Saturday, March 7, 2020

नित्य आणि अनित्य

ब्रह्म 'नित्य' आहे असे अद्वैत वेदांत प्रतिपादन करते. परंतु 'नित्य' शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत आता वेगळा झाला आहे. आपण 'नित्य' म्हणजे अनंत काल अस्तित्वात राहणारे असा अर्थ घेतो. परंतु ब्रह्म हे कालातीत आहे. कालाला मर्यादा आहे. विश्वाच्या जन्मापूर्वी म्हणजेच बिग बँग पूर्वी काल अस्तित्वात नव्हता. परंतु तेव्हाही ब्रह्म अस्तित्वात होते. जे कालाच्या मर्यादेत नाही ते नित्य अशी ही संकल्पना आहे.
गौतम बुद्धांच्या मते हे विश्व अनित्य आहे, येथील प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. वेदांत यालाच 'माया' या नावाने संबोधते. जे स्थल आणि कालाच्या मर्यादेत येते- म्हणजेच अनित्य आहे- ती माया आहे आणि माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. गौतम बुद्ध 'मायेच्या पलीकडे काही आहे काय' याबद्दल काही सांगत नाहीत. 'हा विषय चर्चा करण्याचा नाही' असे गौतम बुद्धांनी नोंदविले आहे.

Thursday, January 2, 2020

चैतन्य

चैतन्य

चैतन्य या शब्दाला Consciousness हा इंग्रजी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. खरेतर  Consciousness हा शब्द इंग्रजीत अत्यंत ढिसाळपणे वापरला जातो. आपले विचार, बोलणे अशा अनेक कृतींनाही हाच शब्द वापरला जातो. परंतु भारतीय तत्वज्ञानात या शब्दाला नेमका अर्थ आहे. आपले बोलावे, वागणे, मनातील विचार इत्यादी गोष्टींना साक्षी असणारे जे असते त्याला चैतन्य असे म्हणतात. याचाच अर्थ चैतन्य हे कधीही एखाद्या वस्तूसारखे (Object) असू शकत नाही. आपण त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही.  जे अनुभव घेणारे आहे ते चैतन्य. म्हणूनच चैतन्याला 'निर्गुण' म्हटले आहे.

आज आधुनिक विज्ञान चैतन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.  आजचे Materialistic आणि आपल्याकडील प्राचीन दर्शन 'चार्वाक दर्शन' मानणारे हे चैतन्याचा उगम शरीरात आहे असे मानतात. त्यादृष्टीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही चालू आहे.  मेंदूतील एखाद्या भाग हा चैतन्याचा स्रोत असावा असा त्यांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने त्यांच्या शोधाचा प्रयत्न चालू आहे.

पण येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशाप्रकारे हे वैज्ञानिक आपल्या शरीरातील चैतन्याचा स्रोत कदाचित शोधू शकतील. पण तो चैतन्याचा मूळ उगम नव्हे.  जर आपण एखाद्या खोलीत बसलो आहोत आणि तेथे दारातून माणसे जात-येत आहेत म्हणून माणसांचे उगमस्थान त्या खोलीचे दार असत नाही. केवळ त्या खोलीत येण्यासाठी ते दाराचा वापर करतात. चैतन्य हे अनादी आहे. आपल्या शरीरात कदाचित ते मेंदूच्या एका भागातून प्रवेश करीत असेल (तसेही अजून सिद्ध झालेले नाही).

कदाचित शास्त्रज्ञ मन-मेंदू यांच्या संबंधाचा शोध नजीकच्या काळात लावतीलही, परंतु चैतन्य समजून घेणे अजूनही शास्त्राच्या दृष्टीने खूपच लांबचा पल्ला आहे.  त्याताही ही शोध घेण्याची प्रक्रिया चैतन्याच्या परिक्षेत्रातच करावी लागते.  आपल्याला जी अनुभूती होते ती चैतन्यातच होते. त्यामुळे सर्व संशोधन हे चैतन्यातच होते.  म्हणूनच विज्ञानाला चैतन्य समाजणे अधिकच कठीण  किंबहुना अशक्य होते.

विज्ञान हे कार्यकारणभावाच्या (Logistical Reasoning) कक्षेत काम करते. कार्यकारण भाव हा स्थल-कालाच्या मर्यादेत काम करतो. कारण आधी घडते, त्याचे परिणाम नंतर घडतात.  चैतन्य हे आदिम आहे. ते स्थल-कालापलीकडे आहे.  काल आदिम नाही. तो विश्वाच्या जन्मापासून सुरु होतो- आधुनिक विज्ञानानुसार बिग बॅंग पासून सुरु होतो.  विश्वाच्या जन्माच्या आधीच्या गोष्टीचा विज्ञान विचार करू शकत नाही कारण ती स्थल-कालाची पर्यायाने विज्ञानाची मर्यादा आहे.  उपनिषदांच्या मते स्थल-काल हे मायेच्या क्षेत्रात येतात. 

चैतन्य ही संकल्पना अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. यापुढे अद्वैत वेदान्ताच्या विवेचनात या संकल्पनेची मदत वारंवार घेतली जाईल. 

Monday, November 18, 2019

Problem of Evil आणि कर्मसिद्धान्त

तत्वज्ञानाचा अभ्यास करताना अपरिहार्यपणे एक मुद्दा पुढे येतो. तो तत्वज्ञानात Problem of Evil या नावाने ओळखला जातो.  परमेश्वराची व्याख्या करताना तो  सर्वज्ञ (Omniacient), सर्वशक्तिमान (Omnipotent) , सार्वकालिक (Omnivorous) , आणि चराचरात सामावलेला (Omnopresent) अशी केली जाते.  मग असा सर्वशक्तिमान परमेश्वर जगात असताना जगावर, माणसांवर संकटे येतातच कशी हा प्रश्न अनेकवेळा सर्वसामान्य माणसाला पडतो.  पाश्चात्य धर्मकल्पनांनुसार (Abrahamic religions) परमेश्वरासारखाच एक सैतान आहे अशी कल्पना करून या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही सर्वशक्तिमान परमेश्वर या सैतानाला काबूत का आणू शकत नाही हा प्रश्न उरतोच.
मानवाच्या आदिम अवस्थेत मानवाला सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पना सुचली असावी. हा परमेश्वर माणसासारखाच असून प्रसन्न झाल्यास आपले संरक्षण करेल, इच्छापूर्ती करेल, रागावल्यास संकटे निर्माण करेल अशी कल्पना मानवाने केली असावी.  अधिक प्रगती झाल्यावर मानवाने या परमेश्वराला दयाळूपणा जोडला असावा. मग सर्वशक्तिमान आणि दयाळू परमेश्वर असतानाही जगावर आणि आपल्यावर संकटे का येतात अशी शंका निर्माण झाली असणार. पाश्चात्य कल्पनांनुसार या परमेश्वराला तुम्ही शरण जाणे आवश्यक आहे. मगच तो तुमचे संरक्षण करेल.
भारतीय भूमीत मात्र या Problem of Evil ला वेगळे उत्तर शोधले गेले. येथे या प्रश्नाच्या उत्तरासाठी कर्मसिद्धांत मांडला  गेला.  परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. पण तुम्ही चांगली/वाईट कर्मे केली असतील तर त्यांची फळे तुम्हाला कधीनाकधी भोगावीच लागतील असे हा कर्मसिद्धांत सांगतो. चार्वाक सोडता भारतीय भूमीत जन्मलेल्या सर्व धर्मानी/दर्शनांनी ही कर्मसिद्धांताची कल्पना कोणत्या ना कोणत्या मार्गाने उचलून धरली आहे.  शून्यवाद स्वीकारलेल्या बौद्ध धर्मानेही ही कर्मसिद्धान्ताची कल्पना प्रतीत्यसमुत्पादात संख्ररा (संस्कार) या नावाने स्वीकारली आहे.
मात्र ही कर्मसिद्धान्ताची संकल्पना स्वीकारतानाही एक अडचण निर्माण होते. जीवाच्या जन्माचे कारण मागील कर्मांची फळे भोगणे हे आहे असे सांगितले जाते. जीव कर्माची फळे भोगताना अज्ञानामुळे नवी कर्मे निर्माण करतो आणि ही साखळी चालू राहते असे कर्मसिद्धांत मानतो. जरी कर्मसिद्धांताच्या साखळीची कल्पना मान्य केली तरी ही साखळी मुळात सुरूच का झाली हा प्रश्न उभा राहतो. कर्मसिद्धांतावरील हाच मुख्य आक्षेप आहे.
कर्मसिद्धान्ताची संकल्पना समजावून घेताना 'माया' ही संकल्पनाही समजावून घेणे अपरिहार्य ठरते. माया ही ब्रह्माची शक्ती आहे हे आपण या आधीच्या लेखात पहिले आहे. सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे, मायेच्या आवरणामुळे ते आपल्याला भासमान होते.  आपले मायेसंबंधीचे अज्ञान दूर झाले की ब्रह्म प्रकट होते.  स्थल आणि काल हे मायेचे क्षेत्र आहे. विश्वाच्या आरंभापूर्वी काल नव्हता तसेच स्थल (Space) नव्हते. त्यामुळे तेव्हा मायेचे अस्तित्व नव्हते. मात्र ब्रह्माचे होते.  कार्यकारणभाव हा कालावर अवलंबून असतो. कारण आधी घडावे लागते, मगच कार्य होते. म्हणजेच कार्यकारणभाव हे मायेचे क्षेत्र आहे. कर्म आधी घडावे लागते, त्याची फळे नंतर मिळतात. अर्थात कर्मसिद्धांत हा मायेच्या क्षेत्रात येतो.
माया ही अज्ञानरूपात आहे.  ब्रह्माच्या अज्ञानात मायेचा जन्म आहे. कोणत्याही अज्ञानाला आरंभ नसतो. अंत असू शकतो. उदाहरणार्थ मला रशियन भाषेचे ज्ञान नाही.  'कधीपासून मला रशियन भाषेचे ज्ञान नाही?'  असा प्रश्न उद्भवत नाही.  माझ्या या अज्ञानाला आरंभ नाही.  परंतु अंत असू शकतो. मी रशियन शिकल्यास या अज्ञानाचा अंत होईल. तद्वतच अज्ञानारुपी मायेत जन्म झालेल्या आपल्या कर्मसाखळीला आरंभ नाही. परंतु अंत असू शकतो. आपल्याला  मायेचे खरे स्वरूप कळल्यास या अज्ञानाचा अंत होईल. आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त होऊ.
आपल्या सर्वांना मायेच्या स्वरूपाचा बोध व्हावा आणि आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त व्हावे ही शुभेच्छा.

Sunday, November 17, 2019

विश्व आणि ईश्वर यातील संबंध

प्राचीन भारतात विविध तत्वज्ञाने उगम पावली. या तत्वज्ञानांना 'दर्शने' या नावाने ओळखले जाते. तत्वज्ञानाचा अभ्यास हा 'दर्शनशास्त्र' या नावानेच ओळखला जातो. प्राचीन भारतीय दर्शनांपैकी आठ दर्शने ही प्रमुख मानली जातात. त्यात सहा दर्शने ही हिंदू दर्शने म्हणून ओळखली जातात (षटदर्शने) तर जैन आणि बौद्ध दर्शने ही अहिंदू दर्शने मानली जातात. सहा प्रमुख हिंदू दर्शने पुढील प्रमाणे .. न्याय, वैशेषिक, सांख्य, चार्वाक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अथवा वेदांत. या विविध दर्शनांनी विश्व आणि ईश्वर यांचा संबंध याबाबत उहापोह केलेला आहे.
चार्वाक दर्शन हे इहवादी आहे. त्यामुळे ईश्वराचे अस्तित्वच हे दर्शन नाकारते.
विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध तीन प्रकारे दाखविता येतो. याला आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशी नावे आहेत.
१> आरंभवाद : नैय्यायिक आणि वैशेषिक विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'आरंभवाद' या तत्वाने मांडतात. आरंभवाद म्हणजे कोठल्यातरी कारणाने कोणत्यातरी गोष्टीपासून पूर्णतः नवी गोष्ट उदयास येणे. प्राणवायू आणि हायड्रोजन यांच्या संयुगातून पूर्णतः: वेगळे गुणधर्म असणारे पाणी तयार होते तसेच काहीसे हे आहे. आरंभवादानुसार ईश्वराने हे विश्व निर्माण केले. पाश्चात्य धर्मही विश्व आणि ईश्वर यांचा संबंध आरंभवादानुसार दाखवितात. माणसाच्या आदिम अवस्थेत स्फुरलेला हा विचार आहे.
२> परिणामवाद : सांख्य दर्शन विश्व आणि ईश्वर यांच्यातील संबंध 'परिणामवाद' या तत्वाने मांडतात. एखादी गोष्ट दुसऱ्या भिन्न गुणधर्म असलेल्या गोष्टीत परावर्तित होते त्याला परिणामवाद म्हणतात. उदाहरणार्थ दूध हे दह्यात रूपांतरित होते तेव्हा दुधाचे गुणधर्म बदलतात. सांख्य दर्शनानुसार प्रकृती ही या विश्वात परिवर्तित होते. हे विश्व म्हणजे प्रकृतीचेच परिवर्तन आहे. योग आणि आयुर्वेद हे सांख्य दर्शनातून आलेले असल्याने त्यावर या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.
३> विवर्तवाद : अद्वैत वेदांत विश्व आणि ईश्वर यातील संबंध 'विवर्तवादाने' मांडते. विवर्तवादानुसार एखादी वस्तू अज्ञानामुळे वेगळी भासते. वस्तू तीच असते, केवळ अज्ञानामुळे ती वेगळी भासते. अंधाऱ्या खोलीत दोर पडलेला असतो, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो सापासारखा वाटतो. आपला तो अनुभव पूर्णतः: खरा असतो. आपण तो साप समजून घाबरतोही. आपले अज्ञान दूर होताच आपल्याला तो दोर आहे हे कळते. अद्वैत वेदांतानुसार विश्व हे ईश्वरच (ब्रह्म) आहे, परंतु केवळ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ते विश्व ब्रह्मापासून वेगळे भासते. आपले अज्ञान दूर झाल्यावर विश्व हे ब्रह्मच असल्याची स्पष्ट जाणीव होते.
संतोष कारखानीस

Friday, October 18, 2019

वेदांत

आपण गेले काही महिने वेदांताचा अभ्यास करीत आहोत.
वेदांताची मध्यवर्ती भूमिका ही 'को अहं ?' अथवा "मी कोण आहे?' या प्रश्नाचा शोध घेण्याची आहे.  "मी कोण" याचा शोध घेणे हा काही रिकामपणाचा उद्योग नाही. आपल्याला दैनंदिन आयुष्यात जे मानसिक अस्वास्थ्य अनुभवास येते, जी दु:खे सहन करावी लागतात त्याचे मूलभूत कारण "मी कोण आहे" याचा शोध न लागणे हे आहे असे वेदांत मानते.  आपण स्वत:ला आपले शरीर किंवा फार तर आपले मन समजतो. या
मुळे आपण स्वतः:ला या शरीरात बद्ध करून घेतो. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे कारण ही बंधनाची जाणीव आहे. 
आपण आपल्याला आपले शरीर अथवा मन समजतो याचे कारण आपल्याला आपल्यात असलेल्या चैतन्याचा अनुभव आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत सीमित असतो. त्यामुळे साहजिकच आपण आपल्याला आपले शरीर समजतो. आपले मन या चैतन्याशी एकरूप झालेले असल्याने आपण कधीकधी आपल्याला आपले मन समजतो. परंतु आपल्या मनाला आपल्या शरीरापर्यंतच सत्ता गाजविता येते. त्यामुळे स्वत:ला आपले मन समजणे हे ही आपल्याला एका मर्यादेत जखडणे असते. 
वेदान्ताचे प्रतिपादन आहे (आणि खोलात गेल्यावर आपल्याला त्याचा अनुभव येतो) की आपण आपल्या शरीर अथवा मनापुरते मर्यादित नाही. आपले चैतन्य हे चैतन्याचा महासागर पसरलेला आहे त्याचाच एक भाग आहे. किंबहुना चैतन्याचा स्रोत (ज्याला वेदांत बह्म या नावाने संबोधते) तळपत असतो.  या स्रोतातून सातत्याने पाझरणाऱ्या चैतन्यसोबत आपले मन एकरूप होते. आपल्या मनाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत पसरते. आपल्या ज्ञानेंद्रियांना चेतना देते. म्हणजेच आपण हे आपला देह अथवा मन नसून हा चैतन्याचा स्रोत म्हणजेच ब्रह्म आहोत. 
मग आपल्या या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आपल्याला का होत नाही? आपली ज्ञानेंद्रिये सातत्याने आपल्या शरीराच्या बाहेरील अनुभवात गुंतलेली असतात. आपल्या मनाच्या आरशात पडलेल्या चैतन्याचे प्रक्षेपण सातत्याने शरीराच्या बाहेर करीत असतात. जर या चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात अथवा ब्रह्माच्या विचारात केले तर ब्रह्मज्ञान होऊ शकते.  ध्यानाच्या विविध पद्धतीत चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात/मनात होते.
गौतम बुद्धाने विकसित केलेल्या विपश्यना ध्यान पद्धतीत आपल्याच शरीराचा वेध घ्यायचा असतो.  गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात (http://www.dhamma.org) ही ध्यान पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविली जाते.  गौतम बुद्धाला  "को अहं" या प्रश्नाचे उत्तर वेदान्ताच्या उत्तरापेक्षा वेगळे मिळाले. पण गौतम बुद्धाची ध्यानपद्धती ही वेदांच्या ध्यानपद्धतीशी मिळतीजुळती होती. गौतम बुद्ध हे भारतीय परंपरेतूनच आलेले होते.
वेदांताचा आपण अधिक खोलात शिरून अभ्यास करणार आहोत.