला जातो. या नियमाप्रमाणे पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येणार आहे.
उत्सवांमध्ये आप्तेष्ट-मित्रमंडळी एकत्र येत असतात. त्यामुळे आपणास आनंद प्राप्त होतो. दु:ख- चिंता आपण विसरून जातो. मनाचे आरोग्य उत्सवांमुळे चांगले राहते. तसेच देव-देवतांचे आदर्श गुण आपल्या अंगी यावेत यासाठी त्यांची जयंती आपण साजरी करीत असतो. त्यांचे पूजन करीत असतो. समाजातील गरीबांना मदत व्हावी यासाठी आपल्या कमाईतून दान करण्यास सांगितले आहे. पाप-पुण्याची व्याख्या महर्षी व्यास आणि संत तुकारामानी सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य ! पंचांग म्हणे फलज्योतिष नव्हे ! पंचांग म्हणजे खगोल गणिताने सिद्ध केलेले आकाशाचे वेळापत्रक आहे म्हणून पंचांग आणि सण-उत्सव या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहायला पाहिजे.
पंचांगातील दृक् गणित
समजा पंचांग- दिनदर्शिकेत एखाद्या दिवशी ग्रहण दिसेल असे लिहीलेले आहे आणि प्रत्यक्ष आकाशात ते त्या दिवशी दिसले नाही तर काय होईल ? अमावास्येनंतर अमुक दिवशी नूतन चंद्रकोर दिसेल असे लिहीलेले आहे आणि ती दिसली नाही तर काय होईल ? अमुक दिवशी दोन ग्रहांची युती होईल असे लिहीले आहे आणि त्या दिवशी ती युती आकाशात दिसली नाही तर काय होईल ? तुमचा पंचांग दिनदर्शिकेवरचा विश्वास उडेल ना ? नेमकी असेच आपल्या पंचांग - दिनदर्शिकांच्या बाबतीत होणार होते. परंतू तसे ते झाले नाही. सध्या जसे पंचांग- दिनदर्शिकेत दिलेले असते तसेच आकाशात दिसते आणि जसे आकाशात घडते तसेच पंचांग-दिनदर्शिकेत दिलेले असते. याला कारणीभूत आहेत श्री. गणेश दैवज्ञ आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! या दोन विद्वानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आत्ताच्या पंचांग-दिनदर्शिका या दृक् गणितानुसार तयार केल्या जात आहेत.
प्रथम आपण पंचांग म्हणजे काय ते पाहूया. (१) तिथी (२) वार (३) नक्षत्र (४) योग आणि (५) करण या पाच गोष्टी यामध्ये प्रामुख्याने दिलेल्या असतात म्हणून याला ‘ पंचांग ‘ म्हणतात. दिनदर्शिकेत पंचांगातील माहिती ही ग्रेगोरियन म्हणजे इंग्रजी तारखेनुसार दिलेल्या असतात. पंचांग अगोदर तयार केले जाते आणि त्यावरूनच दिनदर्शिका तयार केली जाते. परंतू कालगणनेमध्ये या पाच गोष्टी एकदम प्रचारात आलेल्या नाहीत. कालगणनेत ‘तिथी ‘ या इसवीसनपूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आल्या. ‘वार ‘ हे इसवीसनपूर्व १००० वर्षांपासून प्रचारात आले. भारतीयांना नक्षत्राचे ज्ञान इसवीसनपूर्व तीन हजार वर्षांपासून होते. कालगणनेत ‘ नक्षत्रांचा ‘वापर इसवीसनपूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आल्या असे काही संशोधकांचे मत आहे. कालगणनेत ‘ योग ‘ हे उशीरा म्हणजे इसवीसन ७०० वर्षांनंतरच प्रचारात आले.’ करण ‘ कालगणनेत इसवीसनपूर्व १५०० पासून प्रचारात आले असे ‘ भारतीय ज्योति:शास्त्राचा इतिहास ‘ या ग्रंथाचे लेखक ज्योतिर्विद् शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी सांगितले आहे. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षांत आली असेल प्राचीनकाळी पंचांग हे पाच अंगांची माहिती देणारे नव्हते. ते एकांग, द्व्यंग, त्र्यंग आणि चतुरंगही होते . मेषादी राशी भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचारात आल्या. पंचांगाचे गणित ज्या ग्रंथांवरून करतात त्या ग्रंथाना ‘ करण ग्रंथ ‘ म्हणतात.
पूर्वी मुद्रणकला नव्हती, त्यावेळी करण ग्रंथांवरून हस्तलिखित पंचांग तयार करून ग्रहण, संक्रांत इत्यादी माहिती तोंडी करून दिली जात असे. दि. १६ मार्च १८४१ रोजी मुंबई येथून गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापलेले पहिले मराठी पंचांग प्रसिद्ध केले. या पहिल्या पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुळे यांनी तयार केले होते. त्या वर्षापासून दरवर्षी पंचांगे छापील रूपात प्रसिद्ध होऊ लागली.
पंचांग म्हणजे खगोलगणित
पंचांग म्हणजे खगोल गणित ! चांद्र महिने आणि आकाश याचा कसा संबंध आहे तो पहा. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आपणास दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते. चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. वैशाख महिन्यात विशाखा, ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा, आषाढ महिन्यात पूर्वाषाढा, श्रावण महिन्यात श्रवण, भाद्रपद महिन्यात पूर्वा भाद्रपदा, आश्विन महिन्यात अश्विनी, कार्तिक महिन्यात कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यात मृगशीर्ष, पौष महिन्यात पुष्य, माघ महिन्यात मघा आणि फाल्गुन महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या त्या नक्षत्रात असतो. असे जानेवारी, फेब्रुवारी या इंग्रजी महिन्यांचे नसते.
भारतात पंचांगामुळे खगोलगणित संशोधनात आणि खगोलगणित संशोधनामुळे पंचांगात सुधारणा होत गेल्या हे खूप महत्वाचे आहे. ठराविक ऋतूमध्ये ठराविक धार्मिक विधींचे पालन करावे हा मूळ उद्देश आहे. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून अगदी पहिल्यापासून भारतीय पंचांग हे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले आहे. विशेष म्हणजे भारतीय कालगणनेत वसंत संपात बिंदूला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्या ग्रंथावरून पंचांगाचे गणित करतात त्या ग्रंथाला ‘ करणग्रंथ ‘ असे म्हणतात.
पंचांग विकासाचे तीन प्रमुख टप्पे मानले जातात.
(१) वैदिक कालखंड - अज्ञात भूतकाळापासून इ. सन पूर्व १५०० पर्यंतचा काळ. या काळात ऋग्वेद, संहिता, ब्राह्मण ग्रंथ लिहीले गेले. वेदांमध्ये वर्ष सौर आहे. महिने चांद्र आहेत. एका वर्षाचे ३६० दिवस व त्यांची १२ महिन्यात विभागणी करण्यात आली होती. चांद्र महिन्यांना त्या काळी मधू, माधव, शुक, शुची, नभ, नभस्य, ईश, ऊर्जा , सहस, सहस्य, तपस्, तपस्य अशी नांवे होती. उत्तरायण आणि दक्षिणायन अशी दोन अयने, सहा ऋतू व क्रांतीवृत्तावरील २७ नक्षत्रे निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी पंचांग चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले होते.अधिक महिना ( म्हणजे इंटर कॅलरी मंथ ) घेऊन ऋतूशी सांगड घालण्यात येत होती. त्याकाळी वर्षारंभ वसंत संपात बिंदूपासूनच होत असे. यज्ञयागादी धार्मिक विधी अवष्टंभ बिंदूवर ( विंटर सोल्स्टाइस ) केले जात असत. त्याकाळी वसंत संपात बिंदू कृत्तिका नक्षत्रात होता. म्हणून तैत्तिरिय संहितेत कृत्तिकेला पहिले स्थान देण्यात आले आहे. सध्या वसंतसंपात बिंदू उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे हे आपणास माहित असेलच.
(२) वेदांग ज्योतिष कालखंड- इ. सन पूर्व १५०० ते इ. सन ४०० पर्यंतचा हा काळ मानला जातो. इ.सन पूर्व १४०० वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वी लगध ऋषींनी ‘ वेदांग ज्योतिष ‘ या करणग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील गणितावरून लगध ऋषी हे काश्मीरमध्ये रहात होते असे दिसून येते. वेदांग ज्योतिषाच्या दोन संहिता उपलब्ध आहेत. ऋक् ज्योतिष म्हणजे ऋग्वेदीय वेदांग ज्योतिष आणि याजुष ज्योतिष म्हणजे यजुर्वेदीय वेदांग ज्योतिष. ऋग्वेदीय वेदांग ज्योतिषात ३६ श्लोक आहेत. यजुर्वेदीय वेदांग ज्योतिषात ४४ श्लोक आहेत त्यापैकी ३० श्लोक हे ऋक् ज्योतिषाप्रमाणेच आहेत. यामध्ये सूर्य अवष्टंभ बिंदूत ( म्हणजे विंटर सोल्स्टाइस) प्रवेश करतो असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे अनेक पाश्चात्य विद्वानांना या ग्रंथाविषयी आश्चर्य वाटले. अनेक संशोधकांनी वेदांग ज्योतिषामधील श्लोकांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांनी वेदांग ज्योतिष संहितेचे विशेष संशोधन करून दोन भागात ग्रंथ लिहिला. पाश्चात्य पंडितानी लावलेल्या अर्थात त्रुटी आहेत हे त्यांना समजावे यासाठी हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला. वेदांग ज्योतिषात युग पाच वर्षांचे मानले आहे. एका युगात १८३० सावन दिवस व १८६० तिथी मानल्या जात. एका युगात ६० सौरमास व ६२ चांद्रमास असत. पाच वर्षात दोन अधिकमास येत. वेदांग ज्योतिष हा करणग्रंथ अभ्यासकांना आजही उपलब्ध आहे.
(३) सिद्धांत ज्योतिष कालखंड - या कालखंड इ. सन ४०० पासून आधुनिक काळापर्यत मानला जातो. या कालखंडामध्ये सन ४९९ मध्ये आर्यभट यांचा ‘ आर्यभटीय ‘ आणि वराहमिहीर यांचा ‘ पंचसिद्धांतिका ‘ हे ग्रंथ निर्माण झाले. त्यानंतर ‘ सूर्यसिद्धांत ‘ हा करणग्रंथ प्रचारात आला. या ग्रंथाचा कर्ता मात्र अज्ञात आहे. काही संशोधकांच्या मते हा लाटकृत असावा. काहीना या ग्रंथकर्त्याचे नाव सूर्य असावे असे वाटते. सूर्यसिद्धांत हा करणग्रंथ सन ४७५ मधील असावा. या ग्रंथात १४ प्रकरणे असून ५०० श्लोक आहेत. ग्रहगती, चंद्र-सूर्याची ग्रहणे, चंद्रसूर्याचे उदयास्त यांची गणिते या ग्रंथात आहेत. आजही हा ग्रंथ अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. या करणग्रंथावरून तयार केल्या जाणार्या पंचांगांना ‘ सूर्यसिद्धांतीय पंचांगे ‘ म्हणून ओळखले जाई.
विशेष म्हणजे सुमारे एक हजार वर्षे या करणग्रंथावरून पंचांगे तयार केली जात. गंमत म्हणजे या करणग्रंथावरून केलेल्या पंचाग गणित आणि प्रत्यक्ष आकाश याविषयी कुणीही पडताळणी केलेली नसावी. किंवा पंचांगकर्ते या ग्रंथावरून केलेल्या गणितात वैयक्तिक अनुभवातून बदल करीत असावेत. सूर्यसिद्धांत ग्रंथावरून केलेले गणित आहेना, तेच खरे ! प्रत्यक्ष आकाशात काहीही होवो अशी मानसिकता देखील झाली असावी.
गणेश दैवज्ञांचे कार्य
सूर्यसिध्दांत करणग्रंथावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यांची फारकत होतच राहिली. महाराष्ट्रातील कोकणात मुरुड- जंजिरा जवळ ‘ नांदगाव ‘ नावाचे एक गाव आहे. तेथे एक सिद्धिविनायक मंदिरही आहे. तेथे केशव दैवज्ञ नावाचे एक विद्वान पंडित रहात होते. ते सिद्धिविनायक मंदिरात रोज श्रीगणेशाची पूजा करीत असत. तसेच ते सूर्यसिद्धांत ग्रंथावरून पंचांग तयार करून गावात सांगत. त्यांनी पंचांगगणिताचा ‘ ग्रहकौतुक ‘हा करणग्रंथ आणि मुहूर्तशास्त्रावर ‘ मुहूर्ततत्त्व ‘ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या लक्षात आले की सूर्यसिद्धांतावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यात फरक पडत आहे. केशव दैवज्ञ यांचा मुलगा गणेश दैवज्ञ याने सूर्यसिद्धांत करणग्रंथाचा सखोल अभ्यास केला. तसेच आकाशातील ग्रहगोलांचे प्रत्यक्ष वेध घेतले. त्याने सूर्यसिद्धांत करणग्रंथावर संस्कार करून म्हणजेच त्या गणितात काही बदल करून सन १५२० मध्ये दृकप्रत्ययतुल्य गणित देणारा ‘ ग्रहलाघव ‘ हा करणग्रंथ लिहिला. ग्रहलाघव प्रमाणे तयार होणारे पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यांचे नाते जुळून आले. त्रिकोणमिती ऐवजी ११ वर्षीय चक्रावरून गणित करण्याची अभिनव युक्ती त्याने शोधून काढली. गणेश दैवज्ञांनी एकूण १४ ग्रंथ लिहिले आहेत. ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले गणित आकाशाशी जुळू लागल्याने भारतातील अनेक पंचांगकर्त्यांनी आपापली पंचांगे तयार करण्यासाठी ‘ ग्रहलाघव ‘ ग्रंथ वापरायला सुरुवात केली.ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेल्या पंचांगाला लोक ‘ ग्रहलाघवीय पंचांग ‘ म्हणून संबोधू लागले. लोकांची या ग्रंथावर श्रद्धा बसली.
लोकमान्य टिळकांचे कार्य !
सुमारे ४०० वर्षानी ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले पंचांग व प्रत्यक्ष आकाश यात यात फरक पडू लागला. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली होती. पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यामध्ये फरक पडता कामा नये असे त्यांना वाटत होते. खगोलगणित हे नेहमी अद्ययावत करावे लागते. गतीमध्ये होणार्या बदलांमुळे ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले गणित चुकते हे लोकमान्य टिळकांना समजले होते. परंतू बरीच मंडळी ग्रहलाघव सारखे जुने परंपरागत ग्रंथ सोडायला तयार नव्हती. भारतात वेधशाळा हवी. त्यावरून ग्रहगोलांचे अचूक वेध घेऊन नव्याने दृक् गणित देणारे करणग्रंथ तयार करायला हवेत असे लोकमान्यांना वाटत होते. तसे त्यांनी अनेकांजवळ बोलूनही दाखविले होते.
शेवटी लोकमान्यांनी पंचांगकर्त्यांना व लोकांना पटवून देण्यासाठी पंचांग संमेलने घेतली. पहिले अधिवेशन सन १९०४ मध्ये मुंबईत झाले.या संमेलनाचे अध्यक्ष श्रीशंकराचार्य होते. परंतू दृक् गणित स्वीकारायला लोकांची तयारी नव्हती. ग्रहलाघवीय पंचांगेच हवीत असे लोकांचे मत झाले. पंचांगात दृक् गणित आणि अयनांशात एकवाक्यता यावी यासाठी १९१७ साली पुणे येथे दुसरे ज्योतिष अधिवेशन झाले. त्यावेळी अयनांशाबाबत एकमत होऊ शकले नाही.विशेष समाधानाची गोष्ट म्हणजे सन १९२० मध्ये सांगली येथील अधिवेशनात लोकमान्यांच्या प्रयत्नांना यश आले. पंचांगे ही दृक् गणितावरच आधारित हवीत असा ठराव मंजूर करण्यात आला.
मात्र त्यासाठी दृक् गणिताचा भारतीय करणग्रंथ निर्माण होण्याची गरज होती. वेंकटेश बापूजी केतकरांसारखे गणिती त्यासाठी तयार होते. सन १९२० मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली. ‘ जो कोणी दृक् गणिताचा करणग्रंथ लिहून देईल त्यास एक हजार रुपये बक्षीस मिळेल ‘ असे त्या जाहिरातीत छापले होते. लोकमान्यांनी प्रथम ज्योतिर्गणिती वेंकटेश बापूजी केतकर यांना विचारले. परंतू ते चित्रापक्षाचे आग्रही होते. शेवटी नागपूरचे डाॅ. केशव लक्ष्मण दफ्तरी यांनी दृक् गणित देणारा ‘ करणकल्पलता ‘ हा करणग्रंथ लिहिला. हा ग्रंथ दोन भागात असून तो मराठी व संस्कृतमध्ये आहे. या ग्रंथावरून केलेल्या गणिताप्रमाणेच आकाश दिसते. लोकमान्यांचे पंचांगातील दृक् गणिताचे स्वप्न साकार झाले. हा ग्रंथ सन १९२४ मध्ये प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने १ आॅगस्ट १९२० रोजी लोकमान्यांचे दु:खद निधन झाले. स्थूल गणिताचा ग्रहलाघव हा ग्रंथ सोडून अनेक पंचांगकर्ते करणकल्पलता करणग्रंथावरून आपापली पंचांगे तयार करू लागले. महाराष्ट्रातील सर्व पंचांगकर्त्यांनी शके १८७२ ( सन १९५०-५१ ) पासून दृक् गणित स्वीकारले. याचे सर्व श्रेय लोकमान्य टिळकांच्या अथक मेहनतीस जाते.
आकाश दर्शनासाठी !
आता आपण पंचांग-दिनदर्शिकांचा आकाशदर्शनासाठी कसा उपयोग करायचा ते पाहूया. चंद्रमहिन्यांच्या नावावरून रात्रीच्या प्रारंभी कोणते नक्षत्र पूर्व आकाशात दिसेल ते समजते. चैत्र महिन्यात चित्रा वगैरे ! तिथीवरून चंद्राची स्थिती कळते. शुक्ल अष्टमीला सूर्यास्ताच्यावेळी चंद्र मध्य आकाशापाशी असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सूर्यास्ताच्यावेळी उगवतो. कृष्ण अष्टमीला चंद्र सूर्यास्तानंतर साधारण सहा तासांनी उगवतो. चंद्रप्रकाशाचा आकाशदर्शनात अडथळा होऊ नये म्हणून तिथी म्हणजेच चंद्राची स्थिती माहीत असणे आवश्यक आहे.
दररोज चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे ते पंचांग-दिनदर्शिकेत दिलेले असते. त्यावरून नक्षत्रज्ञान आपणास होऊ शकते. चंद्रग्रहणे व सूर्यग्रहणे याविषयी माहिती पंचांगात दिलेली असते. त्याप्रमाणे ग्रहणांचे खगोलप्रेमीना निरीक्षण करता येते. ग्रह सूर्याच्या जवळ आला की सूर्यप्रकाशामुळे आपणास दिसत नाही. ग्रहांच्या लोप-दर्शनांचे दिवस पंचांग दिनदर्शिकेत दिलेले असतात. पंचांगात दिलेल्या लग्न कोष्टकात वर्षभरात कोणत्याही वेळी पूर्व क्षितिजावर कोणती राशी उगवत असते ते दिलेले असते. तसेच प्रत्येक ग्रह कोणत्या राशीत आहे ही माहिती दिलेली असते. त्यावरून कोणता ग्रह कुठे दिसेल तेही समजू शकते. पंचांग -दिनदर्शिकेत ग्रह , तारका आणि चंद्र यांच्या युतींचे दिवस दिलेले असतात. या युत्या त्या त्या दिवशी निरीक्षण करणे खगोलअभ्यासकांना त्यामुळे शक्य होते.
काही पंचांगात उल्कावर्षावांच्या तारखाही दिलेल्या असतात. तसेच कोणत्या महिन्यात आकाशात काय दिसेल याचीही माहिती दिलेली असते तीही खगोलप्रेमींना उपयुक्त असते.
पंचांग-दिनदर्शिका म्हणजे आकाशाचे वेळापत्रक ! हे वर्षभराचे आकाशाचे वेळापत्रक तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात पंचांग- दिनदर्शिकेच्या स्वरूपात असतेच परंतू त्याचा उपयोग कसा करायचा हे आपणास माहीत नसते. ती माहिती जर आपण करून घेतली तर दूरवर असणारे आकाश नक्कीच आपल्याजवळ येईल.