Thursday, November 11, 2021

अद्वैत वेदांत : जाणिवेचे स्तर

'ब्रह्मं सत्यम्, जगत् मिथ्या' असे सगळी उपनिषदे उच्चारवाने सांगत असतात. मात्र आपल्याला आपल्याला आसपासची सृष्टी दिसत असते, पंचेंद्रियांना जाणवत असते. म्हणूनच उपनिषदामधील हे ज्ञान बरेच वेळा हास्यास्पद वाटते. परंतु उपनिषदांनी जाणिवेचे अनेक स्तर आहेत असे सप्रमाण मांडले आहे. 'जगत् मिथ्या' हे तत्त्वज्ञानही जाणिवेच्या अत्यंत वेगळ्या स्तरावरील आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. जाणिवेच्या व्यावहारिक स्तरावर हे जग खोटे आहे, आभासात्मक आहे असे उपनिषदे अजिबात सांगत नाहीत. हे जाणिवेचे विविध स्तर कोणते आहेत हे आपण समजून घेऊ. मांडुक्य उपनिषदात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे. 

जाणिवेच्या स्तरांचा विचार करताना जनक राजाची एक गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट http://shorturl.at/lBSXZ या लिंकवर माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळेल. जनक राजा झोपलेला असताना त्याला एक वाईट स्वप्न पडते. झोपेतून उठल्यावर त्याला प्रश्न पडतो की 'स्वप्नात जे पाहिले ते खरे की आता जे पाहतो आहे ते खरे'. या गोष्टीतून जागृतावस्थेतील जाणिवेचा स्तर आणि स्वप्नावस्थेतील जाणिवेचा स्तर भिन्न असतात हे सूचित केले आहे. विस्तारभयामुळे ती संपूर्ण गोष्ट या लेखात देता येत नाही. पण जिज्ञासू तेथे जाऊन वाचू शकतात. 

जाणिवेच्या तीन अवस्था आपल्या नित्य परिचयाच्या आहेत. जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा या त्या तीन अवस्था. मात्र मांडुक्य उपनिषद चौथ्या अवस्थेचेही विवेचन करते. त्याला हे उपनिषद काहीही नाव न देता चौथी अवस्था असेच म्हणते. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु (गुरूंचे गुरु) गौडपादाचार्य यांनी या अवस्थेला 'तुर्यावस्था' असे नाव दिले आहे. 'तुर्य' याचा शब्दश: अर्थ चतुर्थ असाच आहे.  

जागृतावस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे. जागृतावस्थेत आपल्या पंचेंद्रियांद्वारे आणि मनाच्या साहाय्याने आपण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेत असतो. स्वप्नावस्था ही अधिक तरल अवस्था आहे. यात आपले मन आपल्यासमोर घटना उभे करत असते आणि आपण त्या घटनांचा स्वप्नातील पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेत असतो. स्वप्न पडत असताना हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहोत असेच वाटते. गाढ निद्रेत स्वप्ने नसतात. मनाची कवाडे घट्ट मिटलेली असतात. कोणतेही दृश्य जगातले अनुभव येत नाहीत. मात्र झोपून उठल्यावर आपण गाढ निद्रेचा अनुभव घेतला हे सांगू शकतो. म्हणजेच आपण गाढ निद्रा "अनुभवत" असतो. या 'अनुभवण्यात' भौतिक गोष्टींचा समावेश नसल्याने पंचेंद्रियांची आवश्यकता नसते.

या तीनही अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे. तुर्यावस्था समजण्यासाठी चित्रपटगृहातील पडद्याचे उदाहरण देता येईल.  हा पडदा नसेल तर चित्रपट दाखविताच येणार नाही. पण चित्रपटातील दृश्यांपासून हा पडदा पूर्णपणे अलिप्त असतो. चित्रपटात पुराचे दृश्य असेल तरी हा पडदा ओला होत नाही, आगीचे दृश्य असले तरी हा पडदा जळत नाही. चित्रपटातील दृश्यांना आधार देत अलिप्तपणे उभे राहणे एवढेच या पडद्याचे काम आहे. तुर्यावस्था अशीच आहे. 

तुर्यावस्था ही आपल्याला आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव असणे आहे. ही जाणीव असतानाही आपले दैनंदिन व्यवहार सुरूच असतात. आपण स्वप्नावस्थेतूनही जातो, गाढ झोपही अनुभवतो. म्हणूनच या तीन अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे असे म्हटले जाते. सोन्याच्या पाटल्या म्हणजे केवळ विशिष्ट नाम-रूप असलेले सोने आहे याची स्पष्ट जाणीव असतानाही माणूस त्या पाटल्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात करू शकतो तसेच हे आहे. 

'ब्रह्मं सत्यम्, जगत् मिथ्या' हे तुर्यावस्थेच्या जाणिवेच्या स्तरावर संपूर्णतः खरे आहे. 

आपण सर्वांना तुर्यावस्था या जन्मात प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

Tuesday, November 9, 2021

अद्वैत वेदांत आणि मुक्ती

अद्वैत वेदान्ताच्या तत्वज्ञानानुसार हे विश्व म्हणजे दुसरे काही नसून ब्रह्म आहे.आपण ब्रह्म आहोत. त्यामुळे मुक्तच आहोत. त्यामुळे मुक्तीची संकल्पना या तत्वज्ञानात नाही. जर आपण मुक्तच आहोत तर ही मुक्तता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात का जाणवत नाही? आपण मुक्त असूनही, ब्रह्म असूनही सुख-दु:खाच्या फेऱ्यात का अडकलेले आहोत?

हे समजून घेण्यासाठी आपल्याला अंगभूत गुण उधार गुण यातील फरक समजून घ्यावा लागेल. चुलीवर एक भांडे ठेवले आहे. पाण्याची उष्णता हा त्या पाण्याचा अंगभूत गुणधर्म नाही. हा गुणधर्म पाण्याने भांड्याकडून घेतला आहे. जर ते पाणी भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतले तर ती उष्णता टिकून राहिलच असे नाही. तद्वातच त्या पाण्याचा आकार हाही त्या पाण्याने भांड्याकडून घेतलेला आहे. तो पाण्याचा उधार गुणधर्म आहे. मात्र पाण्याचे वस्तुमान हा गुणधर्म पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे.
त्या चुलीवरील भांड्याचाही उष्णता हा अंगभूत गुणधर्म नाही. तो त्याने खालच्या अग्नीकडून उधार घेतलेला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हे त्या भांड्याचे अंगभूत गुणधर्म आहेत. अग्नीचा मात्र उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे. जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत उष्णता राहाणार आहे. म्हणजेच उष्णता हा गुणधर्म अग्नीकडून भांड्याकडे आणि तेथून पाण्याकडे संक्रमित झाला आहे.
ब्रह्माचा (साक्षी चैतन्याचा) सूर्य तळपत आहे. आपल्या मनात या ब्रह्माचे प्रतिबिंब पडले आहे. आपल्या मनाच्या 'अहंकार' या भागाशी हे प्रतिबिंब एकरूप होते. अहंकाराच्या साहाय्याने चेतासंस्थेमार्फत हे प्रतिबिंब संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. साक्षी चैतन्याच्या या अहंकाराशी एकरूप झालेल्या प्रतिमेलाच आपण आपला आत्मा समजतो. या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेने साक्षी चैतन्याकडून सत् (अस्तित्व), चित् (चैतन्य) आणि आनंद हे गुण उधार घेतले आहेत. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपल्या चैतन्याचे प्रक्षेपण बाह्य जगतावर करतो (उदा. डोळ्यांनी बघतो). त्यावेळी आपण साक्षी चैतन्याचा सत् (अस्तित्व) हा गुण त्या वस्तूला देतो. ती वस्तू (आपल्या दृष्टीने) अस्तित्वात येते. म्हणजेच सत् (अस्तित्व) हा गुण ती वस्तू आपल्या ज्ञानेंद्रियाकडून उधार घेते. हा गुण ज्ञानेंद्रियांनी साक्षीचैतन्याच्या (ब्रह्माच्या) प्रतिमेकडून, चैतन्याच्या प्रतिमेने साक्षीचैतन्याकडून (ब्रह्माकडून) उधार घेतलेला आहे.
अद्वैत वेदान्ताच्या मते 'मुक्ती' याचा अर्थ आपल्या अहंकाराशी साक्षी चैतन्याचे झालेले तादात्म्य ओळखणे आहे. हे तादात्म्य आपण तोडू शकत नाही. परंतु त्याची जाणीव झाली की आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते. 'अष्टावक्रगीता' या ग्रंथात हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.
संतोष कारखानीस ठाणे

Sunday, November 7, 2021

लक्ष्मीस आवाहन

 !! श्री !!

हे लक्ष्मी ये तुझे स्वागत आहे.
मीच तुझे आवाहन केले होते.
तुला आसन कोठे देऊ ?
स्वयंपाकघरात जातेस तर जा पण जपूनच तिथे माता अन्नपूर्णा आहे तिला सहाय्य कर पण तिच्या कामात दखल देऊ नकोस.
देवघरात ,माजघरात जपूनच जा कारण तिथे देवी सरस्वती निवास करून आहे . घेशील पटवून तिच्याशी ?
आता एकच जागा ! आमच्या घराच्या दारात स्थिर हो . अतिथि याचक यांना विन्मुख करू नको.
काय, तुला माझ्यातच स्थान हवे ! देतो.
माझ्या डोक्यात शिरू नको. डोक्यात भिनु तर नकोच नको
हृदयात तर प्रेम व करूणा वास करते.
मग आता एकच जागा माझ्या हातामध्ये वास कर .
दुसऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना ताकत दे एवढीच विनंती
हस्तस्य भूषणम् दानम् !!
देणाराने देत जावे
घेणाराने घेत जावे
घेणार्याने घेता घेता
देणाराचे हात घ्यावे
लक्ष्मीमुळे केवळ सुख नको तर लक्ष्मीकृपेने मिळणारी समृध्दी शांतता समाधान तृप्ती याचा आनंद महत्वपूर्ण आहे.
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! 


Sunday, October 10, 2021

अचपळ मन माझे - भाग ५

'मला माझ्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे याचे भान आहे. परंतु ऐन वेळी माझ्या मनातील एक अनामिक शक्ती मला अयोग्य गोष्ट करण्यास भाग पाडते' असे दुर्योधनाचे सांगणे आहे. ऐन युद्धाच्यावेळी समोर आपल्याच भाऊबंदांना पाहून अर्जुनाची गात्रे कापू लागतात, यावेळी अर्जुन दुर्योधनासारखेच वक्तव्य करतो आणि श्रीकृष्णाला सल्ला विचारतो. असाच प्रश्न आपल्यालाही जीवनात अनेकवेळा पडतो. यातून मार्ग कसा काढायचा याचे उत्तर कृष्णाने दिले, ते आपण मागील लेखात पाहिले. अर्जुन आणि कृष्ण यावेळी युद्धभूमीवर उभे होते. युद्धाला प्रारंभ होण्याची वेळ आली होती. अशावेळी कृष्णाने अर्थातच थोडक्यात उत्तर दिले. याचे विस्तृत विवेचन आपल्याला निरनिराळ्या उपनिषदांत सापडते. 

आधुनिक मानसशास्त्राने आपल्या मनाचे अंतर्मन आणि बाह्यमन असे भाग केले आहेत.  अगदी असेच विभाजन आपल्या प्राचीन गंथांतही आढळते. अंतर्मनात दडलेल्या भावनांना आपल्या प्राचीन भाषेत 'संस्कार' असे नाव आहे, आपल्या पंचेंद्रियांना अथवा मनाला एखाद्या गोष्टीचा (विषयाचा) स्पर्श झाल्यास त्यासंबंधित संस्कार बहिर्मनात येतात, वृत्तींना जन्म देतात. आपण त्या वृत्तीच्या आधारे प्रतिक्रिया देतो. याच प्रतिक्रिया पुनश्च अधिक दृढ संस्कार बनून अंतर्मनात जातात. 

श्रीकृष्णाने या दुष्टचक्राला भेदण्याचा मार्ग सांगितला तो स्पष्ट आहे. आपल्याला या देहात ज्ञानेंद्रिये आहेत. त्यांना कोठल्यातरी गोष्टीचा स्पर्श होणारच. डोळ्यांना काही दिसेल, कानावर आवाज येईल इत्यादी. त्यामुळे अंतर्मनातील संस्कार जागृत होऊन बहिर्मनातही येणार. आपले त्यावर काहीच नियंत्रण नाही. मात्र बहिर्मनात त्याच्या वृत्ती बनण्यापूर्वी आपल्याला त्यांना थोपविता येते. काही क्षणांसाठी ही Opportunity Window आपल्यासाठी उघडी असते. अशा वेळी या संस्कारांना - आठवणींना - प्रतिसाद न देता म्हणजेच मनात राग-द्वेषाचे भाव उमटू न देता त्याकडे केवळ द्रष्टया भावाने बघता येते. यासाठी आपण सतत सावध - सजग असणे आवश्यक आहे. काहीजण ही सजगता मागील जन्मातूनच घेऊन येतात. आपण त्या व्हिडीओमध्ये पाहिले की काही मुले मोहावर मात करू शकली. समोर मॅशमेलो दिसत असतानाही तो खाण्याचा मोह त्यांनी आवरला. आपल्याला ही सजगता आपल्या अंगात बाणावयाची आहे, असलेली सजगता अधिक दृढ करायची आहे. 

यासाठी उपनिषदांनी काय मार्ग सांगितलं आहे ते बघू. सजगता वाढविण्यासाठी उपनिषदे विपश्यना ध्यानाचा मार्ग सुचवितात. विपश्यना ध्यानात आपण आपल्या श्वासाबाबत, शरीरावरील संवेदनांबाबत सजग बनतो. बहिर्मनात येणारा - वृत्तीत रूपांतरित होणारा प्रत्येक संस्कार आपल्या श्वासात प्रथम सूक्ष्मसा बदल घडवितो. आपल्या शरीरावर कुठेतरी कसलीतरी संवेदना जागवितो. आपण याबाबत खूप जागरूक असू तर आपल्याला हा बदल लगेच जाणवतो. मग या संस्कारातून वृत्ती जागृत करायची का पूर्णपणे तटस्थ राहायचे हे आपल्या हातात रहाते. एखादा आपल्याला न आवडणारा माणूस समोर आला तर आपले द्वेषाचे संस्कार बहिर्मनात येतील, पण द्वेषवृत्तीत त्याचे रूपांतर होणार नाही. मग ही द्वेषवृत्ती परत अंतर्मनात जाऊन त्याचे नवे संस्कारही बनणार नाहीत. हळूहळू अंतर्मनातील मोह आणि द्वेषाच्या संस्कारांचे ओझे कमी होऊ लागेल. आपल्या इंद्रियांचा स्पर्श एखाद्या गोष्टीला झाला (कोणती गोष्ट पाहिली, एखादा आवाज ऐकू आला इत्यादी) तरी अंतर्मनातील संस्कार बहिर्मनावर येण्याची तीव्रता कमी होऊ लागेल, या संस्कारांना वृत्तीत बदलण्याआधी पकडणे सोपे होऊ लागेल. आपला आपल्या मनावर ताबा येऊ लागेल. आपल्यसाठो योग्य तीच गोष्ट (श्रेयस) करण्याची, अयोग्य गोष्ट (प्रेयस) करण्याच्या उर्मिला रोखण्याची आपली क्षमता वाढू लागेल. मग अर्जुनासारखा प्रसंग आपल्यावर आल्यास आपली गात्रे कापणार नाहीत, हातातले धनुष्य गळून पडणार नाही. 

विपश्यना ध्यान शिकण्यासाठी आपण गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत जाऊ शकता. हे शिबीर विनामूल्य आहे. http://www.dhamma.org येथे रजिस्ट्रेशन करता येते. माझ्या ब्लॉगवर (http://chintan.karkhanisgroup.com) 'कुंडलिनी ध्यान' विभागात मी त्रोटक माहिती दिली आहे. पण विपश्यना केंद्रात जाऊन ध्यान शिकल्यास उत्तम. तेथे आपल्याला टप्याटप्प्याने ध्यानाची पद्धत शिकवितात. संपूर्ण जगभर अनेक विपश्यना केंद्रे आहेत, त्यात दर महिन्याला हजारो साधक ही विद्या शिकून जातात. मग आपल्याला जमणे सहज शक्य आहे. 

जर काही कारणामुळे आपणास विपश्यना शिबिरात जाणे शक्य नसेल तर आपण ध्यानाची पूर्वतयारी असलेले 'अनापान सति' / प्राणधारणा करूनही काही प्रमाणात सावधपणा आपल्या स्वभावात आणू शकतो.  विपश्यना ध्यान / अनापान सति/ प्राणधारणा  कशी करायची याची थोडक्यात माहिती माझ्या ब्लॉगवर 'कुंडलिनी ध्यान' या विभागात आहे. प्राणधारणा आणि विपश्यना ध्यान या कुंडलिनी ध्यानाच्या पहिल्या दोन पायऱ्या आहेत. 

आपल्या सर्वांचे मन आपल्याला वश होवो आणि त्याद्वारे आपली ऐहिक आणि अध्यात्मिक प्रगती होवो ही परमेश्वराकडे प्रार्थना. 

लेखमाला समाप्त. लेखनसीमा.


संतोष कारखानीस ठाणे

अचपळ मन माझे - भाग ४

 दुर्योधनाने कृष्णाला सांगितले की 'मला माझे हित कशात आहे आणि अहित कशात आहे ते कळते. पण माझया अंगात एक अनामिक शक्ती आहे. आणि ती माझ्याकडून जसे करवून घेते तसे मला करावे लागते, माझे त्यात अहित दिसत असेल तरीही'. अर्जुन हाच प्रश्न थोड्या वेगळ्या भाषेत विचारतो आहे, पण तो त्यावर काय करावे याचे उत्तर श्रीकृष्णाकडे मागतो आहे हे आपण पाहिले. हा प्रश्न आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्यासमोर नेहमी येतो. जर आपण आपल्याला योग्य वाटते तेच करू शकलो तर आपल्याला भावी आयुष्यात खूप उपयोगी ठरेल हे आपण जाणतो. म्हणूनच कृष्णाने दिलेल्या उत्तराबद्दल आपल्याला उत्सुकता आहे. आपल्या अंतर्मनात खोलवर दडलेले 'संस्कार' आपल्या 'वृत्ती जागवितात', त्यानुसार आपण प्रतिक्रिया देतो, नंतर याच वृत्ती आपले पूर्वसंस्कार अधिक दृढ बनवितात हे आपण मागच्या भागात पाहिले. मग या चक्रातून बाहेर येण्याचा काहीच मार्ग नाही का? श्रीकृष्ण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या ३४ व्या श्लोकाच्या उत्तरार्धात या मार्गाकडे निर्देश करतात. पण आपल्याला हा मार्ग विस्तृतपणे समजून घेणे आवश्यक आहे. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ | तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३-३४|| श्रीकृष्ण सांगताहेत की माणसाने हे राग-द्वेषाचे संस्कार अंतर्मनातून आपल्या बहिर्मनावर येतात तेव्हाच (म्हणजे त्याची वृत्ती बनण्यापूर्वीच) त्यापासून स्वतः:ला सोडवून घेतले पाहिजे. या संस्कारांना वश होणे टाळले पाहिजे. आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की हे कसे साध्य होणार? कारण इंद्रियांचा स्पर्श एखाद्या विषयाला होताच हे लोभ-मोहाचे संस्कार आपले डोके वर काढतात, त्यांचे वृत्तीमध्ये रूपांतर होते. मला न आवडणारा माणूस दिसला की त्याक्षणी माझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेषाची भावना उत्पन्न होते. समोर चमचमीत पदार्थ आला की लगेच माझ्या मनात तो खाण्याची अनावर इच्छा निर्माण होते. मग श्रीकृष्ण सांगताहेत ते मला माझ्या शक्तीपलीकडचे वाटू लागते. पण या संस्कार-वृत्ती-प्रतिक्रिया-संस्कार या चक्रातही एक कमजोर कडी - weak link - आहे. आपण या कमजोर कडीबद्दल आणि त्याचा उपयोग करून हे संस्कार-वृत्ती-प्रतिक्रिया-संस्काराचे दुष्टचक्र कसे भेदायचे हे पुढील भागात पाहू. संतोष कारखानीस ठाणे