Sunday, August 25, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-१

श्रीकृष्ण हा खूप मोठा स्ट्रॅटेजिस्ट होता. 
कंस हा अति बलाढ्य मगध साम्राज्याचा राजा जरासंध याचा जावई. जरासंध याच्या दोन्ही मुलींची (आसित आणि प्रापित) लग्ने कंसाबरोबर झाली होती. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मगध हीच भारतभूमीची मध्यवर्ती सत्ता राहिली आहे. हिरण्यकश्यपू-प्रल्हाद-बळीराजा हे मगधेचेच सम्राट होते. जरासंध याने ८६ राजांना आपल्या कैदेत ठेऊन त्यांचे राज्य बळकाविले होते. उग्रसेन हे मथुरेचे राजे होते. ते धर्मात्मा म्हणूनच ओळखले जात जरासंध त्याच्या मुलींचे लग्न कंसाशी करण्याच्या निमित्ताने सैन्यासह मथुरेसी आला आणि त्याने उग्रसेनाना कैदेत टाकून मथुरेचे राज्य त्यांचा मुलगा आणि आपला जावई कंसाच्या हातात दिले. कंसाने त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना कैदेत टाकले. त्यांची मुले तो मारून टाकी. अशा परिस्थितीत वसुदेवाने तुरुंगाच्या रक्षकांशी संधान बांधून पूर आलेली नदी ओलांडून कृष्णाला सुरक्षित स्थळी पोचविले. पण कंसाला हे कळताच त्याने कृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशा वातावरणात परक्या घरी वाढलेल्या या मुलाला किती तणावपूर्वक परिस्थितीतून जावे लागले असेल? नंद आणि यशोदेच्या ठाम पाठिंब्यामुळेच हा मुलगा असा असामान्य निपजला. अगदी लहान वयातच योग्य नियोजन करून कंसासाख्या पाताळयंत्री माणसाला बेसावध ठेऊन मारणे हे सोपी गोष्ट नव्हे. तेव्हापासूनच त्याने आपले नियोजनकौशल्य दाखविण्यास सुरुवात केली. यावेळी बंदिवासात ८६ राजांना कृष्णाने मुक्त केले. त्यामुळे या राजांचा पाठिंबा पुढील काळात कृष्णाला मिळाला. कंसाला मारल्यामुळे जरासंघ रागावला. जरासंघ भारतातील बलाढ्य साम्राज्याचा सम्राट होता. त्याचा सेनापती तशाच बलाढ्य सिंधू साम्राज्याचा राजा होता. सातत्याने यादव साम्राज्यावर हल्ले करून त्याचे लचके तोडण्यास जरासंघाने सुरुवात केली. बलाढ्य यवन साम्राज्याचा (वायव्य भारत) सम्राट कालयवन याला जरासंघाने मदतीला बोलाविले. आता एका बाजूने मगध सेना आणि दुसऱ्या बाजूला यवन सेना अशा कचाट्यात कृष्ण सापडला. एकाच वेळी या दोन्ही बलाढ्य शत्रूंशी सामना करणे छोट्या यादव राज्याला शक्यच नव्हते. अशावेळी कृष्णाचे नियोजन कौशल्य परत एकदा कामी आले. कृष्णाने यादव समाजाला धोक्यात टाकण्याऐवजी यादव राज्य दूर हलविण्याचे ठरवून केवळ आपल्या सैन्यासह या संकटाचा सामना करण्याचे ठरविले. हे राज्य हलवितानाही कृष्णाची दूरदृष्टी दिसली. आपले पेशाने गवळी असलेल्या यादवांचे राज्य दूधदुभत्याच्या गवताळ प्रदेशात न हलविता समुद्रकाठच्या उत्तम बंदर असलेल्या द्वारकेत हलविले. द्वारका ही खूप जुनी भरभराटीस आलेली नगरी होती (तिचे अवशेष सापडले आहेत). द्वारकेस गेल्यावर यादवांनी दुधाचा व्यवसाय केला नाही, तर समुद्रमार्गे पश्चिमी देशांशी व्यापार केला (याचे पुरावे सीरिया आदी देशांत सापडले आहेत. महाभारतात उल्लेख असलेल्या श्रीकृष्णाने वितरित केलेल्या तीन प्राण्याच्या मुद्रा तेथे सापडल्या आहेत). त्यामुळे द्वारका भरभराटीस आली (पूर्वीच्या भाषेत सोन्याची झाली).
यादवांना द्वारकेत पाठविल्यावर कृष्णाने कालयवनाशी सामना केला. इंद्राने वर दिलेला मुचकुंद राजा मथुरेजवळच्या टेकड्यांत झोपला असून त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल अशी अफवा कृष्णाने उठविली. कालयवानाच्या मोठ्या सेनेला आपण घाबरलो आहोत असे दाखवून कृष्णाने त्याला एकट्यालाच लढण्याचे आव्हान दिले. बलाढ्य कालयवानाने ते लगेच स्वीकारले. मग घाबरल्याचे दाखवीत कृष्ण या टेकड्यांच्या बाजूला पळाला. कालयवन त्याच्या मागे टेकड्यात शिरला. आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात कालयवन ठार झाला. मुचकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भासम झाला असे कृष्णाने उठविले. आपला राजा प्रत्यक्ष इंद्राच्या कोपाने भस्म झाल्याचे पाहून प्रचंड यवनसेना घाबरली आणि पळत सुटली.
पुढे महाभारत युद्धापूर्वी कृष्णाच्या नियोजनामुळे अनेक राजे पांडवांच्या बाजूने आले. तरीही कौरव सेना भारी होती. पण कृष्णाच्या मानसशास्त्रीय युद्ध खेळण्याच्या कौशल्याने ही सेने गलितगात्र झाली आणि शेवटी पांडवांचा विजय झाला.

Friday, July 26, 2019

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’ : राजीव साने

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’


[सूचना: १.     मनुष्याबाबत सांस्कृतिक-अंग महत्त्वाचे असल्याने ही मांडणी प्राकृतिकतेची पूर्वपीठीका एवढ्या मर्यादित अर्थानेच घ्यावी.  २. या मांडणीतील ज्ञानाचे श्रेय रिचर्ड डॉकिन्स आणि मॅट रिडली यांचे आहे.  ३. जीवशास्त्रीय क्षेत्रात संतुलने कसकशी बनत जातात याचा हा वैज्ञानिक खुलासा असून त्यात कोणत्याच प्रकारे मूल्यात्मक निवाडा किंवा पुरस्कार/धिक्कार अभिप्रेत नाही. हा लेख आजचा सुधारक आणि  मनोविकास प्रकाशनच्या डार्विनवरील पुस्तकात पूर्वप्रकाशित आहे.]


स्वतःच्या प्रती काढल्या जाण्याची परंपरा अव्याहत राखणे हा जनुकांचा स्वभाव आहे. जनुके ज्या जीवाच्या केंद्रस्थानी वास्तव्य करीत असतात त्या जीवाची वर्तने ती प्रवर्तित करीत असतात. ही वर्तने अशी असतात की जेणेकरून त्या जीवातील जनुके पुढे चालू रहातील. जीवाची धडपड जणू काही जनुकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या कार्याची पूर्ती करण्यासाठी चालते. जीव ज्या तुंबळ जीवनसंघर्षात सापडलेला असतो (भक्ष्य-भक्षक, यजमान-परोपजीवी, समाईक भक्ष्यासाठी स्पर्धा, समाईक भक्षकापासून वाचण्याची स्पर्धा,  नर-नर, मादी-मादी, नर-मादी, पालक-पाल्य, भावंडे-भावंडे, इत्यादींतील संघर्ष) त्यातील आव्हाने पेलत तो आपले जनुकीय कार्य पार पाडण्यात यशस्वी ठरतो की नाही, यावर त्यातील जनुके पुढे चालू रहातात की नाही हे ठरत असते. यशस्वी ठरणारी वर्तने जेव्हा पुढील पिढ्यांना यशोदायक-वर्तन-प्रवर्तक-जनुके प्राप्त करून देतात, तेव्हाच ही वर्तने स्थिरावतात. साहजिकच एकूण वर्तनांपैकी प्रजननविषयक वर्तनांना कळीचे स्थान प्राप्त झालेले असते.

यात जनुकांनी सोपवलेली कार्ये कोणती? किंवा जनुक-प्रवर्तित स्वार्थ कोणते?
१)    स्वतः टिकणे, भक्ष्य मिळवणे, भक्ष्यस्थानी न पडणे व आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींवर मात करणे.(किमान काही प्रजननसंधी मिळेपर्यंत तरी)
२)    स्वतःसाठी संख्येने जास्त किंवा जास्त लाभदायक, अशा प्रजननसंधी मिळविणे.
३)    स्व-अपत्यांची संख्या तरी जास्त ठेवणे किंवा संख्येने कमी पण जास्त टिकाऊ अशी स्व-अपत्ये निर्माण करणे.
४)    स्व-अपत्यांना ज्याच्याकडून जास्त जोमदार जनुके मिळतील अशाच जोडीदाराला (अन्यलिंगीयाला) प्रजननसंधी देणे.
५)    स्व-अपत्य संगोपनासाठी (पोषण, रक्षण इ.)लागणाऱ्या श्रमांत जोडीदाराकडून जास्तीत जास्त वाटा प्राप्त करणे.
६)    ज्यांना स्व-जातीय अन्यलिंगीयांकडून पसंती/प्रजननसंधी मिळेल अशी स्व-अपत्ये निर्माण करणे.
वरील स्वार्थांमधले प्राधान्यक्रम हे प्रस्तुत जीव नर आहे की मादी यानुसार कसकसे भिन्न होतात ते आता पाहू.(द्विलिंगीय व एक-व्यक्ती-एक-लिंगीय, हाच प्रजनन-प्रकार आपण लक्षात घेऊ. इतर प्रकारची प्रजनने विषयमर्यादेस्तव सोडून देत आहोत.)

अंडी विरुध्द शुक्राणू

नर-मादी यातेल मूलभूत भेद शरीररचनेवरून किंवा कोणाच्या शरीरात गर्भधारणा होते यावरून करता येणार नाही. उदाहरणार्थ सी-हॉर्स या जलचरात मादी आपली अंडी नर-शरीरात घालते व तेथेच त्यांचे फलन होते! म्हणूनच तो तो जीव कोणत्या प्रकारच्या जननपेशी(गॅमेट्स) निर्माण करतो यावरूनच त्याचे लिंग ठरविणे शास्त्रशुध्द ठरते. नर-जननपेशी म्हणजे शुक्राणू व मादी-जननपेशी म्हणजे अंडी. या दोहोंत टोकाची विरोधी स्वरूपे उत्क्रांत झालेली आहेत. (अभिन्न-जननपेशी म्हणजेच आयसोगॅमेट्सची उत्क्रांती, परस्परविरोधी स्वरूपाच्या जननपेशीत कशी झाली, हा विषय विस्तारभयास्तव सोडून देत आहोत.) अंडी आणि शुक्राणू यांच्या स्वरूपांमधील विरोध पुढील कोष्टकात व्यक्त केलेले आहेत.

अंडी
शुक्राणू
१) मोठा आकार(पक्ष्यांत फारच मोठा)
१) अति-लहान आकार
२) बीज-भांडवल-अन्नसाठा + अर्धे   (मादीनिर्मित) केंद्रक
२) शून्य अन्नसाठा + फक्त अर्धे  नरनिर्मित केंद्रक
३) जड व अचल
३) हलके व शीघ्रचल
४) संख्या कमी (मर्यादित)
४) संख्या प्रचंड (प्रायः अमर्याद)
५)उत्पादनाचा वेग कमी व त्यामुळे (अल्प आयुर्मर्यादेत) स्वतःच्या क्षमतेपोटी प्रजननसंधी कमी
५) उत्पादनाचा वेग प्रचंड व त्यामुळे प्रजननसंधीबाबत स्वतःच्या क्षमतेपोटी मर्यादाच नाही
६) शुक्राणूला प्रवेश देण्या न देण्या चे  काम अंड्यांकडे
६) अंड्यांपर्यंत पोहोचण्याचे काम         शुक्राणूंकडे
७) मादीची दर अंड्यामागील अन्न-गुंतवणूक फारच जास्त. त्यामुळे अपव्यय झाल्यास मादीचा मोठाच तोटा
७) नराची दर शुक्राणूमागील अन्न-गुंतवणूक अगदीच नगण्य,त्यामुळे अपव्यय झाल्यास नराचा काहीच तोटा नाही

त्या त्या प्रजातीत, नर-मादी यांचे संख्याप्रमाण जरी तुल्य असले, तरी अंडी हाच दुर्मीळ व महागडा स्रोत असतो. अंडी अफलित रहाणे किंवा फलित पण अल्पजीवी ठरणे, यात प्रजनन प्रकल्पाचे मोठे नुकसान असते. याउलट शुक्राणू अफलित रहाणे वा फलित पण अल्पजीवी ठरणे यात प्रजातीचे काहीच नुकसान नसते. ही असममिती (आसिमेट्री) मादी-पक्ष्यांबाबत फारच जास्त असते. कारण त्यांची अंडी ही त्यांच्या शरीराचा बऱ्यापैकी अंश व्यापण्याइतकी मोठी असतात; शुक्राणूंच्या तुलनेत तर फारच मोठी. सस्तनप्राण्यांतही मूळ असममिती जरी पक्ष्यापेक्षा कमी असली तरी असममितीची दिशा तीच असते.

प्रत्येक व्यक्ती-जीवाला आपली एकूण धडपड/यत्नशक्ती कोणत्या कार्यात किती घालायची हे ठरवावे लागते, किंबहुना त्याच्याकडून ठरले जाते! जनुककेंद्री उत्क्रांतिशास्त्रात वर्तनांचे वर्णन करताना वापरलेले अकर्तृक प्रयोग(पॅसिव्ह व्हॉइसेस) हे वाच्यार्थाने घ्यावेत तर कर्तृक प्रयोग (म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसेस) हे लक्षणार्थाने घ्यावेत असा नियम आहे. कारण-भाषित विवरण करणे हे फारच विस्तृत आणि जटिल बनते. संक्षेप व सोपेपणासाठी प्रयोजन-भाषा वापरण्याचा (---साठी अशी निवड करणे) प्रघात आहे. असो.

प्रजननसंधी प्राप्त करण्यासाठी किती धडपडायचे व प्रजासंगोपानार्थ किती, यात मादीचा कल स्वाभाविकपणे संगोपनाकडे जास्त तर नराचा कल प्रजननसंधी मिळवण्याकडे जास्त असतो. हे या मूळ असममितीमुळे घडते. एखादी वीण वाया जाणे हे मादीला (तिची जनुके पुढे चालविण्याच्या मूलभूत स्वार्थानुसार) फारच महाग पडणार असते. एका दिशेला कल असला की तो कल पिढी दर पिढी वाढत जाण्याची स्ववर्धक प्रक्रिया घडत असते. संगोपननिष्ठ माद्या त्यांची जनुके पुढे चालू ठेवण्यात जास्त यशस्वी ठरल्या की तशी जनुके वाढून पुढील पिढीतील माद्या जास्तच संगोपननिष्ठ बनतात. तसेच जास्त संधींसाठी धडपडणारे नर हे नर म्हणून यशस्वी ठरले की की त्यांची तशीजनुके निवडली जाऊन नर अधिकाधिक तसे बनतात. अर्थात यावर नर-नर संघर्षाने व मादी-मादी संघर्षाने आणि विशेषतः नर-मादी संघर्षाने कशी वेसण बसते हे आपण पाहूच. पान जननपेशींच्या स्वरूपामुळेच नर हा सक्रीय-याचक तर मादी ही अक्रिय-अनुमती-दात्री असे बनतात हे निश्चित.

जोडीदार: अडकणारा आणि सटकणारा   
जर का नर हा संगोपनात मदत करेल याची खात्री असेल, तर माद्यांनासुध्दा (नराप्रमाणे) जास्त संधी शोधायला नको असते असे नाही. पण त्यांना तशी खात्री मिळत नसते. मासे हा याला अपवाद आहे. कारण मादी मासे पाण्याच्या तळातच अफलित अंड्यांचे संच (क्लच) घालतात. फलन त्यांच्या शरीराबाहेर होणार असते. नर मासा जर लहरीनुसार शुक्राणू सोडत सुटला तर त्याचा जनुकीय तोटा होतो. शुक्राणू हे द्रवात गतिमान असतात. एरवी मादीशरीरातील द्रवात त्यांना नेमकी दिशा मिळाली असती. पण पाण्यात मात्र ते वेगाने सर्व दिशांना विखरून जात असल्याने ते क्लचपर्यंत पोहोचतील याची अजिबात शाश्वती नसते. याकरिता नर मासा हा अगोदर घातलेल्या क्लचवरजवळात जवळ जाऊन शुक्राणू सोडण्यास बाध्य असतो. तेवढ्या वेळात मादी गायब झालेली असते! प्रजेला नशिबावर सोडणे ही गोष्ट, ज्या जोडीदाराला ही प्रजा निश्चितपणे आपलीच आहे याची खात्री असेल त्याला, नक्कीच क्लेशकारक असते. 

नर मासा, त्याने शुक्राणू सोडलेला क्लच ही त्याची प्रजा असणार आहे, हे माहीत असल्याने त्याला संगोपनार्थ तेथे थांबावेच लागते. याला म्हणायचे अडकणारा जोडीदार. आपल्या अन्य जोडीदार हा अडकणारा आहे याची खात्री पटलेला जोडीदार हा सटकणारा बनतो. म्हणजेच अन्य-लिंगीय जोडीदार संगोपन करणारच आहे याची खात्री, हीच स्वतः अन्यत्र संधी शोधण्याची मुभा ठरते. पाण्यामध्ये ही मुभा (म्हणजे क्लचेस घालत हिंडण्याची) मादीला मिळते! पण अन्यत्र तसे नसते.

मादी-पक्ष्यांची दर एकक अंड्यामागे पालकीय गुंतवणूक अंड्याच्या मोठ्या आकारामुळे खूपच जास्त असते. तसेच फलन हे मादी-शरीरात होत असते. अंडी उबवणे व पिलांना चारा आणोन घालणे यात वेळ आणि श्रम यांची प्रचंड गुंतवणूक लागते. पक्षाबाबत दोन्ही जोडीदारांनी श्रमात अगदी बरोबरीने वाटा उचलला तरी एकेकाच्या वाट्याला येणारे श्रम प्रचंड असतात. मादीच्या आयुष्यात थोड्याशाच विणी शक्य असल्याने माद्यांतील संगोपननिष्ठेकडे असणारा कल पक्षी-मादीत अधिकच तीव्र झालेला असतो. नर-पक्षी हा मूलतः नर असल्याने त्याचा कल संगोपन-श्रमातून पलायनाकडे आणि इतर माद्यांच्या अनुराधनाकडे असतोच! म्हणूनच अडकणारा जोडीदार बनण्याचा धोका माद्या-पक्ष्यांना असतो व हा धोका त्यांना पक्षी असण्यामुळे अजिबातच परवडण्यासारखा नसतो. यासाठीच नर-पक्ष्याची मूलतः असणारीनर(म्हणजे उनाड) प्रवृत्ती वठणीवर आणून त्यांना जास्तीतजास्त कामात जुंपणे आवश्यक असते. यासाठी पक्षी-माद्यांना कडक धोरण अवलंबिणे भाग असते. (धोरण = जनुकीयरित्या यशस्वी ठरून स्थिरावणारे वर्तन). नरांकडून श्रम करवून घेण्याच्या धोरणाला आपणसदगृहस्थ निवड धोरण असे नाव देऊ.

सदगृहस्थ निवड धोरण
जननपेशींमधील वैधर्म्यामुळेच नर हा सक्रिय-याचक तर मादी ही अक्रिय-अनुमती-दात्री असते. पक्ष्यांत (व बऱ्याच सस्तन प्राण्यांतसुध्दा) कोणत्या नराला प्रजननसंधी द्यायची, याची निवड करण्यावरील नियंत्रण हे माद्यांकडेच असते. (सस्तन प्राण्यांमधील काही प्रजातीतील माद्या हा अधिकार कसा गमावतात, हे आपण नंतर पाहणार आहोत.)
सदगृहस्थ म्हणजे निष्ठाळू आणि कष्टाळू असा नर! माद्या या शास्त्रज्ञाप्रमाणे प्रयोगशाळेत जनुकीय-रचना तपासू शकणार नसतात. त्यांना बाह्यवर्तनावरूनच परीक्षा करावी लागते. यासाठी माद्या कोणत्या क्लृप्त्या (अबोधपणे व किंचित सबोधपणे) वापरतात?

१.     प्रियाराधन कालावधी शक्य तितका लांबवणे: यात नराच्या धीर धरण्याची परीक्षा होते. जो नर लवकरच कंटाळून अनुराधनाचा मोहरा दुसरीकडे वळवतो तो नापास होतो. प्रियाराधनकाळ प्रदीर्घ असण्यात नरांचाही एक जनुकीय स्वार्थ साधला जात असतो. कारण मी परापत्य पोषणात तर अडकत नाहीये ना? ही नरांची एक स्वाभाविक (म्हणजे स्वतःचीच जनुके पुढे चालवण्याच्या स्वार्थाच्या संदर्भात) चिंता असते. माकडे, सिंह इत्यादीतील नर हे इतर नरांची अपत्ये मारून टाकतात. उंदरांमध्ये स्वतःचे एक व्यक्तीविशिष्ट रसायन सोडण्याची क्षमता असते. याचा गंध मादीने घेतला व व तिच्यात जर इतर उंदीर-नराचे गर्भ असले, तर गर्भपात होतो! या चिंतेमुळे पक्षी-नरदेखील प्रदीर्घ प्रियाराधनाला सहकार्य देत रहातात. अर्थात मादीच्या अनुमतीविना त्यांचा नाईलाजही असतोच.

२.     आन्हिकवजा गोष्टी करवून घेणे: पसंतीस उतरण्यासाठी नराला अशा काही गोष्टी करून घ्याव्या लागतात की ज्यांचा थेटपणे जीवशास्त्रीय उपयोग काहीच नसतो. उदाहरणार्थ दुर्मिळ अशी पिसे किंवा तुरे शोधून आणून त्यांनी घरटे सजवणे! या गोष्टी केवळ अवघड असल्यामुळे त्यांचा पण म्हणून उपयोग असतो.

३.     नराकडून घरटे बांधून घेणे: यात नुसती परीक्षा नसून श्रमांची गुंतवणूक अगोदरच पदरात पडून घेणेही असते.

४.     प्रियाराधनकाळात मादी पिलांची नक्कल करत चाऱ्यासाठी नाराकडे याचना करते व स्वतःला चारून घेते. मोठे अंडे बनविण्यासाठीचा (व अंड्यातलाही) अन्नसाठा हा नराची गुंतवणूक म्हणून वसूल केला जातो. यात टोकाचे उदाहरण म्हणजे कोळी व विंचू यांच्या काही प्रजातीत खुद्द नरच मादीच्या भक्ष्यस्थानी पडतो. म्हणजे त्याची जनुके पुढे चालू ठेवण्याचे श्रेय त्याला मरणोत्तरमिळते!

५.     फसवे सदगृहस्थही असू शकतात. हे म्हणजे प्रियाराधन काळात निष्ठाळू/कष्टाळू पण पण प्रत्यक्ष संधी मिलातच उनाडपणा सुरू करणारे नर. हा धोका टाळण्यासाठी माद्या, आधीच्या विणीत ज्याने मीलनोत्तर संगोपन-श्रमही निष्ठेने केले होते त्याच (टेस्टेड) नराला पुन्हा पसंत करतात. यामुळे फसव्या सदगृहस्थांना पहल्या विणीच्याच काही संधी मिळतात. पण पुढील विणींमध्ये खऱ्या सदगृहस्थांनाच वाव मिळतो. यातूनच मुळात एका विणीपुरते असणारे पेअर-बाँडिंग हे मोनोगामीकडे सरकते.

आखडूपणा/बेफिकीरी यांतील परवडणारे संतुलन

दोन्ही पालकांनी १००% श्रम घेतल्याखेरीज पिले जगणारच नाहीत ही अगदी टोकाची अट झाली. जी प्रजाती परिपूर्ण आदर्श असल्याखेरीज टिकणारच नसेल, ती वास्तवात टिकेल कशी? संगोपनात नराच्या श्रमाची आवश्यकता ही गोष्ट असते तरी वा नसते तरी अशी दोन टोकाची नसून तिच्या विविध मात्रा(डिग्रीज) वास्तवात असतात. सदगृहस्थ निवडीसाठी माद्यांनी पत्करलेला आखडूपणा(कॉयनेस)देखील परिपूर्णनसतो. मादीसाठी संगोपन जरी जास्त महत्त्वाचे असले तरी तिला स्वतःला प्रजननसंधी मिळण्याची गरजही असतीच. मादी निवडकर्ती आणि नर उमेदवार असे जरी असले तरी सगळेच उमेदवार बाद ठरवून पोस्ट रिकामी ठेवणेही शक्य नसते! आखडूपणाबाबत अतीच ताणणे कुठले आणि ढिलाई कुठली याचे नेमके मोजमाप माद्यांना माहीत असण्याचा प्रश्नच नसतो. त्यांच्यातील आखडूपणा यदृच्छया कमी किंवा अधिक असतो इतकेच. 

आखडूपणा अजिबात नसणारी मादी म्हणजे बेफिकीर मादी असे आपण म्हणू. माद्यांमध्येही स्पर्धा असतेच! या स्पर्धेत बेफिकीर मादीला इतर माद्यांपेक्षा फायदा किंवा झुकते माप मिळणार असते. कारण सदगृहस्थ म्हणून उत्क्रांत झालेला नर जरी जास्त प्रतीक्षा करूशकणारा असला तरी जर तीच गोष्ट त्याला लवकर मिळत असेल तर नको असते असे नाही. कारण नर हा मूलतः नरच असतो! माद्यांतील बेफिकीरीला झुकते माप मिळत गेले की त्यातून बेफिकिरीची जनुके प्रसारित होतील. त्यायोगे नरांतही उनाडपणाची जनुके प्रसारित झाल्यावाचून रहाणार नाहीत. एखादा कल हा तदनुषंगिक जनुकान्द्वारे अधिकच वाढवत नेणाऱ्या स्ववर्धिष्णू (क्युम्यूलेटिव्ह) प्रक्रिया अमर्यादपणे चालत नाहीत कारण त्या हमखास उलटा फटका खाणाऱ्या असतात. आत्ताच्या संदर्भात जर बेफिकीरीमुळे ओढवलेलाएकटीने संगोपन हा भार पेलला नाही की ती मादी, (पिले मरून) जनुके पुढे पोहोचवण्यात अयशस्वीच ठरते आणि बेफिकीरी-प्रवर्तक जनुके घटू लागतात. म्हणजेच स्ववर्धक प्रक्रिया उलटते. स्वैरता वाढवणारी प्रक्रिया स्ववर्धक असते तशी उलट ताळ्यावर आणणारी प्रक्रियादेखील स्ववर्धकच असते! एकतर ताळ्यावर आणणारी प्रक्रिया सुरू व्हावी लागेल किंवा ती प्रजाती नष्ट तरी होईल. टिकून राहणाऱ्या प्रजाती या ताळ्यावर येऊनच (किंवा ताळ्यावर राहूनच) टिकलेल्या असतात. 

पण ताळ्यावर म्हणजे नेमके काय? प्रजातीचे निष्ठा/स्वैरता गुणोत्तर हे संगोपनात नराच्या श्रमांची आवश्यकता किती असेल यानुसार स्थिरावेल. यालाच वर्तन-वैविध्याचे परवडणारे संतुलन(इव्होल्युशनरीली स्टेबल स्ट्रॅटेजी) म्हणतात.

निसर्गातला हा द्वंद्वात्मक तोल फक्त प्रजननसंधी या एकाच आघाडीला लागू असतो असे नसून तो सर्वच आघाड्यांवर लागू असतो. उदाहरणार्थ नर-नर संघर्षात जर सगळेच नर जिंकू किंवा मरू या प्रवृत्तीचे असतील तर ती प्रजाती नष्ट पावेल. कारण वाचलेले सर्वच नको इतके जखमी झालेले असतील. सगळेच भुंकू किंवा पळू प्रवृतीचे असतील तर काहीकाळ शांतता नांदेलही. मात्र त्यात एखादा जरी जिंकू किंवा मरूवाला शिरला की त्याला झुकते माप मिळत जाऊन तत्प्रवर्तक जनुके वाढू लागतील आणि या दोन प्रवृत्तीतला समतोल साधला जाईल. म्हणजेच जसे निष्ठा/स्वैरता याचे समुचित प्रमाण स्थिरावते तसेच लढाऊ बाण्यांचेही समुचित प्रमाण स्थिरावते. येथे समुचितचा अर्थचांगला असा नाही. जेथून कुठल्याही दिशेने ढळल्यास तोटा वाढतो त्या बिंदूत प्रजाती अडकतात. काहीच तोटा नसतो असा हा बिंदू नसून तो तोटा सोसत रहावे लागते पण टिकता येते असा हा बिंदू असतो. टिकून असणे म्हणजे अगदी सुखात असणे असे अजिबात नाही.

नरोत्तम निवड धोरण(आकर्षणाधिष्ठित)
मत्स्यांत प्रायः मादीराज्य व पक्ष्यांत प्रायः समताराज्य असले तरी सस्तन प्राण्यांत त्यामानाने नरांचे फावते. अन्नाचा जितका सुकाळ मादी जितकी स्वावलंबी तितके नर चुकार! संगोपनात नराचे श्रम न लागण्यामुळे काही (विशेषतः सस्तन प्राण्यांपैकी) प्रजातीतील नरांनी सदगृहस्थ निवड धोरण पार उधळून लावले आहे. सदगृहस्थपणाच्या मात्रा कमीअधिक आहेत. माद्यांचा पहिला प्राधान्यक्रम जरी सदगृहस्थ हा असला तरी जर सदगृहस्थ उपलब्धच नसले किंवा सदगृहस्थपणाची मात्रा कमी असली, तर माद्यांचा दुसरा प्राधान्यक्रम डोके वर काढतो. मूळ जनुकीय-स्वार्थ यादीतला स्वार्थ क्र.४ म्हणजे ज्या नराकडून स्व-अपत्यांसाठी जोमदार जनुके मिळतील अशाच नराला संधी देणे हा असतो. या स्वार्थानुसार माद्या जे धोरण अवलंबितात त्याला आपण नरोत्तम-निवड-धोरण असे नाव देऊ.

येथेही धोरणचा अर्थ स्थिरावणारे वर्तन असाच आहे. म्हणजे असे की मादीला तिच्या आवडीनुसार आपाततः आकर्षक वाटणारा नर जर जोमदार जनुके देणारा निघाला, तर जनुक प्रसारामुळे तत्सम वैशिष्ट्ये आकर्षक वाटणाऱ्या माद्या वाढत जातात, तत्सम वैशिष्ट्ये असणारे नर वाढत जातात आणि/किंवा नरांतील ती वैशिष्ट्ये वृद्धींगत होत जातात. मॅट रिडली यांनी या प्रकरणाला मोराच्या पिसाऱ्याची कहाणीअसे शीर्षक दिलेले आहे. नरांचे सुशोभीकरण(ऑर्नमेंटलायझेशन) हा नरोत्तम-निवड-धोरणाचाच परिपाक असतो.

नरांचा विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम मधोमध चालू आहे आणि भोवती कोंडाळे करून माद्या तो पहात आहेत, असाही प्रकार( याला लेकम्हणतात) काही प्रजातींत आढळतो.  यातून एखादाच किंवा दोन/तीन नरच निवडले जातात. एखाद्या मादीने(किंवा काही थोड्याच माद्यांनी) पुढाकार घेऊन नरोत्तम निवडला की इतर माद्या तिचे अनुकरण करून त्यालाच निवडतात. पुढाकार घेणाऱ्या मादीला आकर्षक वाटलेले लक्षण जोमदार जनुके देणारे नसेलही. 

गूज पक्ष्यांतले नर गळयाजवळच्या हवेच्या पिशव्या जास्तीत जास्त फुगवून दाखवतात. यातून जनुकीय दृष्ट्या लाभदायक असे काहीच मिळणार नसते. म्हणजेच आकर्षकतेचे नियम माद्यांमधील अन्यानुकरण प्रवृत्तीमुळे निव्वळ फॅशन्स म्हणूनही रुळू शकतात. माद्यांमध्ये ही अन्यानुकरण प्रवृत्ती का निर्माण होते? मूळ स्वार्थ क्र.६ येथे लागू पडतो. अशी स्वअपत्ये निर्माण करणे की ज्यांना स्वजातीय अन्यलिंगीयांकडून पसंती मिळेल. कारण नातवंडे मिळण्यात जनुकीय स्वार्थ साधला गेल्याची पक्की खूण असते. एखाद्या मादीला व्यक्तिशः कोणते वैशिष्ट्य आकर्षक वाटते यापेक्षा सामान्यतः तिच्या प्रजातीतील माद्या कोणते वैशिष्ट्य निवडतात याचा दबाव तिच्यावर असतो. हा दबाव तिच्या पुत्राला माद्या मिळतील की नाही या चिंतेमुळे असतो. याला सेक्सी-सन-आर्ग्युमेंट म्हटले जाते.

नरांचे सुशोभीकरण हे माद्या मिळण्याच्या दृष्टीने जरी सोयीस्कर असले तरी नराच्या आत्मरक्षणाच्या दृष्टीने धोक्याचेच ठरू शकते. गुंताड्याची शिंगे असलेले सांबर ध्यानात घेऊ. लढण्यासाठी टणक आणि टोकदार अशी दोनच शिंगे पुरेशी असतात. डोक्यावर शिंगांचा पसारा वागवत पळून जायची वेळ आली तर झाडात पसारा अडकून ते सांबर कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडण्याचीच शक्यता अधिक. सुशोभीकरण फारच अडचणीचे ठरून काही प्रजाती नष्ट देखील झालेल्या आहेत. नराला सुशोभीकरणाची अडचण किंवा भार होणे याला एनकंबरन्स म्हणतात. हा एनकंबरन्स जर प्रत्यक्ष घात करण्याइतपत जास्त नसला तर तोच उलटपक्षी जोमदार जनुकांचे लक्षण असू शकतो. एनकंबरन्स असूनही हा नर भक्षकांपासून स्वतःला वाचवू शकला हा त्याच्यात जोमदार जनुके असल्याचा पुरावा नव्हे काय? 

लांब शेपटीचे आकर्षण हे असेच आहे. शास्त्राभ्यासकांनी प्लॅस्टिकची खोटी लांब शेपूट चिकटवली तरी तो नर मादीप्रिय ठरल्याचे आढळून येते!

माद्यांना जास्त वयाच्या नराचे आकर्षण असते असेही आढळले आहे. याचे कारण असे की सामान्यतः आपली जनुके आपल्याला तारकच असली तरी आपल्यात काही मारक (सेमीलीथल व लीथल) जनुकेही असतात. अल्पवयात जागृत होणारी मारक जनुके जास्त वयाच्या नरात नसणार हा ठोकताळा सहजच पटणारा आहे.(कोणाचाही कोणताही पूर्वज कधीच बालपणीच मेलेला असू शकत नाही!) माद्यांमधील या वृत्तीमुळे प्रजातींचे आयुर्मानही वाढत गेलेले आहे.

आकर्षण कोणतेही असो, नरोत्तम-निवड-धोरणामुळे थोडेच नर निवडले जातात आणि बाकीचे वंचित रहातात. नर हा बऱ्याच माद्यांना संधी देऊ शकत असल्याने या धोरणाचा परिपाक म्हणून बहुगामीत्व (पॉलीगामी) प्रस्थापित होऊ लागते.

पराक्रमी नरोत्तम: माद्यांची आत्मघातकी निवड  
माद्यांचे एकाच/थोड्याच नरांकडे बहुगामीत्व वाढल्याने बरेच नर वंचित रहातात. वंचितता टाळण्यासाठी अंशतः सदगृहस्थ बनणे हा उपाय काहीसा यशस्वी ठरतोदेखील. पण वंचितता प्रधान राहिल्याने नर-नर संघर्ष वाढणे अटल होते. यामुळे नुसती आकर्षकता पुरेशी रहात नाही. जोमदार जनुके असणे याचा अर्थ भक्षकांपासून वाचणे, भक्ष्ये मिळवणे, आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींपासून वाचणे एवढाच उरत नाही तर स्वजातीतील इतर नरांपासून वाचणे हा प्रश्न देखील उभा ठाकलेला असतो.

बहुगामी प्रजातीत निवडलेल्या नराला स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी, इतर नरांना पिटाळून लावणे, मारून टाकणे किंवा मारामारीत लोळविणे आवश्यक बनते. यातून आक्रमकतेची व बलदंडतेची जनुके स्थिरावू लागतात. उदाहरणार्थ एलेफंट-सील या प्रजातीत नराचे वजन हे मादीच्या वजनाच्या तिप्पट बनले आहे.

आकर्षणाचा मोहरा बलदंडतेकडे वळविण्याद्वारे माद्या त्यांचे निवडकर्ती हे स्थान स्वतःहून गमावून बसतात. कारण पराक्रमी नरोत्तम आपले बल इतर नरांना पिटाळून लावण्यापुरते न वापरता माद्यांना वठणीवर आणण्यासाठीही वापरू लागतात! अशा बलोपासक प्रजातीत पराक्रमी नरोत्तम हा टोळीपती व टोळीपिताही बनतो व पॉलीगामीबरोबर पॅट्रिआर्की (पितृराज्य) देखील प्रस्थापित होते.

पितृराज्य स्थापन झालेल्या प्रजातीत, जो नर राजेपद बळकावील(कमिंग टू प्राईड) त्या नराचा अनुनय करण्यात माद्यांचा जनुकीय स्वार्थ अडकला जातो. माद्या स्वतःहून पदच्युत राजापासूनचे गर्भ पाडून नव्या राजाचे स्वागत करण्यास, वेळ न दवडता सज्ज होतात!

अर्थात बलिष्ठता एकच गुण प्राण्याच्या एकूण स्वार्थासाठी कधीच पुरेसा नसतो. इतर बाबतीत जोमदार (उदाहरणार्थ आरोग्य, सांघिक-कामगिरी, संगोपननिष्ठा) जनुके ही सर्वात बलवान नसलेल्या नरांत उपलब्ध असू शकतात. अशा इतर सर्व नरांना संधी नाकारण्याने जनुकीय अपव्ययही होतो. शिवाय नर-नर संघर्षसुध्दा अपव्ययकारी असतोच. याचा प्रजातीला उलट फटका बसून ताळ्यावर आणणारी प्रक्रिया सुरू होते. याही बाबतीत ती ती प्रजाती टोकाच्या मक्तेदारीकडून काहीशा उदारतेकडे सरकते. राज्यकर्त्या नरांमध्ये इतर नराबाबत सहिष्णुता वाढते. नर-नर संघर्षात होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण व बलेतर गुण-प्रवर्तक जनुकांची गरज यानुसार संधीप्राप्त/वंचित नरांचे गुणोत्तर वाढते. यालाच रीझनेबल ऑपॉरचुनिटी रेशो असे म्हणतात.
संगोपननिष्ठा/आकर्षकता/बलिष्ठता या गोष्टी आपण जरी वेगळ्या काढून पाहिल्या तरी पत्यक्षात त्या त्या प्रजातीत तीनहीचे स्थिरतम मिश्रणच साधले गेलेले असते.

प्रोग्रॅम्ड टु बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल
वरील मांडणी मनुष्याबाबत थेटपणे लागू करता येणार नाही. मनुष्याचे सांस्कृतिक अंग हे त्याच्या प्राकृतिक अंगापासून खूपच स्वायत्त बनलेले आहे. एकूणच जीवनसंघर्षातले सर्वच पक्ष एकमेकावर भरपूर कुरघोड्या करीत असतात. आवश्यक वर्तनप्रकारांची व्यामिश्रता आणि जटिलता जसजशी वाढत जाते तसतसे जनुकांचे जीवावरील थेट नियंत्रण सुटून जनुकांना अधिकाधिक प्रमाणात मज्जासंस्था विकसित करावी लागते. यातून जीवांच्या अबोध सचेतनतेचा सबोध सचेतनतेकडे विकास होत गेलेला आहे. 

मनुष्याच्या उदयानंतर उत्क्रांतीच्या घड्याळाशिवाय इतिहासाचे घड्याळही सुरू झालेले आहे. इतिहासाचे घड्याळ उत्क्रांतीच्या घड्याळापेक्षा वेगवान आहे. कारण अबोधपणे होत राहणाऱ्या निखळ संतुलनातून चालणाऱ्या उत्क्रांतीत शिकणे ही प्रक्रिया थेट मरूनचकरावी लागते. म्हणजे असे की सुयोग्य वर्तन करू न शकणारा जीव व्यक्तीशः मरतो. इतकेच नव्हे तर अरिष्टात सापडलेल्या एखाद्या प्रजातीला नेमके तारणारे नवघटन (म्युटेशन) यदृच्छया लाभले नाही तर ती प्रजाती नष्ट होते. अनेक व्यक्ती-जीव मरूनच तोल-साधलेलेव्यक्ती-जीव उरतात आणि अनेक प्रजाती नष्ट होऊनच तोल साधलेल्या प्रजाती उरतात. माणसांना मात्र चुकांपासून शिकण्यासाठी, चूक-प्रवर्तक-जनुक एकूण जनुकसंचातून लुप्त होईपर्यंत, थांबावे लागत नाही.

मज्जासंस्था निर्माण करून जनुकांनी जीव-प्रचालनावरील त्यांची थेट पकड ढिली केली व मज्जासंस्थाकडे सोपवली. माणसाच्या मेंदूने आत्मपरीक्षक जाणीव निर्माण करून मेंदूची थेट पकडही ढिली केली. जाणीवेला स्वायत्तता लाभलेल्या मनुष्याचे वर्णन प्रोग्रॅम्ड टु बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल असे केले की विज्ञानाचे कारणमय जग आणि आपले संकल्पमय जग यांच्यात विसंगतीरहित-सह-अस्तित्व (कंपॅटिबिलिटी) येते. जनुककेंद्री उत्क्रांतीशास्त्र म्हणजे जनुक-नियतता-वाद(जेनेटिक डिटरमीनिझम) नव्हे. जोपासिताद्वारे सहजातता(नेचर व्हाया नर्चर) हे शीर्षक या दृष्टीने बोलके आहे. प्रश्न प्रकृतीबरोबर वहात जाण्याचा नसून प्रकृतीबाबतच्या जाणतेपणातून तिला ओलांडण्याचा आहे.

मनुष्यांतील नर-मादींची हंटर-गॅदरर(पुरुषांनी लांब जाऊन शिकार करणे आणि स्त्रियांनी वास्तव्यस्थानाच्या जवळपासचे वनस्पतीज अन्न जमवणे) झालेली जडणघडण खरे तर त्यांच्यात समता आणण्याला उपकारक अशी होती. शेतीच्या शोधानंतर लढाईत जिंकलेल्यांनी हरलेल्यांना गुलाम करणे व्यवहार्य बनले. यातून सरंजामी पितृसत्ताक व्यवस्था शक्य झाली. आधुनिकतेच्या उदयानंतर हे चित्र पुरतेच पालटले. या स्थित्यंतरानी स्त्री-परुष संबंधात येणारी परिवर्तने हा मोठाच विषय आहे. वरील मांडणी ही मनुष्याच्या कथेची नसून त्याच्या प्राकृतिक पूर्वपीठिकेची आहे. ती तेवढीच घ्यावी व स्त्री-पुरुषांना थेटपणे लावू नये.

मनुष्यावर जनुकीय दबाव नसतात असे नाही. पण हे दबाव मूळ स्वरूपात व्यक्त न होता सांस्कृतिकरीत्या बदललेल्या भावार्थांमध्ये व्यक्त होतात. उदाहरणार्थ नरांकडे निवड आली की ते शक्यतो सुप्रज मादीची निवड करीत असत. यातून यौवनाचे आकर्षण निर्माण होते आज आपण जे सौद्र्याचे आकर्षण म्हणतो ते मुळात यौवनाचे आकर्षण असते. अशी अर्थांतरे पुष्कळच शोधता येतात. मुख्य मुद्दा हा आहे की जीवोर्मींची विषयांतरे जाणीवेने करता येतात आणि हाच तर संकल्प-स्वातंत्र्याचा आधार आहे.   

Tuesday, June 18, 2019

शोध सुश्रुताचा - भाग ५

ऑगस्टस फ्रेडेरिक रुडॉल्फ हर्न्ले (Hoernle) - आपल्यापैकी किती जणांनी ऐकलय हे नाव? माझी खात्री आहे की बहुतेकांनी नाही.
हर्न्लेचा जन्म सन १८४१ चा. उत्तर भारतातल्या आग्र्यात एका प्रोटेस्टन्ट जर्मन मिशनऱ्याच्या घरात. त्या वेळेच्या प्रथेनुसार वयाच्या ७ व्या वर्षी हर्न्लेला शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठविण्यात आले. ह्याचे शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. त्याला संस्कृत भाषेत विशेष रस होता म्हणून त्यानंतर पुढे तो लंडनमध्ये त्यावेळेचा संस्कृत भाषेचा पंडित थिओडोर गोल्डस्टूकर (हा पण जर्मन होता!) ह्याच्याकडे संस्कृत शिकायला गेला. संस्कृतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हर्न्ले १८६५ मध्ये भारतात परत आला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील क्वीन्स कॉलेजात संस्कृतचा प्रोफेसर म्हणून ह्याने आपली कारकीर्द सुरु केली. बनारसमध्ये हिंदू धर्मसुधारक आणि धर्मशास्त्रपारंगत दयानंद सरस्वतींचा हर्न्ले चांगला मित्र बनला. दयानंद सरस्वतींवर एक पुस्तकही त्याने लिहिले होते. बनारसला अनेक वर्षे राहून हर्न्ले नंतर १८८५ च्या सुमारास कलकत्ता विश्वविद्यालयात नोकरी करायला गेला.
मागील लेखात आपण पाहिले की हॅमिल्टन बॉवरने ती हस्तलिखित पोथी कलकत्त्यात एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. बॉवरने आणलेले म्हणून ह्या हस्तलिखिताचे नामकरण झाले 'बॉवर मॅन्युस्क्रीप्टस'. हर्न्ले त्यावेळी कलकत्त्याला होता. संस्कृतबरोबर मध्य आशियात बोलली जाणारी खोतानी भाषादेखील हर्न्लेला अवगत होती. त्यामुळे ते हस्तलिखित साहजिकपणे त्याच्याकडे भाषांतरासाठी सोपविण्यात आले. हे वर्ष होते सन १८९१.
हर्न्लेने ह्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा अभ्यास सुरु केला. सर्वात प्रथम अडचण होती भाषेची. त्या हस्तलिखिताची भाषा संस्कृतसम होती पण संस्कृत नव्हती. लिपीपण नेहमीपेक्षा वेगळी होती. भाषा अगम्य आणि लिपी अगम्य! भाषा वेगळी आणि लिपी वेगळी - असे कसे शक्य आहे? उदाहरण देतो: 'एक्झाम्पल' - इंग्रजीत हा शब्द 'Example' असा लिहिता आला असता पण हा इंग्रजी 'भाषे'तला शब्द मी देवनागरी 'लिपी'त लिहिलाय. हर्न्लेची समस्या नक्की समजण्यासाठी हेच उदाहरण आपण पुढे नेऊया. समजा मी देवनागरीत लिहिले 'बाएश्पीएल' आणि सांगितलं की इंग्रजीत भाषांतर करा - तर तुम्हाला काय समजेल? तुम्हाला मराठीत वाचता येतंय पण अर्थ लागत नाही - मग काय करणार तुम्ही ह्याचे भाषांतर? जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाहीये की मी देवनागरी लिपीतून जर्मन भाषेत हा शब्द लिहिलाय तोपर्यंत तुम्ही त्याचे भाषांतर करूच शकणार नाही. आणि ह्यासाठी मराठी (लिपी), जर्मन (भाषा) आणि इंग्रजी (भाषांतर भाषा) ह्या तिन्ही भाषा जाणणारा माणूस लागेल. (जाता जाता सांगतो 'बाएश्पीएल' म्हणजे जर्मनमध्ये 'उदाहरण' आणि इंग्रजीत 'Example'). नेमका असाच प्रश्न हर्न्लेला पडला होता आणि त्या वेळेला इंटरनेट अथवा गुगल वगैरे काही नसल्याने हाताशी असेल तेवढेच संदर्भ वापरून त्याला त्या हस्तलिखितांचे भाषांतर करायचे होते. त्यात अजून ती हस्तलिखिते लिहिलेली होती बर्च झाडाच्या पानांवर. बरेचसे भाग पुसट झालेले होते - काही भाग वाचण्याच्या परिस्थितीत नव्हते हापण एक त्रास होताच. हर्न्लेला अनेक जुने संदर्भग्रंथ अभ्यासावे लागले. त्याला तेव्हा कळाले की ती लिपी 'गुप्त ब्रह्मी' लिपी होती. भारतात गुप्त साम्राज्याच्या काळात (ई स २४० ते ई स ५५०) ही लिपी संस्कृत आणि तत्सम भाषा लिहिण्यासाठी वापरली जात असे. त्या हस्तलिखिताची लिपी जरी 'गुप्त ब्रह्मी' लिपी असली तरी भाषा नक्की कोणती होती ते हर्न्लेला नीट समजत नव्हते. पण त्याला ही माहिती मिळाली की बौद्ध धर्माचे बरेचसे साहित्य ब्रह्मी लिपीत आहे आणि ह्यासाठी त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास सुरु केला.
असं मानतात की ई स पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने वैदिक भाषेवरून संस्कृत भाषेचे नियम निश्चित केले. संस्कृत ह्या शब्दाचा अर्थच मुळी 'संपूर्णपणे बनलेली' / 'नियमांनी बांधलेली' असा होतो. गौतम बुद्धाचा काल पाणिनीच्याच आसपासचा मानतात. पण त्या काळी संस्कृत भाषा उच्चवर्णीयांची आणि कर्मकांडाची भाषा झाल्याने बुद्धाने त्याचे तत्त्वज्ञान सामान्यांच्या ब्रह्मी आणि पाली भाषांत सांगितले. पण काही वर्षांनंतर संस्कृत हीच सामान्यांची मुख्य प्रचलित भाषा बनली आणि त्यामुळे त्यावरून बौद्ध भिक्षूंनी त्यांची स्वतःची अशी संस्कृतोद्भव संकरीत भाषा बनवली. हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टस ह्या संस्कृतोद्भव संकरीत भाषेत पण 'गुप्त ब्रह्मी' लिपीत लिहिलेले होते. चार वर्षे - होय - चार वर्षे अथक परिश्रम करून हर्न्लेने शेवटी शोधून काढले की ती लिपी आणि भाषा नेमकी कोणती होती! फक्त कल्पना करा चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जेव्हा हर्न्लेला ह्याचा शोध लागला असेल तेव्हा त्याला किती अफाट आनंद झाला असेल! त्यानंतर पुढे बारा वर्षे बसून हर्न्लेने ते बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इंग्रजीत भाषांतरित केले आणि त्याचे थोडे थोडे भाग दर दोन तीन वर्षांनी प्रकाशित केले. आयुष्यातली एकूण अठरा ते वीस वर्षे हर्न्लेने बॉवर मॅन्युस्क्रीप्टसवर खर्च केली.
हर्न्लेने हे पण सिद्ध केले की ती हस्तलिखिते ई स ६०० च्या आसपासच्या काळातली आहेत. त्या वेळेपर्यंत भारतात सापडलेली सर्वात जुनी कागदपत्रे हीच होती. लंडनमध्ये अनेक वर्तमानपत्रांत ह्याच्या बातम्या आल्या. (सध्याचे कार्बन डेटिंग तंत्र वापरून हे सिद्ध झाले आहे की ती हस्तलिखिते ई स ६५० च्या आसपासचीच आहेत. म्हणजे त्याचा अंदाज बरोबरच होता!) त्यामध्ये एकूण ७ खंड होते - २ ज्योतिषविषयक खंड होते, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक खंड होते, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. दुर्दैवाने हे वैद्यकीय खंड अपूर्ण होते. जर ते का पूर्ण असते तर संपूर्ण जगातले सर्वात प्राचीन आणि सर्वसंपूर्ण असे ठरले असते. ह्या अपूर्ण खंडांमध्येपण भरपूर वैद्यकीय ज्ञान भरलेले होते - इतके की हर्न्लेच्या ह्या वैद्यकीय खंडांच्या भाषांतरांची दखल चक्क जून १८९५ च्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये पण "The Most Ancient Sanskrit Medical Treatise Extant" ह्या मथळयाने घेतली गेली. त्यातल्या भारतीय वैद्यकीय ज्ञानाने त्यांच्या इतकं 'पोटात दुखलं' की ह्या लेखाचा शेवट असा केला आहे - "No doubt many of the articles of the Hindu materia medica are of important therapeutic character and might with advantage be tested in hospitals; but a collection of complex farragos prescribed according to a fanciful and erroneous pathology is practically useless."
असं नक्की काय होतं त्या वैद्यकीय खंडांमध्ये? सुश्रुताचा आणि त्याच्या प्लॅस्टीक सर्जरीच्या पध्दतींचा ह्यात काही संदर्भ मिळाला का? १७९४ मध्ये पुण्यात त्या कुंभाराने वापरलेली पध्दत त्यात सांगितलेली होती का? पाहूया पुढच्या आणि शेवटच्या भागात!
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

Thursday, June 13, 2019

दृक्-दृश्य विवेक : समारोप

आपण गेला एक महिन्याहून अधिक काळ 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथाचे परिशीलन करीत आहोत. 'अद्वैत वेदांत' दर्शनाचा हा एक प्रकरण ग्रंथ (Introductory Text) म्हणून मानला जातो. याचे कर्ते कोण आहेत ते स्पष्ट नाही. परंतु आद्य शंकराचार्य अथवा विद्यारण्यस्वामी असावेत.
दोन सारख्या दिसणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या असता त्या वेगळ्या ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. आपल्याला दिसणारे दृश्य आणि ते पाहणारा द्रष्टा हा वेगळा ओळखणे या 'विवेकापासून' ग्रंथाची सुरुवात होते. हा ग्रंथ आपणाला आपले खरे स्वरूप म्हणजे ब्रह्म अथवा साक्षी चैतन्य आहे हे स्पष्टपणे दाखवून देतो.
त्यानंतर हा ग्रंथ 'माया' म्हणजे काय हे सांगतो. 'विक्षेप' आणि 'आवरण' शक्ती या मायेच्या शक्ती आहेत. माया स्वत: ब्रह्माची शक्ती आहे. 'सत्-चित-आनन्द' स्वरूपात असलेल्या विश्वरूपी ब्रह्मावर माया 'नाम-रूपाचे' आवरण घालते. तरीही  'सत्-चित-आनन्द' हे ब्रह्माचे स्वरूप त्यातून डोकावत असते. या ' 'सत्-चित-आनन्द' स्वरूपाला 'नाम-रुपापासून' वेगळे ओळखणे हा विवेक.
आपली विवेकशक्ती जागरूक करून ब्रह्माला कसे ओळखायचे हे हा ग्रंथ शेवटी सांगतो.

या लेखमालेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अजून निवडणुकांचा धुराळा खाली बसलेला नाही हे ही एक कारण असेल. तरीही दहा-बारा मित्रांचा प्रतिसाद मिळत होता. या क्लिष्ट विषयासाठी दहा-बारा जणांचा प्रतिसादही महत्वाचा आहे.

आपल्यापैकी प्रत्येकजण पूर्वजन्मातील साधनेमुळेअध्यात्माच्या एका टप्प्यावर आलेला आहे.  आपल्याला त्याची जाणीव  नसते इतकेच. आपल्याला या मालिकेमुळे कदाचित त्याची जाणीव झाली आणि आपण अध्यात्माच्या मार्गात प्रगती करू लागलात तर या लेखमालेचा खरा उपयोग होईल. न जाणो, कोणी याच जन्मात ब्रह्मज्ञानी होईल.

आपले प्राचीन तत्वज्ञान काय आहे हे कळले तर जगात वावरताना आपली कुचंबणा होत नाही. मी परदेशात वावरताना अनेक परदेशी लोकांना आपल्या तत्वज्ञानाबद्दल कुतुहूल असल्याचे जाणवले. आपल्यालाच या संबंधी काही माहित नाही असे जाणवल्यास त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून आपल्याला यासंबंधी किमान माहिती असावी या हेतूने ही मालिका लिहिली. वाचकांना अधिक माहिती हवी असल्यास स्वामी सर्वप्रियानंद यांची युट्यूबवर असलेली अमेरिकेत दिलेली प्रवचने ऐकावीत.

आता मी 'अपरोक्षानुभूती' या आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या अद्वैत वेदान्तावरील प्रकरणग्रंथाचा अभ्यास सुरु केला आहे. हा ग्रंथ मोठा असून अधिक खोलात जाणारा आहे.  त्याचा अभ्यास झाला की मी त्यावर लिहिता होईन.

धन्यवाद !

Tuesday, June 11, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग १०

मागील काही भागात आपण आपले खरे स्वरूप 'साक्षी चैतन्य' आहे हे पहिले. साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्या मनावर उमटते. त्यामुळे मनाचे दोन भाग होतात. एक भाग अहंकार तर दुसरा बाकी बुद्धी, चित्त इत्यादी. आपला अहंकार या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेशी एकरूप होतो आणि शरीरभर पसरतो. म्हणूनच आपल्याला शरीर चैतन्यमय भासते. अहंकाराशी एकरूप झालेली साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्याला चैतन्याचा मूळ स्रोत भासते. तिलाच आपण आपला आत्मा समजतो. खरे तर आपण साक्षी चैतन्य आहोत. हे साक्षी चैतन्य सर्व जीवांसाठी एकाच असल्याने 'सर्वांभूती एकच ब्रह्म' आहे असे अद्वैत वेदांत प्रतिपादन करते.
आपण स्वत: साक्षी चैतन्य असल्याने 'मुक्ती'ची संकल्पना अद्वैत वेदांतला मान्य नाही. आपण सदा सर्वकाळ मुक्तच असतो असे अद्वैत वेदांत मानते. स्वत:ला आपल्या अहंकाराशी एकरूप झालेली साक्षी चैतन्याची प्रतिमा मानल्याने आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. हा एकरूप झालेला अहंकार आपल्या शरीराच्या मर्यादेपर्यंत पसरत असल्याने शरीर हे आपल्याला आपली मर्यादा वाटते. मुक्ती मिळवायचीच असेल तर आपल्या स्वत:बद्दलच्या या भ्रामक कल्पनेपासून मुक्ती मिळवली पाहिजे. अद्वैत वेदांताची ही मुक्तीची संकल्पना 'अष्टावक्र गीता' या ग्रंथात अत्यंत चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे.
आपण आपल्या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेशी एकरूप झालेल्या अहंकारालाच 'आपण स्वत:' असे मानत असतो.    हे अज्ञान दूर करण्यासाठी अद्वैत वेदांत 'ज्ञानमार्गाचा अवलंब करावा' असे सुचविते. म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला येत असलेला अनुभव नक्की कोणाला येत आहे, ज्ञानेंद्रियांना की त्यापाठच्या मनाला की त्यापाठच्या साक्षी चैतन्याला याबद्दल सजग राहावे. यातूनच आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होईल असे अद्वैत वेदांत सुचविते.
मायेची ओळख पटविण्यासाठी वेदांत हाच मार्ग सांगते. आपण आसपासच्या विश्वाची आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत माहिती मिळविताना सतत सजग राहून त्यातील सत्-चित-आनन्द स्वरूपाला वेगळे ओळखण्यास शिकलो तर मायेचे आवरण दूर होईल.
अर्थात हा मार्ग सोपा नाही. यासाठी अत्यंत स्थिर मनाची आवश्यकता आहे. माझ्या मते या अवस्थेपर्यंत येण्यासाठी कोठल्यातरी साधनेची आवश्यकता आहे. अद्वैत वेदांत अशा साधनेच्या विरोधात नाही. एखादा साधक पूर्वजन्मातील साधनेमुळे आधीच या अवस्थेपर्यंत आलेला असू शकतो. बाकी साधकांना साधनेची आवश्यकता भासते. कोठली साधना साधकाला अशा अवस्थेपर्यंत आणण्यास मदत करेल हे त्या त्या साधकाने पूर्वायुष्यात कोणती साधना केली आहे यावर अवलंबून असेल. ते ज्याने त्यानेच शोधून काढायचे आहे. मनावर बालपणी कोठल्याही 'संस्कारांचे लेप' लागले नसतील तर अंत:प्रेरणेने हा मार्ग लवकर सापडू शकतो. अन्यथा हे लेप खरवडून काढावे लागतात. म्हणूनच हा मार्ग शोधून काढण्याचा प्रवास खडतर आहे. बुद्धाला ते शोधण्यास सहा वर्षे खडतर तपश्चर्या करावी लागली. पण हा मार्ग सापडला की अध्यात्माचा प्रवास झपाट्याने आणि सुखकर होतो. आपल्यात अद्वैत वेदान्तातील 'ज्ञानमार्गाने' जाण्याची क्षमता निर्माण होते.
पुढील लेख या लेखमालेतील शेवटचा लेख असेल. या लेखमालेतील विचारांचे थोडक्यात सार आपण त्या लेखात पाहू.